अब्दुल्लांचे निवडणुकीपूर्वी रामस्मरण!

    22-Nov-2022   
Total Views |
 
फारुख अब्दुल्ला
 
 
 
 
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना अचानक हिंदूंविषयी प्रेमाच्या उकळ्या फुटू लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात हिंदू आणि हिंदू देवदेवतांचे गोडवे गायल्याने हेच ते पूर्वीचे फारुख अब्दुल्ला का, असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. प्रभू श्री राम हे केवळ हिंदूंचेच नव्हे, तर सर्वांचे देव असल्याचे त्यांनी सांगितल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. धर्माच्या आधारे फूट पाडण्याच्या प्रयत्नाविरुद्ध जनतेने सतर्क राहण्याचे आवाहन करत ते म्हणाले की, “देशाच्या मजबूतीसाठी सर्वांना एकत्र उभे राहण्याची आवश्यकता आहे.” यावेळी त्यांनी आपल्या देशप्रेमाची उदाहरणेही समोर ठेवली. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना त्यांचे वडील शेख अब्दुल्ला यांना भेटण्यासाठी आले होते. तेव्हा, त्यांनी जिना यांच्याशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला, असे सांगत त्यांनी पाकिस्तानशी कधीही हातमिळवणी केली नसल्याचा दावा केला. फारुख यांची बदललेली भाषा खरेतर मनाला न पटणारी आहे. कारण, अनेक वादग्रस्त विधानांमुळे ते कायम चर्चेत असतात. प्रभू श्रीरामांविषयीदेखील त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. कित्येकदा तर प्रभू श्रीरामांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यामुळे फारूख अब्दुल्ला यांनी असे गोडवे गाणं नक्कीच मनाला न पटणारं आहे. तीन दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांचा मूळ पक्ष ‘नॅशनल कॉन्फरन्स’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. दि. 5 डिसेंबर रोजी होणार्‍या पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचा मुलगा ओमर अब्दुल्ला निवडून येण्याची शक्यता असल्याने ते तोपर्यंत पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यरत राहणार आहेत. ‘नॅशनल कॉन्फरन्स’ने पाकिस्तानला कधीही पाठिंबा दिला नसल्याचा पुनरूच्चारही त्यांनी केला. मात्र, हिंदूंविषयी अचानक आलेल्या प्रेमामागे अनेक कारणे असू शकतात. त्यापैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे, जम्मू-काश्मीरमध्ये पुढील काळात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका. या निवडणुकांची तयारी सध्या जोरात सुरू असून मतदार याद्या अद्ययावत करण्याचे कामदेखील वेगाने सुरू आहे. निवडणुकीच्या तारखा अद्याप ठरल्या नसल्या तरी पुढील वर्षी जानेवारी-मार्च दरम्यान कधीही निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिंदू देवतांवरील प्रेमामागे निवडणूक ‘फॅक्टर’ असण्याची दाट शक्यता आहे, असेच दिसते.
 
 
‘लव्ह जिहाद’ ‘जुमला’ नव्हे वास्तव!
 
 
श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर देशभर संतापाची लाट उसळली. ‘लव्ह जिहाद’ आणि निर्घृण हत्येच्या या प्रकरणामध्ये आता नवनवीन खुलासे होत आहेत. आफताब श्रद्धाला मांस खाण्यास भाग पाडत होता. तसे न केल्यास तो बेदम मारहाण करत. हत्येचा आरोपी आफताब याची ‘नार्को टेस्ट’देखील होणार आहे. या प्रकरणी वेगाने तपासाची चक्र फिरत असताना तिकडे राजस्थाचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मात्र या घटनेला सामान्य घटना असल्याचे म्हणत या प्रकरणाचा ‘लव्ह जिहाद’शी संबंध नसल्याचे सांगितले. एका वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, “ही एक सामान्य दुर्घटना असून हा एक जुमला आहे. ही कोणतीही नवी गोष्ट नसून अनेक वर्षांपासून आंतरजातीय आणि आंतरधार्मिक विवाह होत आले आहे. गेहलोत एवढ्यावरच थांबले नाही. यावेळी त्यांनी दिव्य ज्ञान पाजळत, जर तुम्हाला जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर जमाव जमवणे तसेच आग लावणे हे खूप सोपे काम आहे. इमारत बांधायला वेळ लागतो, परंतु, ती पाडायची असेल, तर सहज पाडता येत असल्याचे म्हटले. दरम्यान, याप्रकरणी पोलीस आरोपी आफताब पूनावाला याची चौकशी करत आहेत. एवढेच नाही, तर त्याने संतापाच्या भरात श्रद्धाचा जीव घेतल्याची कबुलीही दिली. परंतु, तरीही गेहलोत यांना ही एक सामान्य घटना वाटत असून त्यांनी या घटनेला ‘जुमला’ म्हणून संबोधले. खरेतर या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला. आई-वडिलांचा विरोध झुगारून श्रद्धाने पाऊल उचलले आणि त्याचे परिणाम समोर आहेच. ‘लव्ह जिहाद’ नसल्याचा निर्वाळा अशोक गेहलोत कोणत्या आधारे देत आहेत हे त्यांनाच ठाऊक. परंतु, दरवेळी एका विशिष्ट समाजाच्या बाजूने भूमिका मांडून गेहलोत यांना चांगलेच समाधान मिळत असल्याचे दिसते. स्वतः मुख्यमंत्री असताना हिंदू मंदिरांवर दिवसाढवळ्या ‘बुलडोझर’ चालवायचा, परंतु दुसरीकडे एका हिंदू मुलीची अशा निर्घृण पद्धतीने हत्या झाली, तर त्याला ‘जुमला’ आणि ‘सामान्य घटना’ म्हणायचे. असे दुटप्पी राजकारण गेहलोत यांना शोभा देत नाही. हिंदूद्वेष नसल्याचे दाखवले तरी बोलीतून आणि कृतीतून तो कायम दिसतो गेहलोतजी. त्यामुळे पायलट यांचे टेंन्शन आणि काँग्रेस अध्यक्षपदाची हुकलेली संधी ही फार काही जुनी गोष्ट नाही गेहलोतजी. ‘समझनेवालो को इशारा काफी हैं!’
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.