स्मरण क्रांतिसूर्याचे...

    26-Nov-2022   
Total Views |
 
महात्मा जोतिबा फुले
 
 
 
 
भारतीय समाजमनाचा सांगोपांग अभ्यास करून त्यावर नुसती टिकाटिप्पणी न करता समाजाचे उत्थान करणारे महात्मा जोेतिबा फुले. महाराष्ट्राच्या नव्हे, तर मानवतेच्या इतिहासात मानवी मूल्यांसाठी आयुष्यभर संघर्ष करणार्‍यामध्ये जोतिबांचे नाव अग्रक्रमाने येत राहील.  28 नोव्हेंबर रोजी महात्मा जोतिबा फुले यांची पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांच्या विचारकार्याचा संक्षिप्त वेध घेण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे....
 
 
आज महात्मा जोतिबा फुले पूजनीय आहेत, कारण त्यांनी जे विचार मांडले तेवढे ते केवळ बोलले असे झाले नव्हते, तर ते विचार प्रत्यक्षात कृतीत उतरविण्यासाठी ते प्रयत्न करत. विचारांना मूर्त स्वरूपात समाजामध्ये सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी प्रचंड संघर्ष केला. जोतिबा म्हणत, ”प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहोचू शकतात, ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते.” जोतिबांनाही समतामय समाजाचे ध्येय गाठायचे होते. ज्या समाजात जातीभेद किंवा लिंगभेद नसेल असा समता, बंधुतायुक्त समाज त्यांना पाहायचा होता. हे त्यांचे ध्येयच होते म्हणा ना! त्या ध्येयासाठी त्यांनी आयुष्य पणाला लावले. कारण, त्यांच्या मते नवीन विचार तर दररोज येत असतात, पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे. चळवळीमध्ये साथ देणार्‍याचा नेहमी सन्मान करा, असे जोतिबा म्हणत. त्यामुळे समाजसुधारणेच्या चळवळीमध्ये जे जे त्यांच्यासोबत येत गेले, त्यांना जोतिबा जोडत गेले. तिथे ‘हा ब्राह्मण, तो मराठा, तो मागासवर्गीय’ असा भेद त्यांनी केला नाही. या पाश्वर्र्भूमीवर महात्मा जोतिबा फुल्यांचे नाव घेऊन पुणेरी पगडी नाकारणारे आणि जोतिबा फ क्तमाळी समाजाचे दैवत असे म्हणत समताबिमता बोलणारे नेते पाहिले की वाटते, या नेत्यांनाच महात्मा फुल्यांचे मोठेपण माहिती नाही.
 
 
विद्येविना मती गेली।
मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली।
गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले।
इतकेअनर्थ एका अविद्येने केले॥
 
 
विद्येचे महत्त्व इतक्या समर्पक शब्दात मांडणारे महात्मा जोतिबा फुले हे ज्ञानयोगी आणि तितकेच कर्मवीर.
आज आपण पाहतो की, अमुक एका घटनेवर मत मांडणारे किंवा ‘मला असे वाटते... असे झाले पाहिजे, तसे झाले पाहिजे....’ असे म्हणणारे आणि विचार मांडणारे पैशापासरी दिसतात. या पार्श्वभूमीवर ‘विचारवंत जोतिबा ते कर्मवीर जोतिबा’ हा जोतिबा यांच्या कृतिविचारांचा प्रवास नक्कीच विशेष आणि महत्त्वाचा आहे.
 
