मला एकच ‘डायलॉग’ येतो!

    02-Nov-2022   
Total Views |
 
उद्धव ठाकरे
 
 
 
 
आम्हाला भेटायला मराठी मुस्लीम संघाचे शिष्टमंडळ आले होते.” “काय म्हणता, जगभरच्या मुस्लिमांची जी मानसिक बैठक असते, रूढी-रिती पंरपंराबाबत जो आग्रह असतो, तो मराठी मुस्लिमांना नसतो का?” “मला काही माहिती नाही. मला इतकेच माहिती आहे की, मराठी-मुस्लीम संघाने पाठिंबा दिला आणि आता सगळे मराठी-मुसलमान आम्हाला मतदान करणार. आम्हीच जिंकणार!” “काय म्हणता, मग शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि दिल्लीच्या गांधी कुटुंबाच्या काँग्रेसला कोण मतदान करणार?” “आम्हाला काय करायचे त्याच्याशी? आज सगळे आमच्यासेाबत आहेत. राष्ट्रवादीची आशावादी नाही.”
 
 
 
“राष्ट्रवादीच्या सुषमा अंधारे आल्या ना? सगळे डाव्या विचारसरणीचे लोक आलेत आमच्यासोबत. माझे आजोबा ज्यांच्या विरोधात होते ते सगळे आज सोबत आहेत.” “काय म्हणता, आजोबांच्या ध्येयविचाराला विकून खाल्ले म्हणून हे सगळे सोबत आले?” “हे बघा, माझे बाबा मागेच म्हणाले होते की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब भोळे होते, पण मी धुर्त आहे!”
 
 
 
“काय म्हणता, मराठी आहोत, एकत्र काम करू म्हणतो. मग मुंबई महानगरपालिकेची कंत्राटं किती मराठी भाषिकांना दिली? आज मुंबईत किती मराठी भाषिक उरलेत?” “हे बघा, हे असले प्रश्न विचारू नका.” काय म्हणता? ”मग महाविकास आघाडीची सत्ता असताना आम्ही उर्दू भवनचा घाट का घातला?” “हे बघा, मी फक्त पेंग्विनचा घाट घातला होता. माझ्या हातच यश तर पाहा. आज मराठा युवा सेनेच्या नावाचे एक्सप्रेस हायवेवरसुद्धा दोन पेंग्विनचे फोटो असलेले बॅनर झळकतायत.” “काय म्हणता, ”अब्दुल सत्तारांनी मला आवाहन केले की ते सिल्लोडमधून राजीनामा द्यायला तयार आहे आणि मी वरळीमधून राजीनामा द्यावा. बघू कोण जिंकतो. सत्तार काका, तुुम्ही मराठी-मुसलमान आहात ना? प्लीज मला राजीनामा द्यायचे आवाहन करू नका.
 
 
 
वरळीमध्ये पुन्हा निवडणुकीला उभे राहायचे तर समदा कोळीवाडा आमचा अशा बॅनरबरोबर ‘केम छो वरळी’चे बॅनरपण लावावे लागणार. आता मराठी-मुसलमान बॅनर पण लावावे लागणार? छे नकोच! इतका विचार, त्यापेक्षा मी ओरडतोच की, महाराष्ट्रातून वरळी तोडून ती गुजरातला जोडण्याचे तुमचे षड्यंत्र आहे. तुम्हाला खोके भेटले गद्दार!!! हो, मी हेच म्हणणार, कारण हा एकच? ‘डॉयलॉग’ मला येतो!
 
 
काँग्रेसच्या ‘मोहब्बत’चा इतिहास
 
 
 
"हर रोज नया इतिहास रचा जा रहा हैं, हर रोज देश में मोहब्बत चाहनेवालो की तादाद बढ रही हैं...” नेहमीच हिंदू समाजाच्या विरोधात कृती करणारा आणि तशीच मुक्ताफळं उधळणार्‍या महेश भट यांची कन्या आणि विस्मृतीत गेलेली एक अभिनेत्री पूजा भट राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सामील झाली. तेव्हा काँग्रसने हे ट्विट केले. एक विस्मृतीत गेलेली अभिनेत्री राहुल गांधी यांच्या यात्रेत सामील झाली म्हणजे काँग्रेसच्या मते एक नवा इतिहास रचला जात आहे. याला ‘इतिहास रचणे’ म्हणता येईल का? कदाचित काँग्रेसच्या मते असेलही. कारण, महाराष्ट्रात मुंबईत काँग्रेसच्या बुथवर बसायलाही माणसं सहसा सापडत नाहीत.
 
 
 
 
पूर्वी पक्षाचे एकगठ्ठा मुस्लीम मतदार हक्काचे होते, पण आता समाजवादी, ‘एमआयएम’, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटसुद्धा या मतांवर हक्क सांगू लागला. त्यामुळे काँग्रेस पक्षाला खरेच नवीन कार्यकर्ता बनवताना नाकीनऊ येत आहे. अशा परिस्थितीमध्ये कुणीही विचारत नसलेली व्यक्ती जर पक्षाच्या यात्रेत आली तर ती काँग्रेससाठी नक्कीच इतिहास रचणारी गोष्ट असूच शकते. पूजा भट आल्यावरच काँग्रेसने इतिहास रचला जाणार आहे, असे म्हंटले. यावर काही लोक म्हणत आहेत की, आता पूजा भट आणि महेश भट या बापलेकीच्या कर्तृत्वविचारांवर काँग्रेसचा पुढचा पाया रचला जाणार आहे का? हा प्रश्न विचारू नये. कारण, काँग्रेस पक्षाला कसलेही वावडे नाहीच. अस्तित्व टिकवणे मोठे आवाहन असल्यावर या पक्षाला आणि त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाला आवड निवड असण्याचा प्रश्नच येत नाही. असो, काँग्रेस असेही म्हणते की, ‘मोहब्बत चाहनेवालो की तादाद बढ रही हैं’, तर काँग्रेसचा प्यार-मोहब्बतचा फंडा सगळ्या देशाने ‘दूरदर्शन’वर या आधीही पाहिला आहे.
 
 
 
मागे लोकसभेचे अधिवेशन सुरू असताना पक्षाचे नेते राहुल गांधी अतिशय निरागस चेहर्‍याने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे गेले. राहुल यांनी अचानक बळेबळे मोदींची गळाभेट घेतली. सगळ्यांना वाटले की राहुल गांधी निर्भेळ आत्मियता स्नेह प्रेमभाव व्यक्त करत आहेत. मात्र, त्यानंतर काही क्षणातच राहुल गांधींनी पाठीमागे वळून त्यांच्या सहकार्‍याला डोळ्याच्या खाणाखुणा केल्या. त्याचा अर्थ सरळ असा होता की, बघ कसं प्रेमाचं स्नेहाच नाटक केलं. बनवलं ना उल्लू सगळ्या देशाला? तर असा हा काँग्रेसचा इतिहास आणि काँग्रेसची मोहब्बत!
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.