श्रीलंकेत नवी आघाडी

    18-Nov-2022   
Total Views |
sri lanka


असे म्हटले जाते की, 20वे शतक पाश्चात्त्य देशांचे होते, तर 21वे शतक आशियाई देशांचे आहे आणि असे दिसते की, पाकिस्ताननंतर आता श्रीलंका, 21व्या शतकातील शीर्षस्थ वैश्विक अर्थव्यवस्थांसाठी पुढची आघाडी असेल. पाकिस्तान सध्या रोखरक्कम, पूर आणि महागाईमुळे त्रस्त आहे. पण, आता चीन त्यावर मेहरबान झाला असून त्यामुळे कंगालीचा सामना करणार्‍या पाकिस्तानच्या समस्या सुटू शकतात.


चीनने काही दिवसांपूर्वीच आपल्या ‘बेस्ट फ्रेंड’ पाकिस्तानला नऊ अब्ज डॉलर्सचे आर्थिक साहाय्य देण्याची घोषणा केली होती. पाकिस्तानच्या साथीने आपले भविष्य उज्ज्वल राहील, असे चीनला वाटत आहे. म्हणूनच स्वतः शी जिनपिंग यांनी शाहबाज शरीफ यांना चिंता करू नका. कारण, त्यांना चीन अजिबात निराश करणार नाही, असे म्हटले होते. दुसरीकडे चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजान म्हणाले की, चीनने पाकिस्तानला त्याची आर्थिक स्थिती स्थिर करण्यासाठी सहकार्याचे पुरेपूर प्रयत्न केले आहेत.

दरम्यान, चीनकडून मदत मिळणे पाकिस्तानसाठी एकाचवेळी आनंदी आणि वाईट घडामोडही आहे. त्याआधी अमेरिका आणि पाकिस्तान पुन्हा एकमेकांच्या जवळ येऊ लागले होते. पण, आता असे दिसते की, दोन्ही देशांनी एकमेकांपासून तोंड फिरवले आहे. वस्तुतः जो बायडन अध्यक्ष झाल्यापासून अमेरिकेने पाकिस्तानला वेगवेगळ्या प्रकारे साहाय्यता देऊन त्याला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. एका इस्लामी राष्ट्राला पाठिंबा दिल्याने आपली मुस्लीम मतपेटी सुरक्षित होईल. तसेच, अमेरिकेच्या चीन व भारतविरोधी अभियानात साथ देण्यासाठी आपल्याला एक चांगला सहकारी लाभेल, असे बायडन यांना तसे करताना वाटत होते.

 पण, आता तसे होताना दिसत नाही. अमेरिकेचे भारतविरोधी अभियान म्हणजे रशिया-युक्रेन युद्धावेळी भारताने अमेरिका आणि पाश्चात्यांचे प्रयत्न व धमक्यांकडे दुर्लक्ष करत रशियाला पाठिंबा दिला व आपल्यावर अमेरिकेचा प्रभाव पडू दिला नाही. त्यानेच अमेरिकेला पोटदुखी झाली आणि अमेरिकेने पाकिस्तानचे समर्थन सुरू केले, तर ते समर्थन पाहून चीनने पाकिस्तानपासून अंतर राखले. पण, आता चीन आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा सारेकाही ठीक झाले असून त्याचा प्रभाव अमेरिकेच्या कृतीतही दिसत आहे.

नुकतीच अमेरिकेने 2022 साठी आपल्या सुरक्षाविषयक सहकारी देशांची यादी जारी केली. पण, यात पाकिस्तान आणि सौदी अरेबियाचे नाव गायब होते. जे देश एकेकाळी एकमेकांच्या हातात हात घालून चालत होते, त्या देशांनी आपल्या मैत्रीचा शेवट केल्याचे यावरून दिसले, तर या यादीत भारताचे नाव आठव्या क्रमांकावर आहे. अमेरिका, रशियाकडे नव्हे, तर चीनकडे आपल्यासमोरील सर्वांत मोठे भू-राजकीय आव्हान म्हणून पाहते. या सगळ्यात चीनद्वारे पाकिस्तानच्या साहाय्यासाठी पावले उचलण्यातून हे स्पष्ट होते की, अमेरिकेने पाकिस्तानला लाथ मारल्या मारल्या चीनने त्याला कडेवर घेतले.

लक्ष देण्यासारखी बाब म्हणजे, पाकिस्तानला आर्थिक साहाय्य देऊन चीनचे पोट भरलेले नाही. चीन पुन्हा एकदा श्रीलंकेची शिकार करायला पुढे जात आहे, तीदेखील मदतीच्या नाटकातून. पण, श्रीलंकेची स्थिती चांगली नव्हती. तेव्हा, भारताने श्रीलंकेला मोठे सहकार्य केले होते. पण, आता अमेरिकादेखील या वाहत्या गंगेत हात धुण्याच्या तयारीत आहे. महत्त्वाचे म्हणजे, यंदाच्या सप्टेंबरपर्यंत अमेरिकेने श्रीलंकेला 240 दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक सहकार्य केले. याव्यतिरिक्त अमेरिका, श्रीलंकेबरोबर आर्थिक साहाय्यावर हस्ताक्षर करत आहे. हे दुसरे-तिसरे काही नसून एक प्रकारचे कर्ज जाळे आहे.

 यावरून हे स्पष्ट होते की, भारत आपल्या सहकार्‍यांची मदत करायला कधीही मागेपुढे पाहत नाही आणि त्याबदल्यात फार काही आशाही ठेवत नाही. फक्त त्यांनी बेईमानी करू नये, असे म्हटले जाते. श्रीलंकेबाबत भारताला असेच वाटते. दुसरीकडे चीनमुळेच आज श्रीलंकेची वाईट स्थिती झाली आहे. पण, आता चीनलाही वाटते की, श्रीलंकेचा कल आपल्या बाजूने असावा, तर श्रीलंकेबाबत अमेरिका उचलत असलेली पावले पाहता, असे दिसते की, अमेरिकादेखील श्रीलंका आपल्या बाजूने असावा, असा विचार करते. अशा परिस्थितीत श्रीलंकेला हे तिन्ही देश आपल्या मुठीत ठेवण्याचे पुरेपूर प्रयत्न करत असून अन्य देशांसाठी पाकिस्तान कधीकाळी युद्धक्षेत्र होता, तसा आता श्रीलंका होत असल्याचे दिसते.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

महेश पुराणिक

मूळचे नगर जिल्ह्यातील. नगरमधील न्यू आर्टस् कॉलेजच्या संज्ञापन अभ्यास विभागातून मास्टर इन कम्युनिकेशन स्टडीज ही पदव्युत्तर पदवी. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये मुख्य उपसंपादक(वृत्त) पदावर कार्यरत.