चीनी जागे होताय, हेही नसे थोडके

    28-Nov-2022   
Total Views |

China




चीनची सूत्रे पुन्हा एकदा शी जिनपिंग यांनी स्वतःकडे ठेवल्यानंतर चीनमध्ये अंतर्गत गटबाजी आणि रस्त्यावरील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. कोरोनासारखी गंभीर आपत्ती जगाला दिल्यानंतर चीनने देशात अत्यंत कठोरातील कठोर नियम लोकांवर अक्षरशः लादले. लोकं घराबाहेर पडू नये म्हणून बाहेरून कुलूप लावण्याचे उद्योगही चीनने करून पाहिले. चीनपेक्षा अन्य लहानसहान देशांना चीनच्या या चुकीचा मोठा फटका बसला.


मोठमोठ्या अर्थव्यवस्थादेखील संकटात सापडल्या. नुकतीच ब्रिटनचे नवनिर्वाचित प्रधानमंत्री ऋषी सुनक यांनीही ब्रिटनमध्ये मंदीची घोषणा केली. त्यामुळे कोरोनामुळे झालेले परिणाम निश्चितच भयावह होते, याची प्रचिती येते. परंतु, आता जग या महामारीतून सावरत आहे. अनेक देशांनी आपले कोरोना निर्बंध शिथिल केले. तसेच, काही देशांनी निर्बंधही हटवले. परंतु, चीनमध्ये वेगळाच सावळागोंधळ सुरू आहे.


चीन देशात अजूनही कोरोना धोरण कठोरपणे राबवत आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम तेथील जनतेवर होत आहे. त्यामुळे संतप्त झालेली जनता आता रस्त्यावर उतरू लागली आहे. चीनच्या कोरोना धोरणामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास शांघाय शहरात जोरदार निदर्शने केली. यावेळी संतप्त झालेले नागरिक शांघायमध्ये लावण्यात आलेले ‘लॉकडाऊन’ तोडत घराबाहेर पडले. या सर्वांनी चीनमधील डाव्या सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आपला तीव्र संताप व्यक्त केला.


उरुमकी येथील एका अपार्टमेंटमध्ये आग लागल्यानंतर ही निदर्शने सुरू झाल्याचे सांगण्यात येत असून यावेळी मोठ्या संख्येने लोकांनी रस्त्यावर उतरत ‘सीसीपी’ सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संतप्त नागरिकांनी डाव्या सरकारला आव्हान देत खुर्ची सोडण्यास सांगितले. कम्युनिस्ट पक्षाने खुर्ची सोडावी, शी जिनपिंग खुर्ची सोडा, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. चीनच्या ‘झिरो कोविड’ पॉलिसीचा विरोध करताना चिनी नागरिक म्हणाले की, आम्हाला ‘पीसीआर’ चाचणी करायची नाही, आम्हाला आता आमचे स्वातंत्र्य हवे आहे. लवकरात लवकर हे ‘लॉकडाऊन’ संपवा.

पोलिसांसमोर सुरू असलेल्या घोषणाबाजीवर पोलिसांनीही शांत राहणेच पसंत केले. यावेळी पोलीसदेखील आश्चर्यचकित झाले. कारण, याआधी शी जिनपिंग यांचा एवढा तीव्र विरोध करण्याची हिंमत कुणाचीही झाली नव्हती. गेल्या कित्येक दशकांपासून चीनी जनता लोकशाहीच्या आड लपलेल्या हुकूमशाहीला सहन करत आली आहे. जो सरकारविरोधात आवाज उठवेल त्यावर चीनमध्ये कारवाई होते. त्यामुळे सहसा कोणीही सरकारविरोधात जायला तयार नव्हता. कोरोनाला स्वतः कारणीभूत असणार्‍या चीनला सुरुवातीला त्याची झळ बसली नाही.


परंतु, जगभरात कोरोना कमी होत असताना गेल्या काही महिन्यांपासून चीनमध्ये पुन्हा एकदा हजारोंच्या संख्येने कोरोना रूग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आधीच ‘लॉकडाऊन’ला कंटाळळेल्या चिनी नागरिकांना पुन्हा एकदा ‘लॉकडाऊन’ला सामोरे जावे लागले. त्यामुळे हे ‘लॉकडाऊन’ संपवण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध केला. दरम्यान, ज्येष्ठ अमेरिकन पत्रकार जॉयस करम यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर या निषेधाची छायाचित्रे शेअर केली आहेत. चीनचे सर्वात मोठे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या शांघाय शहरात ‘कोविड-19’ निर्बंधांविरोधात निदर्शने झाली आहेत.


यावेळी चिनी नागरिकांनी आम्हाला स्वातंत्र्य द्या, अशी घोषणाबाजी केल्याचे करम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करत या सर्व आंदोलकांचे कौतुक केले. स्वातंत्र्यासाठी घोषणाबाजी करणार्‍यांना पोलिसांनीही थांबवले नाही. शी जिनपिंग यांच्या हुकूमशाही वृत्तीमुळे आता चिनी नागरिकांचा संयम संपला आहे का, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे.


मागील आठवड्यात गुरूवारी चीनमध्ये ‘लॉकडाऊन’दरम्यान रात्री एक मोठी दुर्घटना घडली. 21 मजली रहिवासी इमारतीला आग लागून त्यात दहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. यात नऊ जण जखमी झाले. ‘लॉकडाऊन’मुळे मदतकार्याला मोठा अडथळा आला. या घटनेनंतर लोक संतप्त झाले आणि त्यांनी सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आवाज उठवला. यापूर्वी चीनमध्ये शी जिनपिंग यांची पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी निवड होत असताना त्यांना विरोध सहन करावा लागला. त्यांच्याविरोधात पोस्टरबाजी, घोषणाबाजी झाली होती. त्यामुळे आता जिनपिंग यांच्या हुकूमशाहीविरोधात चिनी नागरिक आवाज उठवत आहेत, हेही नसे थोडके.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.