शतकानुशतकांच्या संस्कृतीचा अस्सल ब्रॅण्ड ‘पायताण’

    03-Nov-2022   
Total Views |
 
पायताण
 
 
 
 
भारत हा एक असा देश आहे की, प्रत्येक प्रदेशाला त्याची अशी स्वतःची एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती. या संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकारे यासाठी अनेक योजना राबवत असतात. पण, फारच कमी ठिकाणी या संस्कृती संवर्धनाला व्यावसायिक ‘टच’ देऊन त्यातून एक अस्सल ब्रॅण्ड तयार करण्याचा विचार केला जातो. अशीच महाराष्ट्राची अस्सल संस्कृती आहे. खाद्यपदार्थांमध्ये पुरणपोळी, मोदक ते जागतिक पातळीवर पोहोचलेली आपली पैठणी अशा खूप गोष्टी आहेत, ज्या आपल्या महाराष्ट्राच्या अस्सल संस्कृतीदर्शक म्हणून ओळखल्या जातात. यात अजून एक गोष्ट आहे, जिला कमीत कमी 700 वर्षांची परंपरा आहे. ती आहे कोल्हापुरी चप्पल. आपल्या अस्सल कोल्हापुरी ढंगाच्या भाषेत ’पायताण’ याच नावाने हा एक अस्सल आपल्या मातीतला ब्रॅण्ड आणलाय अनुराग कोकितकर यांनी. ’पायताण’ या कोल्हापुरी चप्पल बनवण्याच्या स्टार्टअपमधून त्यांनी नवी ओळख तयार केली आहे. त्यांच्याविषयी...
 
 
 
अनुराग कोकितकर यांच्या मनात अशा प्रकारच्या एक ब्रॅण्डची सुरुवात बंगळुरुला ‘सिम्बॉयसिस’ला व्यवसाय व्यवस्थापनाचे शिक्षण घेत असतानाच झाली. मुळात अनुराग यांचा विषय हा ब्रॅण्डिंग, अ‍ॅडव्हर्टायझिंग हाच होता. यानिमित्ताने देशभरातील अशा अनेक ब्रॅण्ड्सची त्यांची ओळख झाली. भारतातल्या कानाकोपर्‍यातील त्या-त्या मातीतील, राज्यांची संस्कृती जपणारा आणि त्या राज्याची ओळख म्हणून समजला जाऊ शकेल, असा एकतरी ब्रॅण्ड आहे. मग अनुराग यांच्या मनात विचार सुरु झाला की, मग आपल्या महाराष्ट्राचा असा कुठला ब्रॅण्ड आहे की, जो महाराष्ट्राची ओळख म्हणता येऊ शकेल? तेव्हा अनेक गोष्टी त्यांच्यासमोर येऊन गेल्या, त्या पैठणीपासून ते अस्सल खाद्यपदार्थही समोर आले, पण मूळ कोल्हापूरचे असल्यामुळे त्यांच्या समोर आल्या त्या आपल्या कोल्हापुरी चपला. आपल्या कोल्हापुरी चपला सर्व जगभर पसरल्या आहेत, पण या कोल्हापुरी चपलांच्या क्षेत्रात असा कुठलाही ब्रॅण्ड नाही की, ज्याच्या नावाने कोल्हापुरी चपला ओळखल्या जातील. त्यामुळे 2013 पासून हा अस्सल कोल्हापुरी चपलांचा ब्रॅण्ड म्हणून अनुराग यांनी ‘पायताण’ची सुरुवात केली.
 
