दिल्ली मद्य घोटाळा आणि ‘आप’चा भ्रष्टाचाराचा झाडू

    15-Nov-2022   
Total Views |
aap




मद्य घोटाळ्याप्रकरणी ‘ईडी’ने ऑक्टोबर महिन्यात दिल्ली आणि पंजाबमध्ये सुमारे तीन डझनांहून अधिक ठिकाणी छापे टाकले होते. या प्रकरणात जे आरोपी आहेत, त्यामध्ये दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, तत्कालीन अबकारी आयुक्त अर्वा गोपी कृष्णा, उपायुक्त आनंद तिवारी, सह आयुक्त पंकज भटनागर यांचा समावेश आहे. या शिवाय अन्य काही आरोपीही या प्रकरणात गुंतले आहेत.
दिल्लीमधील आम आदमी पक्षाच्या सरकारने केलेल्या कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने म्हणजे ‘ईडी’ने त्या पक्षाचे संपर्क प्रमुख विजय नायर आणि अभिषेक बोईनपल्ली नावाच्या एका व्यापार्‍यास नुकतेच ताब्यात घेतले आहे. आम आदमी पक्षाच्या सरकारने जे अबकारी धोरण आखले, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्याने दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी या सर्व प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी शिफारस केल्यानंतर ‘एफआयआर’ नोंदविण्यात आला. अबकारी धोरणात अनियमितता आढळून आल्याचे दिसून आले असले तरी ‘आप’च्या सरकारला बदनाम करण्यासाठी हे सर्व कुभांड रचले जात असल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे.विजय नायर यास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने 27 सप्टेंबर रोजी या प्रकरणी अटक केली होती. विजय नायर आणि अभिषेक बोईनपल्ली या दोघांनाही तिहार कारागृहात ठेवण्यात आले होते. ‘ईडी’ने या दोघांनाही तिहार कारागृहातून उचलले. त्या दोघांना ‘रिमांड कस्टडी’ मिळावी, यासाठी विशेष न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे.





विजय नायर याने अन्य सह आरोपींची आणि दारू उत्पादक व वितरक यांची हैदराबाद, मुंबई आणि दिल्लीमधील विविध हॉटेल्समध्ये भेट घेतल्याचा केंद्रीय अन्वेषण विभागाचा दावा आहे. हवाला मार्गाने हा सर्व आर्थिक गैरव्यवहार मार्गी लावण्यामध्ये विजय नायर याचा सहभाग असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. अभिषेक बोईनपल्ली आणि अन्य एक आरोपी समीर महिंद्र याचाही या आर्थिक गैरव्यवहाराचा कट रचण्यात सहभाग असल्याचे केंद्रीय तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. या सर्व प्रकरणी ‘ईडी’कडून नायर आणि बोईनपल्ली या दोघांची चौकशी करण्यात येईल.या मद्य घोटाळ्याप्रकरणी ‘ईडी’ने ऑक्टोबर महिन्यात दिल्ली आणि पंजाबमध्ये सुमारे तीन डझनांहून अधिक ठिकाणी छापे टाकले होते. या प्रकरणात जे आरोपी आहेत, त्यामध्ये दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, तत्कालीन अबकारी आयुक्त अर्वा गोपी कृष्णा, उपायुक्त आनंद तिवारी, सह आयुक्त पंकज भटनागर यांचा समावेश आहे. या शिवाय अन्य काही आरोपीही या प्रकरणात गुंतले आहेत.






‘ईडी’ आणि ‘सीबीआय’नुसार, दिल्ली सरकारने जे आधारित अबकारी धोरण आखले, त्यामध्ये अनेक चुकीच्या गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. परवानाधारकांवर मोठ्या प्रमाणात मेहरबानी करण्यात आली होती. काही प्रकरणी परवाना शुल्क माफ करण्यात आले होते वा त्यात सवलत देण्यात आली होती. संबंधित सक्षम अधिकार्‍याची अनुमती न घेता हा सर्व व्यवहार करण्यात आला, असा केंद्रीय तपस यंत्रणांचा आरोप आहे. जे प्रचलित नियम आहेत ते धाब्यावर बसवून अबकारी खात्याने यशस्वी निविदाधारकांनी ठेव म्हणून जी 30 कोटींची रक्कम जमा केली होती, ती परत करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप आहे. हा जो आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला, त्यामुळे शासनाचे 144.36 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व लक्षात घेऊन ‘ईडी’कडून तपास केला जात आहे. विजय नायर, अभिषेक बोईनपल्ली आणि अन्य आरोपींकडून यासंदर्भात काय काय नवीन माहिती मिळते, ते नजीकच्या काळात दिसून येईल. आमचे सरकार अत्यंत प्रामाणिकपणे काम करीत आहे, हा आम आदमी पक्षाचा दावा किती फोलपणाचा आहे ते या घडामोडींवरून दिसून येत आहे.