 
समानता असो की शिक्षणाचा अधिकार की अभिव्यक्ती स्वातंत्र्य, या सगळ्यासाठी जोतिबा आयुष्यभर लढले. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गुरू मानले होते. त्यामुळेच की काय भारतीय संविधानातल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये आणि हक्क कायद्यांमध्ये जोतिबा फुल्यांच्या विचारांचे अस्तित्व जाणवत राहते. अन्याय अत्याचाारविरोधात उभे ठाकणार्‍या प्रत्येक चळवळीमध्ये जोतिबा आज जीवंत आहेत, असे महात्मा जोतिबा फुले. त्यांचे पूर्ण नाव जोतिराव गोविंदराव फुले. त्यांचा जन्म दि. 11 एप्रिल, 1827 रोजी पुणे येथे झाला. मात्र, त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कटगुण हे होते.
जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई. जोतिबांचे आजोबा शेरीबा गोर्हे माधवराव पेशव्यांच्या दरबारात सजावटीचे कामकाज करत असत. यावर पेशव्यांनी त्यांना 35 एकर जमीन फुलांच्या व्यवसायासाठी दिली होती. यानंतर फुलांच्या व्यवसायामुळे गोर्हे घराण्याला ‘फुले’ म्हणून ओळखले जाऊ लागले. आजोबांच्या मृत्यूनंतर जोतिबांचे काका राणोजींनी सदरील 35 एकर जमीन हडप केली. यामुळे नंतर जोतिबांचे वडील गोविंदराव हे भाजीपाल्यांचा व्यवसाय करू लागले. घरची परिस्थिती, सामाजिक स्थान या सगळ्या वास्तवामध्ये जोतिबा यांनी अंतरीचे सत्य आणि विचार कधीच कोमेजून दिले नाहीत.
 
 
समतापूर्ण समाजाच्या समरस भावामध्ये जोतिबा आज जीवंत जोतिबा काही कोट्यधीश नव्हते की, त्यांचा जन्म राजादिकांच्या घरी झालेला नव्हता. पण, तरीही समाजसुधारणेसाठी त्यांच्या मनाची श्रीमंती आणि मनगटातली हिंमत ही कोणत्याही व्रिकमादित्य सम्राटापेक्षा कमी नव्हती.
 
 
मुलींनाही शिक्षणाचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली. दि. 3 ऑगस्ट, 1848 ते दि. 15 मार्च, 1852 या कालावधीत त्यांनी पुणे आणि सातारा या भागात एकून सात शाळा सुरू केल्या. महात्मा जोतिबा फुले यांनी आपल्या काही मित्रांना सोबत घेऊन सप्टेंबर 1853 मध्ये तथाकथित मागास समााजसाठी ‘मंडळी नामक’ संस्था स्थापन केली, तर 1955 मध्ये प्रौढांसाठी देशातील पहिली ‘रात्र शाळा’ त्यांनी स्थापन केली. दि. 19 मे, 1852 रोजी महात्मा फुलेंनी वेताळ पेठेत अस्पृश्यांसाठी भारतातील पहिली शाळा सुरू करून धुराजी चांभार व गणू शिवाजी मांग हे मागावर्गीय शिक्षक नेमले. यावेळी त्यांचे सहकारी सदाशिव गोवंडे, सखाराम परांजपे, विठ्ठल वाळवेकर, वामन प्रभाकर भावे, विनायक भांडारकर यांनी त्यांना मोलाची मदत केली. संत सांगून गेले की, ‘बोले तेसा चाले त्याची वंदावी पाऊले.’ त्यांना 1888 मध्ये जनतेने ‘महात्मा’ ही पदवी प्रदान केली. पुढे जनतेच्या मनातलेआणि देशाच्या इतिहासातले ते ‘महात्मा’ झाले. जाती आणि लिंग यांच्यावर कोणासोबत भेदभाव करणे एक प्रकारे पाप आहे, असे त्यांचे ठाम मत होते. देवधर्माबाबतही त्यांचे स्वतंत्र आणि प्रज्ञाशील विचार होत.
 
 
देव एक आहे आणि सर्व माणसे ही त्याची मुले आहेत आणि कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये, ही जोतिबांची शिकवण. जोतिबांनी दि. 24 सप्टेंबर, 1873 साली ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. जातीपाती यांची निर्मिती आणि त्याबद्दलचे तर्कसुसंगत विश्लेषण जोतिबांनी केले ते म्हणत ”केस कापणे हा नाव्ह्याचा धर्म नाही, धंदा आहे. चामड्यांना शिवणे हा चांभाराचा धर्म नाही, धंदा आहे. तसेच पूजापाठ करणे हा ब्राह्मणांचा धर्म नसून धंदाच आहे.”
 