 
 
‘सिम्बॉयसिस’ला अभ्यास करत असताना अनुराग यांनी जगातील सर्वच मोठ्या ब्रॅण्ड्सचा अभ्यास केला होता. त्यावेळी त्यांच्या असे लक्षात आले की, हे सर्व मोठे ब्रॅण्ड्स त्यांची त्यांची परंपरा, त्यांची त्या-त्या प्रॉडक्टची अस्सलता टिकवून ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतात. त्यांच्या या अस्सलतेमुळेच त्यांच्या त्या ब्रॅण्ड्सच्या वस्तूंना खूप मागणीही असते. त्याचवेळी त्यांची किंमतही त्यामुळे जास्त असते. पण, महाराष्ट्राच्या या अस्सल मराठमोळ्या उत्पादनाबद्दल आपल्याला असे काही ऐकायला मिळत नाही. कारण, आपण तसा विचारच केला नाही. तेव्हा तोच विचार यात आणण्यासाठी अनुराग यांनी आपल्या ‘पायताण’ची सुरुवात केली. सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे की, सध्या बाजारात कोल्हापुरी चप्पल म्हणून जी चप्पल मिळते, ती मुळात अस्सल कोल्हापुरी चप्पल नाही. जी सध्या बाजारात मिळते, ती अत्यंत कमी दर्जाची चप्पल मिळते. आता या गोष्टीला कारणीभूत असंख्य कारणे आहेत. जेव्हा बाजारात नवे अतिशय स्वस्त, कमी दर्जाच्या चपलांचे ब्रॅण्ड्स विकायला आले तेव्हा त्या स्वस्त मालाशी स्पर्धा करण्यासाठी, कोल्हापुरी चप्पल बनवणार्‍यांनी तसाच स्वस्त माल वापरून चप्पल बनवण्यास सुरुवात केली. पण, बाजार स्पर्धेत त्यांचे दुर्लक्ष झाले ते कोल्हापुरी चपलेची अस्सलता जपण्याकडे!
 
 
 
मुळात ही कोल्हापुरी चप्पल कोल्हापूरच्या आसपासच्या गावांमध्ये बनवली जाते. ही चप्पल शिवणारे ते कलाकार गेल्या सात -आठ पिढ्यांपासून ही कला शिकत आले आहेत आणि पिढ्यान्पिढ्या ते ती कला जपत आले आहेत. त्यामुळे त्यांचे याच्याशी भावनिक नाते जोडले गेले आहे. त्यामुळे जेव्हा अनुराग यांनी याचा व्यवसाय करण्यासाठी या कलाकारांकडे गेले, तेव्हा मुळात त्यांना या व्यवसायाच्या परिभाषेत आणणे खूप मोठे जिकरीचे काम होते. पण, अनुराग यांनी यावरही उपाय शोधला तो म्हणजे त्यांनी आपल्या फॅक्टरीमध्ये आपल्याला हव्या असलेल्या चपलेचे माप, रंग, तशीच कलाकुसर कायम ठेवण्यासाठी त्यांनी एक साचा करून घेऊन तशा पद्धतीने चपला बनविणे चालू केले. ज्यामुळे ही चप्पल शिवणार्‍या कलाकारांकडून काम करून घेणे सोपे जाईल. अशा पद्धतीने अनुराग यांचे काम चालते. यात अजून एका समस्येचा सामना अनुराग यांना करावा लागला तो म्हणजे, या कलाकारांकडून काम वेळेवर करून घेणे, कलाकारांवर गावखेड्यातील समज - गैरसमजांचा पगडा या सर्वच गोष्टींचा सामना त्यांना करावा लागला. त्यातून हळूहळू त्यातून मार्ग काढत अनुराग यांनी आपला व्यवसाय वाढवत नेला.
 
 
 
 
 
पायताण
 
 
 
 
 
सुरुवातीला अनुराग यांनी आपला व्यवसाय सुरू केला तेव्हा ते फक्त विक्रेते म्हणून काम करत होते. पण, पुढे जेव्हा त्यांनी ‘पायताण’ हा ब्रॅण्ड बनवण्याचा विचार केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, आपल्याला आपले स्वतःचे उत्पादन करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांनी आपले स्वतःचे ‘प्रॉडक्शन युनिट’ सुरू केले. तिथे आपल्याला लागणार्‍या चपलांसाठीचे चामडे मिळवणे, त्यांचे माप तयार करण्यासाठीचे साचे तयार करणे ही कामे केली जातात. पुढे या चपला त्या-त्या कारागिरांकडे पाठवल्या जातात, तिथे त्यांच्यावर कलाकुसर केली जाते, विणकाम केले जाते आणि त्यानंतर ती चप्पल विकण्यासाठी पाठवली जाते. या सर्व गोष्टींमध्ये अनुराग यांचा अजून एक कटाक्ष होता तो म्हणजे, ज्या पद्धतीने जागतिक दर्जाचे ब्रॅण्ड्स आपली अस्सलता, आपला इतिहास, आपले वैशिष्ट्य यांनाच आपली ओळख बनवतात, त्याचप्रमाणे ‘पायताण’च्या कोल्हापुरी चपला या आपली अशीच ओळख जपत आहेत.
 
