नवी दिल्ली : भारत – ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या मुक्त व्यापार कराराचा मार्ग मोकळा झाला असून त्यावर ऑस्ट्रेलियन संसदेने मंजुरीची मोहोर उमटवली आहे. यामुळे सुमारे ६ हजार भारतीय उत्पादनांचा ऑस्ट्रेलियन बाजारपेठेत सीमाशुल्क मुक्त प्रवेश होणार आहे.
गेल्या काही काळापासून भारत – ऑस्ट्रेलियादरम्यान मुक्त व्यापार कराराविषयी चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. अखेरिस त्यास यश आले आहे. त्याविषयी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानीज यांनी ट्विटद्वारे माहिती दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींसोबतचे जी२० परिषदेमधील छायाचित्र ट्विट करून भारतासोबतच्या मुक्त करारास ऑस्ट्रेलियन संसदेने मंजुरी प्रदान केल्याचे सांगितले.
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले, भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार ऑस्ट्रेलियन संसदेने मंजुर केला आहे. या करारामुळे दोन्ही देशांच्या व्यापारविषयक क्षमतांचा पूर्ण वापर आणि आर्थिक विकासाला गती देणे शक्य होणार असल्याचे गोयल यांनी नमूद केले आहे.
करारास लवकरच ऑस्ट्रेलियाची कार्यकारी परिषद आणि भारतात केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी प्रदान करण्यात येणार आहे. आवश्यक मंजुऱ्या प्राप्त झाल्यानंतर दोन्ही देशांच्या परस्परसहमतीने करार लागू करण्याची तारिख ठरविण्यात येणार असून त्याविषयी सीमाशुल्क खात्याद्वारे अधिसूचना जारी केली जाणार आहे.
६ हजार भारतीय उत्पादनांचा मुक्त प्रवेश
भारतास मुक्त व्यापार कराराचा मोठा फायदा होणार आहे. दोन्ही देश एकमेकांशी ७ अब्ज डॉलर्सचा व्यापार करतात. ऑस्ट्रेलियातून भारतात निर्यात होणाऱ्या उत्पादनांमध्ये मोती, सोने, तांबे, अॅल्युमिनियम, वाइन, फळे आणि सुकामेवा, कापूस, लोकर यांचा समावेश आहे, तर भारतातून ऑस्ट्रेलियामध्ये पेट्रोलियम उत्पादने, फार्मास्युटिकल्स, रत्ने आणि दागिने निर्यात होतात.