 
असो. महात्मा जोतिबा फुलेंचा जीवनकाळ ज्या काळातला आहे, तो काळ म्हणजे इंग्रजांचा शिरकाव, त्यांचा दबाव... त्याचवेळी भारतीय समाजात बोकाळलेल्या अनिष्ट रूढी, समाजाला पटत नसूनही केवळ रूढी पाळल्या नाही, तर अनिष्ट होईल, अशी भीती वाटणारा समाज. बालविवाह,जठर बालिका विवाह, विधवा विवाहालाबंदी आणि काही ठिकाणी तर पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचे केशवपन आणि सतीदेखील जाणे. महिलांचे समाजात वागणे आणि जगणे अतियश दुय्यम दर्जाचेच. जोतिबांचे मोठेपण हेच म्हणावे लागेल की, त्यांच्या मनातीलकरूणा, दया, संवेदना ही सर्व प्रकारच्या भेदाभेदापासून दूर गेली होती. त्यामुळेच पुरुष असूनही महिलांवर होणारे अत्याचार, त्यांचे दुःख, त्यांचे अश्रू पाहून जोतिबांच्या मनात अपार दुःख उमटले. स्त्रियांना एक तर्‍हेचानियम लागू करणे व पुरुषांना दुसरा नियम लागू करणे, हा निव्वळ पक्षपातहोय, असे मानणारे जोतिबा मळलेल्या वाटेवरून गेले नाहीत, तर त्यांनी स्वत:च्या विचारांनी जीवन आणि समाजाचा दिशादर्शक पथ तयार केला.
संत तुकोबा म्हणतात, बुडता हे जन न देखवे डोळा! येतो कळवळा म्हणवुनी!!
 
 
जोतिबांच्या मनात असाच कळवळा, अशीच करूणा तमाम शोषित-वंचित समाजासाठी होती. त्याकाळी बालविवाह होत. अनेकदा बालपणीच मुली विधवा होत. मात्र, काहीवेळा त्यांचे शोषण होई. विधवा मुली गरोदर राहिल्या की एक तर त्यांना आड जवळ करावा लागे किंवा त्या निष्पाप बालकाला फेकून द्यावे लागे. या मुलीबाळींचा काय दोष? नरकासारखे जगणे त्यांच्या नशिबी का यावे? जोतिबांनी ठरवले, आधी केले आणि मग सांगितले. त्यानुसार दि. 8 जानेवारी, 1863 रोजी पुणे येथील आपल्या राहत्या घरी भारतातल्या पहिल्या ‘बालहत्या प्रतिबंधगृहा’ची स्थापना केली.
 
 
यानंतर पंढरपुरातही अशा गृहाची स्थापना केली. पुणे येथील बालहत्या प्रतिबंधगृहात काशीबाई नातू महिलेने एका मुलाला जन्म दिला. पुढे 1873 मध्ये याच मुलास फुले दाम्पत्याने दत्तक घेऊन त्याचे नाव यशवंत ठेवले. हाच यशवंत नंतर डॉक्टर झाला.1877 साली पुण्यातील धनकवडी येथे दुष्काळपीडित विद्यार्थ्यांसाठी कॅम्प उभारला. तसेच, ‘व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची’ स्थापना केली, तर पुढे दि. 8 मार्च, 1864 रोजी गोखलेंच्या बागेत विधवा पुनर्विवाह घडवून आणला. त्याकाळी विधवांची केशवपन करण्याची पद्धत होती. केशवपन केलेल्या त्या महिलांचा काय गुन्हा? पण, या महिलांचे घरचेही पारंपरिक रूढींमध्ये जखडलेले. त्यांना समजावून तरी किती सांगणार? जोतिबांनी काय केले तर विधवा स्त्रियांच्या केशवपनाची प्रथा बंद पाडण्यासाठी तळेगाव ढमढेरे व ओतूर येथे न्हाव्यांचा एक दिवसीय संप घडवून आणला.
 
