मुंबई: घरगुती म्हणजेच एलपीजी सिलेंडर बाबत सरकारने एक नवी अपडेट जाहीर केली आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर वितरणात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आता प्रत्येक गॅस सिलिंडरवर क्यूआर कोड दिला जाणार आहे. हे सिलिंडर लवकरच देशभरात उपलब्ध होतील. अनेकदा एलपीजी गॅस सिलेंडरबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात ज्याची उत्तरे कुठेच मिळत नाही पण आता या QR Codeच्या मदतीने या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहे. स्मार्टफोनवरुन तुम्ही हा QR कोड स्कॅन करुन तुमच्या प्रश्नांची विस्तृत माहिती जाणून घेणार आहात. हा कोड सिलेंडरच्या आधारकार्डसारखे काम करेल.
बऱ्याचदा टाकीतून गॅस चोरीचे प्रकार होतात. त्याची तक्रार करुनही कारवाई होत नाही. असे प्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने आधार कार्डप्रमाणे प्रत्येक गॅस सिलिंडरवर क्यूआर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी म्हणाले की, "हा एक मोठा बदल असेल. कारण आता ग्राहक एलपीजी सिलेंडरला ट्रॅक करू शकणार आहेत.
क्यूआर कोडचे फायदे
▪ क्यूआर कोडमुळे ग्राहकांना सिलिंडरच्या लोकेशनची माहिती मिळेल.
▪ सिलिंडरचे वजन, एक्सपायरी डेटसारखी डिटेल्स माहितीही मिळवू शकतो.
▪ गॅस सिलिंडर कुठे भरण्यात आलेला आहे, याची माहिती घेता येईल.
▪ सिलिंडरमधील गॅसची चोरी होत असल्यास त्याचा माग काढणं सोपे होईल.
▪ किती वेळा गॅस रिफिल केला, तसेच रिफिलिंग सेंटरमधून घरपोच गॅस मिळण्यास किती वेळ लागला, हे
समजेल.
▪ गॅस डिलरचे नाव समजणार असल्याने घरगुती गॅसचा व्यावसायिक कामासाठी वापर करता येणार नाही.