काँग्रेस आमदारास टिपू प्रेमाचे भरते!

कर्नाटकातील कोडगू भागात आणि केरळमध्ये मलबार भागात असंख्य हिंदूंवर अत्याचार करणार्‍या आणि हिंदू मंदिरांचा विद्ध्वंस करणार्‍या टिपू सुलतानाचे कर्नाटकमधील काँग्रेसच्या एका मुस्लीम आमदारास पुन्हा भरते आले आहे. आपण टिपू सुलतान याचा 100 फुटी पुतळा उभारणार असल्याचे या महाशयांनी घोषित केले आहे. काँग्रेसच्या या आमदाराने केलेल्या घोषणेवर हिंदू संघटनाची संतप्त प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविकच आहे. कर्नाटकचे शिक्षणमंत्री सी. एन. अश्वस्थ नारायण यांनी या कल्पनेचा निषेध केला आहे, तर श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक यांनी पुतळा उभारला गेल्यास तो उद्ध्वस्त करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.






 दुसरीकडे, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री पी. सी. सिद्धरामय्या यांनी टिपूचा पुतळा उभारण्यात गैर काय आहे, असा प्रश्न केला आहे. सिद्धरामय्या मुख्यमंत्री असतानाच 2016 मध्ये 10 नोव्हेंबर हा दिवस ‘टिपू जयंती’ म्हणून त्या सरकारने घोषित केला होता. कर्नाटकात टिपू जयंतीचे सरकार पुरस्कृत कार्यक्रम योजण्यात आले होते. पण, 2019 मध्ये कर्नाटकात भाजपचे सरकार येताच मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी सरकार पुरस्कृत टिपू जयंती रद्द केली होती. भाजप सरकारने दहावीच्या कन्नड भाषेच्या पाठ्यपुस्तकातून टिपू सुलतानावरील धडा पूर्णपणे वगळून त्याच्यासंदर्भातील काही ओळी ठेवल्या होत्या. त्यावरून राज्य सरकारवर आरोपही करण्यात आले.





काँग्रेसच्या आमदाराने टिपूचा जो पुतळा उभारण्याचे ठरविले आहे, तो पुतळा बंगळुरू विमानतळावर उभारण्यात आलेल्या केम्पेगौडा यांच्या पुतळ्यापेक्षा आठ फुटांनी कमी उंचीचा असेल. पण, कोठे केम्पेगौडा आणि कुठे हा अत्याचारी टिपू सुलतान? दोघांची बरोबरी तरी होऊ शकते का? हिंदू समाजाकडून आणखी संतप्त प्रतिक्रिया उमटण्यापूर्वी काँग्रेसचे आमदार तन्वीर सैत हे आपला हा मनसुबा मागे घेतील, अशी अपेक्षा आहे. हिंदू समाजाला दुखवून टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करण्याच्या भानगडीत या आमदाराने पडू नये, असे सांगावेसे वाटते.





धर्मांतर प्रकरणी दहा लोकांविरुद्ध ‘एफआयआर’



राष्ट्रीय बाल हक्क संरक्षणविषयक राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानुनगो यांनी मध्य प्रदेशातील दामोह भागात कार्य करीत असलेल्या एका ख्रिश्चन धर्मगुरूंशी संबंधित दहा जणांविरुद्ध पोलिसांकडे गुन्हा नोंदविला आहे. कानुनगो हे मध्य प्रदेशातील दामोह भागाच्या भेटीस अचानकपणे गेले होते. ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून चालविण्यात येत असलेल्या त्या भागातील अनाथालये आणि बालगृहांना अचानक भेट देऊन त्यांनी पाहणी केली. कानुनगो हे पाहणीसाठी त्या संस्थांपैकी एका संस्थेमध्ये गेले असता त्यांना मुख्य प्रवेशद्वारावर प्रदीर्घ काळ ताटकळत ठेवण्यात आले. कानुनगो यांच्या समवेत अन्य अधिकारीही होते.