 
शोषित-पीडित समाजघटकांसाठी अहोरात्र झिजणारे जोतिबा फुले हे त्यांच्या वैयक्तिक जवनातही नीतिमूल्य आणि आदर्शाची पाठराखण करण्यात कधीच कमी पडले नाहीत. मनुष्य सर्व प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि सर्व मानवांमध्ये स्त्री श्रेष्ठ आहे. महिला आणि पुरुष जन्मापासून मुक्त आहेत. म्हणूनच, दोन्ही अधिकारांना समान हक्क उपभोगण्याची संधी मिळाली पाहिजे,असे त्यांना वाटे, तर मग ही सुरुवात त्यांनी त्यांच्या घरातूनच केली. घरातूनचक्रांतीची ज्योत चेतवणारे फुले. त्यांनी पत्नी सावित्रीबाईंना साक्षर करून भारतातील पहिली स्त्री शिक्षिका व पहिली प्रशिक्षित मुख्याध्यापिका बनविले.
 
 
सावित्रीबाईंच्या नावापुढे आज ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ बिरूदावली आहे. पती आणि पत्नी यांचे एकविचार कसे असावेत आणि कुटुंबासह सगळ्या समाजाचे उत्थान कसे करावे, याचा आदर्श म्हणजेच फुले दाम्पत्य. मात्र, या सगळ्यासाठी जोतिबासारखे मुळपुरूष खंबीर होते हे महत्त्वाचे. पत्नी सावित्रीबाईंना सामाजिक कार्यात सहभागी केले, तर आपल्या संसाराचे काय होईल, याचा विचार त्यांच्या मनात आला नाही. उलट ‘मी जसा माझा निर्णय घेतो तसा माझ्या पत्नीनेही निर्णय घेण्यास समर्थ असावे,’ असेच त्यांचे मत होते. आजही आपण पाहतो की, सामाजिक क्षेत्र असो की, राजकीय क्षेत्र पती जर या क्षेत्रात अग्रेसर असेल तर पत्नीला त्या क्षेत्रात केवळ नाईलाज म्हणून स्थान दिले जाते. या पार्श्वभूमीवर जोतिबांचे मोठेपण तर आभाळभर आहे.
 
 
“क्रांतीसाठी प्रत्येकाला लढायला लागते, ते आपले वडील असो, भाऊ असो, शेजारील कोणी असो किंवा शत्रू असो, संघर्षाशिवाय कोणी जिंकले नाही आणि जिंकणारसुद्धा नाही,” असे मत मांडत सगळ्यांनी एकमेकांचा हेवादावा न करता सुखाने राहा, अशी कामना करणारे जोतिबा फुले तळागाळातील कष्टकरी समाजासाठीचे काम उभे करताना त्यांनी मुंबईतील गिरणी कामगारांची संघटना उभी करण्यासाठीही पुढाकार घेतला. देशाचा अन्नदाता शेतकरी. त्या शेतकर्‍याबाबत तर आजही आपण दररोज वाचतो-ऐकतो. पण, शेतकर्‍यांची ही स्थिती का, याबद्दल जोतिबांनी मत व्यक्त केले की, “आर्थिक विषमता शेतकर्‍यांच्या दैन्यास कारणीभूत आहे.
 
