मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या भावना गवळी काल अकोला रेल्वे स्थानकावर आमने-सामने आले. "मी अकोल्याहून एक्सप्रेसमध्ये बसत असताना ठाकरे गटाचे पदाधिकारी माझ्या अंगावर आले. ‘गद्दार-गद्दार’, ‘५० खोके एकदम ओके’, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यांना नितीन देशमुख आणि विनायक राऊत यांनी चिथवलं," असा आरोप खासदार भावना गवळी यांनी केला आहे.
भावना गवळी म्हणाल्या, “विनायक राऊत आणि नितीन देशमुख यांनी चिथावणी दिल्यामुळे माझ्याविरोधात घोषणाबाजी झाली. अशी कृती त्यांच्या पत्नीबद्दल आणि बहिणीबद्दल केली असती तर ते पाहत उभे राहीले असते का?. हे कृत्य घृणास्पद आहे. त्यामुळे मी अकोला पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल व्हावे आणि अटक व्हावी. तसेच या प्रकरणी मी मुख्यमंत्री, राज्य महिला आयोग आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडेही तक्रार करणार असल्याचं भावना गवळी यांनी म्हटलं आहे.