चित्रपट आणि ‘ओटीटी’च्या जमान्यात मराठी रंगभूमीचे स्थान...

    04-Nov-2022   
Total Views |
 
मराठी रंगभूमी
 
 
 
आज दि. 5 नोव्हेंबर, म्हणजे मराठी रंगभूमी दिन. रंगभूमी दिनानिमित्त या क्षेत्रातील अभिनेते, दिग्दर्शक, लेखक, संगीत, प्रकाशयोजना आणि नेपथ्य अशा सर्वच भूमिकांचा जवळून अभ्यास केलेल्या किशोर पेणकर यांच्याशी केलेली ही खास बातचित...
 
 
 
किशोर पेणकर यांनी रंगभूमीवर अभिनयासोबतच दिग्दर्शन, संगीत, प्रकाशयोजना, नेपथ्य आदी सर्व जबाबदार्‍या अगदी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. 20 हून अधिक मालिकांमध्ये त्यांनी चरित्र भूमिकाही साकारल्या. नाटकासोबतच शिल्पकला, चित्रकला, हस्तकला आणि काव्यलेखनातही त्यांना तितकाच रस. सध्या ते भारत हवामान विज्ञान विभाग, कुलाबा येथे राजपात्रित अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आज ‘मराठी रंगभूमी दिना’चे औचित्य साधून रंगभूमी आणि एकूणच बदलत्या मनोरंजन विश्वाविषयी पेणकर यांनी अगदी मनमोकळेपणे उत्तरे दिली.
 
 
सर्वप्रथम हे जाणून घ्यायला आवडेल की, तुम्ही रंगभूमी आणि अभिनयाच्या या क्षेत्राकडे कसे वळलात?
 
खरंतर या क्षेत्राकडे मी मुद्दामहून वळलो नाही. मी चाळीतच राहत होतो. लहान होतो. तेव्हा आमचे खेळ असेच असायचे. प्रत्येक जयंती म्हणा, कोणता सण, गणेशोत्सव, त्यावेळी आम्ही नाटकं बसवायचो. आमचे आम्हीच! कोणी शिवाजी व्हायचा, कोणी मावळा, तर कुणी मुलगी जिजाऊ व्हायची. अभिनयाची आणि दिग्दर्शनाचीही सुरुवात तेव्हापासूनच झाली. घरात असलेल्या सामानाचे, थर्माकोलचे बॉक्स असायचे, त्यांचे नेपथ्य करायचो. त्यातूनच ‘सेट’ उभारायचो, आईच्या जुन्या साड्यांचे शामियाने तयार करायचे, काठ्यांची तलवार, पुठ्याची ढाल. असे सगळे जमवून आमचे आम्हीच सांस्कृतिक कार्यक्रम करायचो. इतिहासाच्या पुस्तकातले धडे सोबतीला होतेच. मराठीच्या पुस्तकातल्या गोष्टी वाचून आमचे आम्ही संवाद तयार करायचो. चुकण्याची भीती नसायची. कारण, लिखित काही नसायचे. वेळ मारून नेणे तेव्हापासून शिकलो. ती आवड तशीच राहिल्याने पुढे याचं क्षेत्रात राहिलो. शेवटी बालपणात मनात जे रुजलेलं असतं ते सहज संपून जात नाही.
 
 
 
 
मराठी रंगभूमी
 
 
 
 
एक काळ होता, ज्याला आपण ‘रंगभूमीचा सुवर्णकाळ’ म्हणायचो. लोक आवडीने नाटक पाहायचे. आजही नाटक पाहणार्‍यांचा एक वर्ग आहे. पण, आजची पिढी, युवा फारसे नाटकांकडे वळताना दिसत नाही. त्यामागे नेमकी काय कारणं असावीत?
 
