नवी दिल्ली:केंद्र सरकारने अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधून आलेल्या आणि गुजरातमध्ये स्थायिक झालेल्या अल्पसंख्याक नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तयारी सुरू केली आहे.
गुजरातमधील दोन जिल्ह्यांत स्थायिक झालेले हिंदू, शीख, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चनधर्मीय नागरिकांना ‘नागरिकत्व कायदा 1955’ अंतर्गत भारतीय नागरिकत्व देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘नागरिकत्व सुधारणा कायदा 2019’ अर्थात ‘सीएए’ऐवजी 1955 च्या कायद्यांतर्गत नागरिकत्व देण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार जे हिंदू, शीख, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन नागरिक अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधून आले आहेत आणि गुजरातमधील आणंद आणि महेसाणा येथे स्थायिक झाले आहेत त्यांना हे नागरिकत्व देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.
गुजरातमधील दोन जिल्ह्यात राहणार्या लोकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सूचना देण्यात आल्या आहे. या अर्जांची पडताळणी जिल्हास्तरीय पातळीवर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. त्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी आपला अहवाल केंद्र सरकारकडे जमा करतील. त्यानंतर कागदपत्रांची तपासणी होऊन नागरिकत्व देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.