'दृश्यम 2' का पहावा? : चित्रपट एक कलाकृती म्हणून नककीच यशस्वी झाला का?

    21-Nov-2022   
Total Views |

drisha 
 
 
 
दृश्यम च्या पहिल्या भाग आवडल्यामुळे दृश्यम २ पाहायला जाल तर तुमची निराशा होईल. पहिल्या भागात जे कथानक आहे ते अत्यंत उत्कंठावर्धक, भीतीदायक, काहीसं बीभत्स, प्रेम, द्वेष, शौर्य, वीरता दाखवणारं असं नवरसांनी युक्त आणि षड्रिपूंचा पदोपदी प्रत्यय यावा असं होतं. पहिल्या भागात एक अफलातून कथा आणि तेवढ्याच ताकदीचा भन्नाट चित्रपट हे समीकरण चांगलं जमलं होतं. परंतु दुसऱ्या भागात कथा काहीही नाही. जुन्याच केसचा उलगडा करण्याचा प्रयत्न आहे. जुनेच धागे नव्याने उसवून पाहणं जरी असलं तरीही कंटाळा मात्र येत नाही.
 
चित्रीकरणात काही चुका किंवा कच्चे दुवे नक्कीच आहेत. कथानक फारसं गुंतागुंतीचं नसल्याने लहान सहान गोष्टीवर काम करता आलं असत. जेव्हा ७ वर्षानंतर मृतदेहाच्या अवशेषांचा तपास लागतो व गुन्हेगार माहिती असूनही त्याच्यावर कुणाचेही लक्ष नाही ही अशक्य वाटेल अशी गोष्ट आहे. अवशेष जेव्हा अदलाबदल होतात तेव्हा दिवसही आणि रात्रीही संशयित गुन्हेगार कुठे आहे, काय करतो हे पोलिसांना पाहावेसे वाटत नाही म्हणजे गफलत आहे. सांगाड्याची अदलाबदल झाली असेल तर फॉरेन्सिक अहवालात तशा गोष्टी स्पष्ट होतात, परंतु जर तो बदलला गेला असेल तर त्याच्या डोक्यावर गेलेल्या तड्याचे समर्थन कसे करता येईल? अस्थी कलशात भरताना जर त्यांची काष्ठ असतील तर नदीत सोडताना एका दिवसात बंद कलशात त्यांची राख कशी होईल? हे काही क्षण नजरेत चटकन खटकतात.
 
कॅमेरा हे अतिशय प्रभावी माध्यम आहे, नजरचुकीने आपल्याकडून ज्या गोष्टी निसटतात त्यांना अत्यंत स्पष्टपणे कॅमेरा टिपून घेतो. एखादं दृश्य पाहताना त्यात काय पाहावं व कशाची कशाशी सांगड घालावी हे आपण ठरवायचं असतं, त्यावेळी इतर गोष्टी आपल्या सबकॉन्शियस मेमरी मध्ये साठवल्या जातात, परंतु, जेव्हा एखादी गोष्ट स्क्रीनवर पाहतो तेव्हा त्यात आपल्याला काय दिसणार हे दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर ठरवतो. अशा वेळी या चुका होऊन चालत नाहीत.
 
 
मध्यंतरापर्यंत चित्रपट अत्यंत मंद गतीनेपुढे सरकतो असे वाटते, सगळेच क्लायमॅक्स शेवटच्या काही मिनिटांत असल्याने शेवटाकडे चित्रपटाचा वेग झपाट्याने वाढतो म्हणून पूर्वार्ध अतिरंजित वाटू शकतो. दुसऱ्या भागात कथेला कलाटणी देणारी सगळी पात्रे अचानक चित्रपटात दिसू लागल्याने शित्रपटाच्य शेवटचं अंदाज वर्तवणे सोपे जाते. या कथेचा दुसरा भाग काढण्याचे पूर्वनियोजित नव्हते असेही यामुळे प्रकर्षाने जाणवते.
 
चित्रपटात जरी नायकाने खून केलेला असला तरीही तो बचावात्मक पवित्र्यात झालेला आहे, याची दखलही घेतलेली दिसत नाही. खरेतर नीती मूल्यांचा आधार घेता सहज सुटू शकतील असे प्रसंग असताना निव्वळ नायकाचे हिरोइझम दाखवण्याच्या उद्देशाने चित्रपटाची बांधणी केल्यासारखे वाटते. यातून एखाद्याचा खून करणे म्हणजे क्षुल्लक गोष्ट आहे या विचारला बढावा मिळू शकतो. हे कथानक दुसऱ्या भागात जर भावनिक दृष्ट्या हाताळले असते तर कथेला वेगळा आयाम मिळाला असता.
 
कथेला शेवटाकडे वेग येतो त्यावेळी मात्र आपण पूर्णपणे स्वतःला त्यात झोकून देतो, चित्रपट असूनही प्रेक्षागृहातून कित्येक प्रसंगांना टाळ्या मिळतात. रंगभूमीवर कलाकार आपल्याशी थेट संवाद साधतात त्यावेळी एकमेकांशी आपण समरस होतो परंतु चित्रपटातून सुद्धा अजय देवगण टाळ्या घेतो तिथेच चित्रपटाचा विजय आहे.
 
कलाकारांविषयी बोलायचे झाले तर पहिल्या भागातील कलाकारच या चित्रपटात असल्याने प्रेक्षकांना कथानकाशी जोडून घेणे सोपे जाते, धाकट्या मुलीची पहिल्या भागातील धिटाई आणि बुद्धिमत्ता तिच्या वय आणि रूपाप्रमाणे ५ वर्षानंतर त्यात झालेले बदल उल्लेखनीय आहेत. आईचं पात्र धीरगंभीर हवं, आपल्या पिलांना जेव्हा त्रास होतो तेव्हा कोणतीच आई खचून जात नाही. हा तर निसर्गनियम. इथे अजय देवगणच्या बुद्धिमत्तेला जराही आव्हान मिळू नये म्हणून आईची भूमिका सतत नकारात्मक किंवा षंढ वाटावी अशी दाखवलेली आहे असेही वाटते. चित्रपटासाठी अभिनय करताना फक्त चेहऱ्यावरील हावभाव उत्कटतेने दाखवण्यापेक्षा आवाज आणि आवाजातले चढ उत्तर यांचा उपयोग चांगला करून घेता येतो. हा प्लसपॉईंट असतानाही आवाजाला दुय्यम महत्व दिलेले दिसते. सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असल्याने फॉली आवाज मात्र आपली भूमिका चांगली वठवतात.
 
चित्रपटात दिसणारी दृशे गोव्यातील निसर्गरम्य परिसरातील असतील तरी त्यात निसर्गरम्यता फार कमी दिसून येते. कथानक कोणत्या भागात आहे हे सांगण्यासाठी शब्दांसोबतच दृश्यांतूनही त्याची प्रचिती यायला हवी. परंतु एकंदर चित्रपट एकदा पाहावा असा आहे. एखाद्या चित्रपटाचा जेव्हा दुसरा भाग येतो तेव्हा बहुतेकवेळा नावीन्याच्या अभावी तो पडतो परंतु यावर दृश्यम २ ने नक्कीच मात केली आहे. पहिल्याच दिवशी या वर्षातल्या सर्वात जास्त चर्चा झालेल्या ८ चित्रपटांना मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर आपले स्थान नक्की करणारा हा चित्रपट एक कलाकृती म्हणून नककीच यशस्वी झाला आहे.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.