निर्जीव भिंतींना जीवंत करणारा अवलिया

    04-Nov-2022   
Total Views |
 
किरण वानखेडे
 
 
 
अठराविश्व दारिद्—य असतानाही कलेची कोणतीही पदवी न घेता कलाविश्वात आपला स्वतंत्र ठसा उमटवला. जाणून घेऊया निर्जीव भिंतींना जीवंत करणार्‍या पुण्यातील किरण वानखेडे यांच्याविषयी...
 
 
 
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात जन्मलेल्या किरण पिराजीराव वानखेडे यांची आई घरकाम, तर वडील शिवणकाम करून घर चालवत. कै. विश्वनाथराव नळगे विद्यालयातून त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पाचवीत असताना सायकलवर स्वतःचे नाव टाकण्यासाठी त्यांच्याकडून दत्तात्रय वाघमारे यांनी 50 रुपये घेतले. त्यावेळी आपले अक्षर सुंदर असून आपणही हे करू शकतो, असे किरण यांना वाटले आणि शाळा सुटल्यानंतर ते त्या दुकानात जाऊन निरीक्षण करू लागले. हळूहळू किरण त्यांना मदत करू लागले. अक्षरलेखनाच्या प्राथमिक गोष्टी त्यांनी शिकून घेतल्या. इयत्ता नववीत हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांनी लगीनघरी रंगकाम आणि अक्षरलेखनाची कामे घेण्यास सुरुवात केली. किरण यांना उत्तम काम जमत नाही, म्हणून एकदा काम नाकारल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. गावामध्ये त्यांनी फक्त रंग साहित्याचे पैसे घेऊन काम करून देण्यास सुरुवात केली.
 
 
 
याचदरम्यान दत्तात्रय यांनी मूर्ती व्यवसायात पदार्पण केल्याने त्यांचे शिकणेही बंद झाले. थर्माकोलवर वधू-वरांची नावे काढणे जमत नसल्याने ते परिसरातील कलाकाराकडे गेले. परंतु, त्यांनी स्पर्धक तयार होईल म्हणून शिकवले नाही. शेवटी युट्यूबवर व्हिडिओ पाहून किरण शिकले. शिक्षणासाठी किरण छत्रपती संभाजीनगरला मामाकडे राहू लागले. शिवाजी हायस्कूलमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यानंतर एकदा जीवशास्त्राच्या शिक्षकांनी त्यांची वही तपासताना रागाने फेकून दिली. ‘प्रिंट’ छापून आणून आकृत्या काढतो, असा आरोप त्यांनी केला. परंतु, किरण यांनी ते खोडरबराने खोडून दाखवत आकृत्या स्वतः काढल्याचे सिद्ध करून दाखवले. त्यावर त्या शिक्षकांनी किरण यांच्या चित्रकलेचे तोंडभरून कौतुक केले. पुढे बारावीनंतर त्यांनी पुन्हा गावी परतत जगन्नाथराव शिंदे महाविद्यालयात ‘बी.सीए’साठी प्रवेश घेतला.
 
 
 
