मुंबई : भारताच्या ऑटोमोटिव्ह उद्योगातील दिग्गज कार्यकारी आणि देशातील टोयोटाचा चेहरा समजले जाणारे विक्रम किर्लोस्कर यांचे वयाच्या ६४ व्या वर्षी निधन झाले. प्राथमिक माहितीनुसार, विक्रम किर्लोस्कर यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला.
टोयोटा इंडियाने ट्विट करून दिली माहिती...
टोयोटा इंडियाने आपल्या सोशल मीडिया हँडलवर या दुःखद बातमीची माहिती दिली आहे आणि या निवेदनात असे म्हटले आहे की, टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचे २९ नोव्हेंबर २०२२ रोजी अकाली निधन झाले आहे आणि आम्हाला याचे खूप दुःख झाले आहे. या दुःखाच्या काळात त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच सर्वांनी प्रार्थना करावी. आमची सहानुभूती त्यांच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत आहे. त्यांच्या पार्थिवावर 30 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता हेब्बल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विक्रम किर्लोस्कर यांच्या पश्चात पत्नी गीतांजली किर्लोस्कर आणि मुलगी मानसी किर्लोस्कर असा परिवार आहे. विक्रम किर्लोस्कर हे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे पदवीधर होते आणि त्यांनी CII, SIAM आणि ARAI मध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. विक्रम किर्लोस्कर हे किर्लोस्कर समूहाच्या चौथ्या पिढीचे प्रमुख होते. ते किर्लोस्कर सिस्टम्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. याशिवाय ते किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे उपाध्यक्षही होते.