 
तुला एखादी गोष्ट आवडतच नसेल तर तिकडे जाशील का? तुझ्या विचारांना पटणारी नसेल, तुला लहानपणापासून सवय नसेल तर याविषयी तुला गोडी लागेल का? बघ, यातच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. होतं काय की, मुळात जर तुला नाटक चालवायचं असेल तर तसं वलय असलेला चेहरा पाहिजे किंवा प्रसिद्धीझोतातला नट हवा. आज तू पाहशील तर हे कलाकार आहेत, ते त्याच काळातले आहेत. नवीन कलाकारवर्ग तयार झालाच नाही. काही हातांच्या बोटावर मोजण्याइतके तरुण नाटकाकडे वळतात. त्यांच्या वयाचे नट जर काम करत असतील, तर ही पिढी कदाचित नाटकं पाहायला येऊ शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही जी नाटकं आहेत, ही जुन्या लेखकांनी लिहिलेली आहेत. त्यांचा काळ जुना आहे. जुन्यांना भावणारा आहे. तरुणांना मात्र तो परिचित नाही. त्यांना तो काळ त्यांचा वाटतच नाही. बाकी नेपथ्य म्हणायचे झाले, तर जशी जशी सुबत्ता आली, जसे नवे तंत्रज्ञान आले, तसे बदल घडलेत. आज नेपथ्य म्हटले, तर कुठेच नाव ठेवायला जागा नाही. फिरती घरं, फिरते राजवाडे, बॅकग्राऊंडला हलती चित्रं, प्रोजेक्टर सगळं वापरलं जातं. पूर्वी मांजरपाट रंगावून पडदा बनवायचे. आता मात्र दोन ते तीन वेगवेगळे ’सेट’ क्षणार्धात बदलता येईल इतकी परिस्थिती सुधारली आहे. आजही लिहिती मुले आहेत. बक्षीसही मिळवतात. पण, त्या एकांकिका, दोन-तीन अंकी नाटकं कोणी लिहीत नाहीत.
 
 
 
 
 
मराठी रंगभूमी

 
 
 
चित्रपट आणि मालिकांना नाटकांच्या तुलनेत चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. पण, प्रेक्षकांना रंगभूमीकडे वळवण्यासाठी काय बदल घडणं अपेक्षित आहे? प्रेक्षकांचा आणि कलाकारांचाही नाटकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलेल?
 
 
आजच्या तरुण पिढीला मीडिया इतका ‘व्हास्ट’ मिळाला आहे की त्यांचा ‘कॅनव्हास’ विश्वव्यापी झाला आहे. म्हणजे आज मी इथे बसून जगातली कोणत्याही भाषेतली नाटकं, चित्रपट पाहू शकतो. त्यात विविधता आहे. घरबसल्या इतकं मिळतंय, तर मी त्यासाठी बाहेर का जाईन? कमी वेळात जास्त कंटेन्ट, क्वॉलिटी कंटेन्ट, वैविध्य आणि हे सगळं घरबसल्या. कुठेही जायला नको. काम करायचं म्हटलं, तर ‘रिहल्सल’साठी वेळ देण्यापेक्षा कॅमेरासमोर शॉट ’ओके पटकन होतो. पैसे तुलनेत जास्त मिळतात. या क्षेत्रात तसा पैसा कमी आहे.
 
 
‘बॅकस्टेज’ कलाकारांचं यात काय योगदान असतं?
 
 
आधी पाया, मग कळस. म्हणजे पाया नाही तर कळस येणार कुठून? ‘बँकस्टेज’ कलाकारांचं महत्त्व इतकं आहे, त्यांच्याशिवाय नाटक उभंच राहू शकत नाही. जर आयत्यावेळी लाईट हवा तो पडला नाही, तर तू कितीही अप्रतिम अभिनय कर, काळोखच दिसणार आहे. नेपथ्य म्हटलं तर घडवणारा घडवतो, पण स्टेजवर खूप कमी वेळात त्याच्यात बदल केले जातात. त्यात काही तुटू नये, चुकू नये, याची फार काळजी घेतली जाते. ‘ड्रेपरी’ म्हणजे कपडे पटाचा माणूस, कोणत्यावेळी किती वेळात कसे कपडे तयार ठेवायचे, हे जमलं पाहिजे. मुळात नाटक हे ‘टीमवर्क’ आहे. कारण, हे पडद्यामागचे कलाकारच अभिनेत्यांच्या अभिनयात जीवंतपणा ओततात.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.