मेहनतीच्या जोरावर यश गाठणारे लक्ष्मण

    20-Nov-2022   
Total Views |
mansa


तालुक्यातून ‘सीए’ होण्याचा पहिला मान लक्ष्मण बाबूराव काळे यांना मिळाला.त्यांचा ‘सीए’ ते सामाजिक कार्यापर्यंतचा प्रवास जाणून घेऊया.


एका शेतकरी कुटुंबांत लहानचे मोठे झालेले लक्ष्मण बाबूराव काळे हे ‘सीए’ झाले. मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्यामुळे त्यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. पण मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी हा पल्ला यशस्वीपणे पार केला. लक्ष्मण हे सीए झाले, तेव्हा एका शेतकर्‍याच्या मुलांनी हे यश मिळविल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत होता. तालुक्यातून ‘सीए’ होण्याचा पहिला मान हा लक्ष्मण यांना मिळाला. त्यांचा ‘सीए’ ते सामाजिक कार्यापर्यंतचा प्रवास जाणून घेऊया.


लक्ष्मण हे मूळ पुणे जिल्ह्यातील धोंडमाळ या गावाचे. त्यांचे वडील शेतकरी, तर आई ताराबाई या गृहिणी आहेत. त्यांना तीन भाऊ आणि तीन बहिणी आहेत. सध्या ते डोंबिवलीतील पाथर्ली येथील अर्जुननगर येथे राहत आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावी झाले. पाचवी ते दहावीचे शिक्षण त्यांनी पुण्यात घेतले. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी मंचर महाविद्यालयातून घेतले. पदवीची परीक्षा ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. लक्ष्मण यांची घरची परिस्थिती चांगली होती. परंतु, तरीदेखील त्यांच्या वडिलांनी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ‘कमवा आणि शिका’ हा मूलमंत्र दिला होता. 1984 साली ते मुंबईत आले.


अवघ्या 500 रुपये वेतनावर त्यांनी सहा महिने नोकरी केली. त्यांचे चुलते किसनराव यांच्या आग्रहाखातर त्यांनी ‘सीए’ला प्रवेश घेतला. मराठी माध्यमातून शिक्षण झाले असल्याने त्यांना ‘सीए’ करताना कठीण जात होते. त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना खूप प्रोत्साहन दिले. 1992 साली त्यांचा रोहिणी यांच्याशी विवाह झाला. रोहिणी या पोलीस दलात (पीएसआय) आहेत. लक्ष्मण यांना ‘सीए’ होण्यासाठी रोहिणी यांनीदेखील प्रोत्साहन दिले. त्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. रोहिणी यांच्या प्रोत्साहनामुळे लक्ष्मण यांना ‘सीए’ होण्यासाठीच बळ मिळाले अन् अखेर ते ‘सीए’ झाले. मेहनत करण्याची तयारी आणि जिद्द असेल, तर कोणतीच गोष्ट अशक्य नसल्याचे लक्ष्मण सांगतात.


लक्ष्मण यांनी ‘सीए’ झाल्यानंतर नोकरी न करता स्वत:चा व्यवसाय करण्याचे ठरविले. मेहनत, जिद्द आणि चिकाटी या जोरावर ते गेली 22 वर्षे ‘सीए’ व्यवसायात कार्यरत आहेत. लक्ष्मण यांना दोन मुले आहेत. त्यांचा मोठा मुलगा डॉ. विराज यांनी रशियामधून ‘एमबीबीएस’चे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी भारत व इंग्लंडमधून ही परीक्षा दिली. त्यामुळे विराजला आता रशिया, भारत आणि इंग्लंड या तिन्ही देशांतून ‘प्रॅक्टिस’ करता येणार आहे. त्यांची सून सोनल हीसुद्धा डॉक्टर आहे. त्यांचा छोटा मुलगा रोहित ‘सीए’च्या शेवटच्या वर्षाला आहे आणि तो सध्या लक्ष्मण यांना व्यवसाय वाढविण्यास मदत करीत आहे. लक्ष्मण यांच्या पत्नी रोहिणी या 31 मे, 2023 ला सेवानिवृत्त होत आहेत.


लक्ष्मण हे दररोज न चुकता योगासने करतात. त्यांना योगासनांचे महत्त्व पटले असल्याने ते स्वत: योग तर करतातच, पण इतरांनीही योगासने करावी, यासाठी ते प्रयत्नशील असतात. समाजातील इतर घटकांनाही योगचा फायदा व्हावा, यासाठी ते संधी मिळेल तेव्हा विनामूल्य योग प्रशिक्षण देण्याचे काम करतात. त्यांच्या करिअरमध्ये स्थैर्य निर्माण झाल्यानंतर आपल्या उत्पन्नातून समाजाला काहीतरी फूल ना फुलाची पाकळी द्यावी, याकरिता त्यांनी समाजातील विविध घटकांच्या उपयोगी कसे पडता येईल, यांचा विचार करून त्यांना वेळप्रसंगी मदत करीत असतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली हेरिटेज’ या संस्थेचे त्यांनी सभासद होण्याचा निर्णय घेतला.


2018-19ला ते ‘रोटरी क्लब’चे सभासद झाले आणि येथूनच त्यांच्या सामाजिक कार्याचा खर्‍या अर्थाने श्रीगणोशा झाला. ‘रोटरी’च्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम ते सध्या राबवित आहेत. 2022-23 या कालावधीत त्यांना ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली हेरिटेज’ या संस्थेचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान मिळालेला आहे. ‘रोटरी क्लब’च्या माध्यमातून त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. ‘झाडे लावा’ याचे महत्त्व त्यांना पटले असल्याने त्यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रमही हाती घेतला होता.


जिल्हा परिषदेतील शाळेच्या मुलांना शालेयोपयोगी वस्तू यांचे वाटप करणे, वनवासी पाड्यातील नागरिकांची दिवाळीदेखील गोड व्हावी, याकरिता त्यांनी दिवाळी फराळाचे वाटप केले. गणपती विसर्जन पर्यावरणपूरक व्हावे, याकरिता त्यांनी कृत्रिम विसर्जन तलावाची निर्मिती केली होती. ‘देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे, घेता घेता एक दिवस, देणार्‍याचे हात घ्यावे’ या विंदा करंदीकरांच्या काव्यपंक्तीनुसार देणार्‍याचे हात घ्यावे म्हणजे, देणार्‍याचा दानशूरपणा आपण आपल्या अंगी बाणावा. म्हणजेच देणार्‍याप्रमाणे आपणसुद्धा इतरांना देणारे व्हावे, या उद्देशाने लक्ष्मण यांनी आपल्यासोबत इतरांनीही समाजसेवा करावी, याकरिता प्रोत्साहित करून त्यांना ‘रोटरी’च्या प्रवाहात सामील करण्याचे काम केले आहे. ‘कोविड’च्या काळातही त्यांनी गरजूंना आवश्यक ती मदत केली आहे. त्यांचा मुलगा डॉ. विराज यांनी ‘कोविड’ रुग्णांना तत्परतेने वैद्यकीय सेवा दिली आहे. अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा...!





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.