मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपुतची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी सुरु असलेल्या सीबीआय चौकशीत मोठा खुलासा झाला आहे. दिशाच्या मृत्यूबाबत सीबीआयने स्पष्टीकरण दिले असून तिचा मृत्यू हा केवळ अपघात असल्याचे या चौकशीत समोर आल्याचे म्हटले आहे. सीबीआयने दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे आता या प्रकरणाला वेगळे प्राप्त झाले आहे. तर या प्रकरणावरून केंद्रीय तपास संस्थांच्या स्वायत्ततेवर शिक्कामोर्तब झाल्याचे भाजपने म्हटले आहे.
दोन वर्षांपूर्वी ८ आणि ९ रात्रीच्या दरम्यान जून २०२० मध्ये एका रात्री मालाड येथील एक इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून खाली पडून दिशाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर अभिनेता सुशांत सिंह राजपूतने देखील आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या दोन घटनांमध्ये काही संबंध जोडला गेलेला आहे का ? याबाबतही चर्चा रंगल्या होत्या. भाजप आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणात तत्कालीन सरकारमधील एका मंत्र्याचा सहभाग असल्याचे म्हटले होते.
सीबीआय स्वायत्त असल्याचे पुन्हा सिद्ध
दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावरून अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. वास्तविक कुठल्याही व्यक्तीच्या मृत्यूबाबत जर शंका उपस्थित होत असतील तर त्यःची निष्पक्षपणे चौकशी व्हायलाच हवी ही आमची भूमिका कालही होती आणि आजही कायम आहे. दिशाच्या मृत्यूची सीबीआयने चौकशी केली असून तिचा मृत्यू अपघाताने झाल्याचे त्यातून निष्पन्न झाले आहे. यापूर्वीही एका सरकारी अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेशही केंद्र सरकारकडूनच देण्यात आले होते आणि यावेळेसही सीबीआयने निष्पक्षपणे चौकशी करून आपली भूमिका बजावली आहे. भाजप केंद्रीय तपास संस्थांचा गैरवापर करतो असे म्हणणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की सीबीआय आणि तत्सम संस्था स्वायत्त होत्या, आहेत आणि भाजप सरकारचाही काळात त्या स्वायत्तच राहतील. भाजपचे सरकार राजकीय सूड उगवण्यासाठीच त्यांच्यावर कुठलाही दबाव आणणार नाही.'
- अतुल भातखळकर, आमदार, भाजप
आरोपांवर ठाम असल्याचा नितेश राणेंचा दावा
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मात्र सीबीआय चौकशीतील निष्कर्षानंतरही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे म्हटले आहे. सिंधुदुर्ग येथे पत्रकारांशी संवाद साधताना नितेश राणे म्हणाले की, 'सीबीआयने आपला अहवाल दिल्याचे आता समोर आले आहे. परंतु, काही गोष्टींवर आम्ही आजही ठाम असून त्या त्या विरोधात आमचा संघर्ष सुरूच राहणार हे निश्चित आहे. दिशाच्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज का गायब करण्यात आले ? इमारतीत येणाऱ्यांची नोंद करणारे व्हिजिटर बुकमधील काही पाने का फाडली गेली आहेत ? दिशाच्या शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल बाहेर का येत नाही ? तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये ही सर्व बेकायदेशीर कामे झाली असून एकप्रकारे पुरावे नष्ट केल्याचा आम्हाला संशय आहे. काहीही झाले तरी आम्ही आमच्या आरोपांवर ठाम आहोत, असा दावा आमदार नितेश राणे यांनी केला आहे.