चित्राताईंनी दाखविला एक कागद अन् आव्हाडांचे लाखो रुपये पाण्यात!

    17-Nov-2022
Total Views |

चित्रा वाघ
मुंबई (चित्रा वाघ) : अनंत करमुसे यांनी कसा त्रास दिला, अशी कांगावा करणारी जाहिरात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वृत्तपत्रांमध्ये दिली आहे. 'मी जनतेच्या न्यायालयात आलो आहे' या मथळ्याखाली त्यांनी अनंत करमुसे यांनी केलेल्या जुन्या सोशल मीडिया पोस्ट पुन्हा जाहिरातीत प्रकाशित केल्या आहेत. जितेंद्र आव्हाड सध्या विनयभंगाच्या गुन्ह्यात जामीनावर आहेत. मुंब्र्यातील एका राजकीय कार्यक्रमात भाजप पदाधिकारी महिलेला धक्काबुक्की केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याशिवाय अनंत करमुसे प्रकरणात प्रमुख आरोपी म्हणून जितेंद्र आव्हाडांची पुढील सुनावणी २५ नोव्हेंबर रोजी असणार आहे. त्यापूर्वीच आव्हाडांनी जनतेच्या न्यायालयात दाद मागितली आहे.
 
या सगळ्याबद्दल प्रतिक्रीया देताना भाजप महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांनी चांगलंच सुनावलं आहे. "ओ आव्हाड. करमुसेच्या नावानं कांगारावळा करू नका. तुमच्याच शहर अध्यक्षांनी काहीही आक्षेपार्ह विधान केलं नाही, म्हणून माफी मागत पोलीस तक्रार मागे घेतली आहे. माझ्या कुटुंबियांवर बोलण्याआधी आपल्या ‘घरात’ काय चाललंय? ते पाहा मग तोंडच्या वाफा टाका.", असा सणसणीत टोला त्यांनी लगावला आहे. सोबत त्यांनी ट्विटमध्ये राष्ट्रवादी शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी पोलीस आयुक्त व अनंत करमुसेंना लिहिलेली पत्रही जोडली आहेत.
 
ठाणे पोलीस आयुक्तांना उद्देशून लिहीलेल्या पत्रात परांजपेंनी म्हटले आहे की, "अनंत करमुसेंनी आव्हाड कुटूंबियांबद्दल कुठल्याही प्रकारची तक्रार केलेली नाही. यामुळे ५ एप्रिल २०२० रोजी केलेली तक्रार मागे घेत आहे." तसेच अनंत करमुसेंनाही त्यांनी एक पत्र लिहीले आहे. ज्यात ते म्हणतात, की, "मी नोंदविलेल्या पोलीस तक्रारीबद्दल दिलगीरी व्यक्त करत आहे. तसेच या घटनेमुळे तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहे." जितेंद्र आव्हाडांविरोधात दाखविलेल्या दोन पुराव्यांनी आव्हाडांनी केलेल्या संपूर्ण जाहिरातबाजीची पोलखोल झाली आहे. अनंत करमुसे यांनी आव्हाड आणि कुटूंबियांविरोधात कुठल्याही प्रकाराचे वक्तव्य केलेले नाही, असा धडधडीत पुरावाच त्यांनी सादर केला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.