शिक्षणासोबत रंगकाम करून देणे, घरांवर नावे टाकणे, लग्नात भिंतींवर चित्र काढणे, अशी कामे करण्यास त्यांनी सुरुवात केली. ‘बी.सीए’ करत असताना ‘हार्डवेअर नेटवर्किंग’, ‘इथिकल हॅकिंग’, ‘प्रोग्रामिंग सी’ आदी कोर्स केले. आता शिक्षण घेतले म्हणजे पुण्यात नोकरी लागणार, असे समजून चार हजार रुपये सोबत घेऊन ते पुण्यात मित्राकडे आले. जेमतेम इंग्रजीमुळे सतत नोकरीत नकार मिळत. पैसे संपत आले होते आणि खाण्यापिण्याचा, राहण्याचा प्रश्न समोर होता. आपण एक कलाकार आहोत आणि त्यात करिअर करू शकतो, याची कल्पनाही किरण यांना नव्हती. अखेर त्यांना एका ‘कॉल सेंटर’मध्ये साडेसात हजार रूपये पगाराची नोकरी लागली. चांगली नोकरी लागेल, या आशेने एमबीएलाही प्रवेश घेतला. एकदा त्यांचे मित्र देवेशच्या घरी सहज जाणे झाले. योगायोगाने तिथे रंगकाम सुरू होते. त्यावेळी मित्राच्या वडिलांना भिंतींवर निसर्गचित्र काढून हवे होते. परंतु, त्या कलाकाराने त्याला येत नाही, असे सांगितले. खर्च विचारला असता त्याचे दहा हजार रूपये होऊ शकतात, असे सांगितले. त्यावर मित्राच्या वडिलांनी संपूर्ण घराला रंग दिल्याचे 20 हजार होतात आणि एका भिंतीवर चित्र काढायचे दहा हजार कसे होतील, असा प्रश्न विचारला. त्यावर त्या कलाकाराने कलेला किंमत खूप आहे, असे सांगितले. तिथे बसलेल्या किरण यांच्या डोक्यात हे वाक्य फिट्ट बसले. देवेशकडे विनंती करून किरण यांना ते काम मिळाले. याआधी असे काम केले नव्हते.
 
 
 
परंतु, तरीही दोन दिवसांत त्यांनी ते चित्र पूर्ण केले. त्यावेळी किरण यांना चांगले पैसे मिळाले. आताच्या आता नऊ हजारांचे काम देतो, परंतु, ‘कॉल सेंटर’ची नोकरी सोडण्याचा आग्रह देवेशच्या वडिलांनी केला. त्याला हमी भरत किरण यांनी तीही कामे पूर्ण केली. पुढे लोकांच्या अपेक्षा वाढल्याने त्यांनी युट्यूबवरून वेगवेगळ्या डिझाईन्स शिकून घेतल्या. किरण यांनी स्वतः घराला रंग देण्याची कामेही घेतली. 2017 साली पैशांसाठी चार मजली इमारतीच्या जिन्यामध्ये त्यांनी अवघ्या तीनशे रूपयांत रंगकाम करून दिले. पुढे त्यांनी फेसबुकवर ‘मार्केटिंग’ सुरू केले. अभिजित जगदाळे यांच्या सल्ल्यानंतर पहिली ‘पोस्ट’ टाकताच किरण यांना चार दिवसांत तब्बल साडेतीन हजार फोन आले. कामाचा व्याप वाढला आणि प्रसिद्धी वाढली. सध्या ते झाडे, वारली पेंटिंग, शिवाजी महाराज, महादेव असे अनेक चित्रप्रकार हाताळतात. किरण सध्या ‘स्केच’ न काढताही थेट भिंतीवर चित्र काढतात. ज्या डिझाईनला त्यांना तीन दिवस लागायचे, ती आता ते केवळ 15 मिनिटांत पूर्ण करतात. ‘अ‍ॅक्रेलिक’ आणि ’ऑईल पेंट’ या प्रकारात त्यांनी आतापर्यंत 500 हून अधिक चित्रे काढली आहे. मध्यंतरी आई-वडिलांच्या निधनानंतर किरण अनाथ झाले.
 
 
 
परंतु, त्यांनी संघर्ष सुरूच ठेवला. त्यांना याकामी ऋषिकेश महाबळे, गुजलवार या शिक्षिका, देवेश किशन प्रजापती यांचे सहकार्य लाभले. पुढे मार्बल पेंटिंग शिकण्याचा प्रयत्न किरण करत असून मूर्तींचा कारखाना सुरू करण्याचाही त्यांचा मानस आहे. आपल्याकडे काहीतरी कला आहे, हे कोणीतरी सांगणारे हवे. आपल्यातली कला ओळखता आली पाहिजे. कोणतेही काम छोटे नसते, असे किरण सांगतात. कलेची कोणतीही पदवी हाताशी नसताना उत्तम कलाकार म्हणून ओळख मिळवलेल्या किरण यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.