युगांडातील बालिका...

    29-Nov-2022   
Total Views |

Uganda



“मला कुणीतरी सूचना दिली की, तिथे बालविवाह होत आहे. मी तिथे गेले आणि सात बालविवाह थांबवले. त्यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई केली. कारण, नवीन 2016च्या कायद्यानुसार 18 वर्षांखालील मुलामुलींचा विवाह होणे हे बेकायदेशीर आहे. मी ज्या सात विवाहांवर कारवाई केली, त्यामध्ये एक वधू तर केवळ नऊ वर्षांची होती.” कालपरवाच युगांडाच्या ‘जेंडर अ‍ॅण्ड कल्चरल’मंत्री पिस मुटूझों यादनी माहिती दिली. भयंकर. बालविवाहाच्या बाबतीत आफ्रिका खंड आघाडीवर आहे.


त्यातही नायजेरियाचा अग्रक्रम आहे. त्या तुलनेत बालविवाहाच्या कुप्रथेत युगांडाचा 16वा क्रमांक लागतो. इथे 40 टक्के मुलींचा विवाह वयाच्या 18व्या वर्षाआधीच होतो, तर 25 टक्के किशोरी गर्भवती तरी आहेत किंवा त्यांना पहिले मूल तरी झालेलेआहे. या सगळ्यानुसार हे सिद्ध होते की, युगांडामध्ये दिवसांला चारपैकी एका बालिकेला या कुप्रथेचा बळी व्हावे लागते.



‘सेव्ह द चिल्ड्रन’ या संस्थने 2021 मध्ये ‘ग्लोबल गर्लहुड रिपोर्ट’ 2021 अहवाल प्रकाशित केला होता. त्यानुसार बालविवाहाच्या दुष्परिणामामुळे जगभरात दरवर्षी 22 हजार बालिका मृत्युमुखी पडतात. याचाच अर्थ दर दिवशी 60 बालिकांचा मृत्यू होत आहे. त्यापैकी एकट्या आफ्रिका खंडात 9 हजार, 600 बालिका मृत्युमुखी पडतात. बालपणी नशिबी आलेले मातृत्व, त्यामुळे झालेले शरीरावर आणि मनावर परिणाम, कुपोषण, लैंगिक आजार, बाळंतरोग या आणि अशा अनेक कारणामुळे या बालिका हकनाक मरत आहेत. या अहवालानुसारआफ्रिका खंडात बालविवाहाचे प्रमाण वाढत चालले आहे, तर आशिया खंडात आता चित्र बदलत आहे. आशिया खंडात बालविवाहाचे प्रमाण 30 टक्क्यांनी घटले आहे.


असो. आज जगात महिला आणि मुलींसंदर्भात खूप काही घडत आहे. मुस्लीम देशांमध्ये तर आजही माणूस म्हणून महिलांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. आम्हाला शाळा शिकू द्या म्हणून अफगाणिस्तानमध्ये मुली तालिबान्यांना विनंती करत आहेत, तर इराणमध्ये ‘हिजाब’च्या विरोधात मुली-महिला रस्त्यावर आल्या आहेत. इराण क्रूरपणे या महिलांचे आंदोलन चिरडू पाहत आहे. दुसरीकडे अमेरिकेमध्ये महिलांना गर्भपाताचा हक्क असावा की नसावा यावरच राजकारण फिरत आहे. ज्याला अविकसनशील खंड म्हणू असा आफ्रिका. यामध्ये तर गरिबी आणि अज्ञानाचा महापूर आजही आहे. त्यातच दहशतवाद्यांनी या खंडातील देशाचे कंबरडे मोडले आहे. नशा, अंधश्रद्धा यांच्या आहारी जात इथे मुलींवर अत्याचार होत आहेत.



आता हेच पाहा ना युगांडा देशाच्या मंत्री असलेल्या महिलेला जाहीररित्या सांगावे लागले की, तिने सात विवाहांवर कारवाई केली. तसे पाहायला गेले, तर युगांडामध्ये हे काही नवीन नाहीच. 1962 साली युगांडा ब्रिटनपासून स्वतंत्र झाला. युगांडामध्ये अनेक जमातीचे लोक राहायचे. पण ब्रिटनची सत्ता संपेपर्यंत युगांडामध्ये 80 टक्क्यांपेक्षा जास्त लोक रोमन कॅथलिक झाले होते. उरलेले मुस्लीम झालेे, तर बहुसंख्य ख्रिस्तीधर्मीय असलेल्या या देशातील ग्रामीण भागात आजही 8 ते 13 वर्षांपर्यंतच्या मुलींना संपत्ती मानले जाते. कारण, या वयातल्या मुलींशी विवाह करण्यासाठी इच्छुक वरपक्ष मुलींच्या पालकांना जास्तीत जास्त भरपाई देतो.


ही भरपाई किंवा संपत्ती काय? तर पशुधन. या वयातल्या मुलींशी विवाह करण्यासाठी वरपक्ष 12 ते 13 गाय बैल आणि इतर पशुधन देतो. जर पालक विवाहाला तयार नसतील, तर इच्छुक वर या बालिकेचे अपहरण करतो. अपहरण केल्यानंतर इथल्या रितीनुसार ती बालिका त्याची पत्नी होऊ शकते. या अशा प्रकरणात पालकांना मुलीच्या बदल्यात जास्त काही मिळत नाही. त्यामुळे मग पालक मुलींच्या विवाहाचा प्रस्ताव आला की, तिचे लग्न करण्याला संमती देतात. एका सर्वेक्षणानुसार,युगांडाच्या ग्रामीण भागात अशा प्रकारे बालिकावधू झालेल्या मुलींच्या पतीचे याआधीही दोन-तीन विवाह झालेले असतात. लहान मुलींशी विवाह केला, तर आपले तारूण्य टिकेल, तसेच बालिकेशी कसेही वागले तरी ती विरोध करणार नाही, तिला मजूर किंवा आधीच मोठ्या असलेल्या कुटुंबात विनावेतन घरकाम करण्यासाठीही वापर करता येईल, असे यामागचे कारण. काही वेळा तर या मुलींना जबदरस्तीने देहविक्रीच्या धंद्यातही लोटले जाते. बिचार्‍या बालिका. आठ आणि नऊ वर्षांमध्ये यांचे बालपण कुस्करले जाते. युगांडा आणि आफ्रिका खंडातील या बालिकांचा विचार कुणी करेल का?




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.