 
 
या सगळ्या प्रयत्नांच्या मुळाशी अनुराग यांची ही परंपरा संवर्धनाची कळकळ. जवळपास 700 वर्षांची परंपरा असलेली ही कोल्हापुरी चप्पल शिवण्याची कला टिकवायची असेल तर त्या कारागिरांना चांगले अर्थार्जन त्यातून होईल, याकडे लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे अनुराग यांनी ही चप्पल विकताना त्याच्या किमतीही अशाच विचाराने ठरविल्या आहेत की, ज्यातून त्या कलाकारांना एक समाधानकारक उत्पन्न मिळेल, जेणेकरुन नसून तरुण पिढीही या व्यवसायाकडे येईल आणि ही कला शिकण्यात रस दाखवतील. अनुराग यांच्या या प्रयत्नांना यश मिळण्यास सुरुवात झाली आहे. नवीन अगदी केंद्र सरकारच्या कौशल्य विकास केंद्रांतून प्रशिक्षण घेऊन आलेले तरुणही या क्षेत्राकडे वळत आहेत, ही एक अत्यंत आश्वासक गोष्ट अनुराग यांच्या प्रयत्नांतून घडत आहे. या पुढच्या काळात अनुराग यांना ‘पायताण’ हा जागतिक दर्जाचा कोल्हापुरी चपलांचा ब्रॅण्ड बनवायचा आहे. त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत, ज्यात लोकांना या ब्रॅण्डबद्दल जागृत करणे, याशिवाय हे व्यवसायाचे मॉडेल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधणे यांसारख्या गोष्टी अनुराग करत आहेत.
 
 
 
“नवीन व्यावसायिकांनी कायम हे लक्षात ठेवले पाहिजे की, आपला व्यवसाय हा आपल्या आजूबाजूलाच दडलेला असतो. फक्त आपल्याला ती शोधक नजर मिळवावी लागते किंवा विकसित करावी लागते. एकदा का व्यवसाय उभा राहिला की मग तो कसा वाढवायचा, याचे तंत्र आपले आपण विकसित करणे गरजेचे असते. त्यातूनच कुठलाही व्यवसाय उभा राहू शकतो. हेच यशस्वी व्यवसाय उभारणीचे सूत्र आहे. हे लक्षात ठेवले पाहिजे,” असे अनुराग आपल्या नवउद्योजक मित्रांना सांगतात. याच मार्गावरून अनुराग स्वतःची वाटचाल यशस्वीरीत्या करत आहेत.
 
 
 
व्यवसायाच्या मळलेल्या वाटा सोडून आपली वाट तयार करण्याचा मार्ग कठीण जरूर असतो, पण तोच मार्ग कायम चिरकाळ टिकणार्‍या यशाकडे घेऊन जातो, हे अनुराग कोकितकर यांच्या ‘पायताण’ या ब्रॅण्डच्या कथेतून सिद्ध होते.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

हर्षद वैद्य

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये उपसंपादक (वेब आणि प्रिंट) म्हणून कार्यरत. रुईया महाविद्यालयातून गणित या विषयात पदवीचे शिक्षण घेतले. आर्थिक क्षेत्राशी संबंधित वृत्तांकन आणि लेखन. भारतीय संगीत, इतिहास या विषयांमध्ये विशेष रस. महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य. अर्थशास्त्र विषयात महाविद्यालयात संशोधन केले आहे. शैक्षणिक, सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्राचाही अनुभव.