 
बळीराजाचा प्रश्न समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्याकाळी त्यांनी इंग्रजांना भारतीय शेतकर्‍यांसाठी ‘अ‍ॅग्रीक्लचर अ‍ॅक्ट’ करण्यास भाग पाडले, तर 1882 साली भारतातील शिक्षण विषयक स्थापन करण्यात आलेल्या हंटर कमिशनसमोर फुलेंनी साक्ष देऊन 12 वर्षांखालील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे, शिक्षक प्रशिक्षित असावे, शिक्षक बहुजनातीलही असावे, जीवनोपयोगी व्यवहारी शिक्षण द्यावे, वनवासी जाती जमातींना शिक्षणात प्राधान्य, शेतीचे व तांत्रिक शिक्षण द्यावे, वसूल केलेल्या शेतसार्‍याची रक्कम ही शेतकर्‍यांच्या शिक्षणावर खर्च करावी, महाविद्यालयीन शिक्षण जीवनातील गरजा भागविणारे असावे, अशा महत्त्वपूर्ण मागण्या केल्या. प्राथमिक शिक्षण मोफत, सार्वजनिक व सक्तीचे केले जावे, अशी मागणी करणारे महात्मा जोतिबा फुले हे आशिया खंडातील पहिले शिक्षण तज्ज्ञ होते. 1852 साली ‘नेटिव्ह फिमेल स्कूल सभा पूना लायब्ररी’ची त्यांनी स्थापना केली. विचारवंत आणि धडाडीचे कार्यक्षम असलेले जोतिबांनी अनेक पुस्तके लिहिली. या पुस्तकांचा संदर्भ आजही महत्त्वपूर्ण आहे.
 
 
 
त्यांचे ‘तृतीय रत्न’, ‘ब्राह्मणांचे कसब’, ‘गुलामगिरी’, ‘शेतकर्‍याचा आसूड’, ‘सत्सार अंक 1’, ‘सत्सार अंक 2’, ‘इशारा’ ‘सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टका’सह सर्व पूजा-विधी ही पुस्तके आजही समाजासाठी मार्गदर्शक आहेत. त्यांनी पोवाडे लिहिले. अगदी त्यांनी लिहिलेले अहवाल, पत्रकही दिशादर्शक आहेत. समाजात सुरू असलेल्या कुरीतींबद्दल जोतिबा आसूड ओढत. प्रसंगी ममतेने लोकांना समाजावतही. एके ठिकाणी जोतिबा म्हणतात, “थोडे दिन तरी मद्य वर्ज्य करा. तोच पैसा भरा ग्रंथासाठी. ग्रंथ वाचताना मनी शोध करा. देऊ नका थारा वैरभावा.”
 
 
नशा करू नका, त्याऐवजी तोच पैसा ग्रंथासाठी खर्च करा, वाचताना चिंतन-मनन करा, वैरभाव सोडा असे ते बांधवांना सांगातात. त्यांनी उभे केलेले सामाजिक कार्य पाहिले तर जाणवते की, अति मागासवर्गीय, स्त्रिया, शेतकरी आणि कामगार अशा समाजातील शोषित-वंचित घटकांसाठी त्यांनी काम केले. स्वतःचेजीवन अर्पित केले. समाजाला छळणार्‍या प्रत्येक प्रश्नावर जोतिबांनी प्रहार केला. तसेच ज्या समाजघटकांसाठी काम केले, त्या घटकांमध्येच त्यांच्या स्तरावर नेतृत्व कसे तयार होईल, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळेच अशा जोतिबांच्या जीवनावर अनेक लेखकांनी 46च्या वर पुस्तके लिहिली, तर त्यांच्या जीवनावर नाटक आणि चित्रपटही निर्माण झाले. आज देशभर जोतिबांच्या नावाने असंख्य सामाजिक संस्था कार्यरत आहेत. भारत सरकारनेही त्यांच्या नावाने काही योजना कार्यान्वित केल्या आहेत.देशाच्या इतिहासामध्ये समतेचा आणि समरस समाजाचा भाव जागृत करण्यासाठी आयुष्य चंदनासारख्या झिजवणार्‍या या महात्म्याचा मृत्यू दि. 20 नोव्हेंबर, 1890 साली झाला. अशा महात्म्याला कोटी कोटी दंडवत.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.