मिशनर्‍यांच्या या अनाथगृहात आणि बालगृहात बालकांचे धर्मांतर करण्याचे कार्य चालते, असे कानुनगो यांनी म्हटले आहे. राज्यातील वनवासीबहुल दिंडोरी जिल्ह्यातून या बालगृहामध्ये आणलेल्या एका बालकास धर्मगुरू बनण्यासाठीचे शिक्षण देण्यात आल्याचे कानुनगो यांनी म्हटले आहे. ही माहिती हाती लागताच कानुनगो यांनी देहात पोलीस स्टेशन गाठले आणि तेथे तक्रार केली. प्रदीर्घ काळ प्रतीक्षा केल्यानंतर पोलिसांनी संबंधित ख्रिश्चन मिशन चालविणार्‍यांविरुद्धची तक्रार दाखल करून घेतली, असेही कानुनगो यांनी सांगितले. आपण या संस्थेस अचानकपणे भेट दिली होती, पण संबंधित खात्याच्या कर्मचार्‍यांनी आपल्या या भेटीची आगाऊ माहिती त्यांना पुरविली. एका अधिकार्‍याचा मोबाईल फोनही आपण पकडला, असेही कानुनगो यांनी सांगितले.







मिशनर्‍यांकडून धर्मांतराचे जे प्रकार होत आहेत ते म्हणजे बालकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे सरळसरळ उल्लंघन आहे. या प्रकरणी तपास करण्यास आपण पोलिसांना सांगितले. या प्रकारांमध्ये स्थानिक अधिकारीही गुंतले असल्याचे दिसून येत आहे, असे ते म्हणाले. कानुनगो यांच्या तक्रारीनंतर दहा जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मात्र, त्या वसतिगृहाच्या प्राचार्य त्रिझा यांनी या आरोपांचे खंडन केले आहे. वसतिगृहामध्ये राहणार्‍या बालकांवर कोणतेही बंधन नसते. हिंदू आणि मुस्लीम मुले आपल्या धर्मानुसार येथे वर्तन करतात, असेही त्यांनी सांगितले. सुरक्षेच्या कारणास्तव वसतिगृहाचे दरवाजे उघडण्यास विलंब झाला, असा तकलादू, कोणालाही न पटणारा खुलासा त्रिझा यांनी केला आहे. वनवासी भागात ख्रिस्ती मिशनरी किती विविध पातळ्यांवर धर्मांतराचे कार्य करतात याची कल्पना या उदाहरणावरून यावी!




राजस्थान : गुर्जर समाजाचा ‘भारत जोडो’ यात्रेस विरोध!



काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. ही यात्रा काही दिवसांनी राजस्थानात जाणार आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. पण, त्या राज्यातील गुर्जर आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय बैन्सला यांनी या यात्रेला विरोध करण्याचे आवाहन केले आहे. विजय बैन्सला हे गुर्जर समाजाचे नेते किरोरीसिंह बैन्सला यांचे पुत्र आहेत. राजस्थानमधली गेहलोत सरकार गुर्जर आरक्षणासंदर्भातील उर्वरित मागण्यांची अंमलबजावणी करीत नसल्यामुळे संतप्त झालेल्या विजय बैन्सला यांनी ‘भारत जोडो’ यात्रेस विरोध करण्याचे आवाहन केले आहे.







राजस्थानमध्ये गेहलोत सरकार सत्तेवर येऊन चार वर्षे झाली. पण, गुर्जर आरक्षणाबाबत जो करार झाला, त्याची अंमलबजावणी अद्याप केली गेली नाही. “आम्ही शांत आहोत, पण आमचा संयम ढळत चालला आहे,” असे ते म्हणाले. ‘भारत जोडो’ यात्रा शनिवार, दि. 3 डिसेंबर रोजी राजस्थानात प्रवेश करीत आहे. गुर्जर समाजाने दिलेला इशारा लक्षात घेता तोपर्यंत गेहलोत सरकारला गुर्जर समाजाच्या मागण्यासंदर्भात काही सकारात्मक निर्णय घ्यावे लागतील. तसे काही न घडल्यास ‘भारत जोडो’ यात्रेला गुर्जर समाजाच्या विरोधास सामोरे जावे लागेल. गेहलोत सरकार असे काही होऊ देणार नाही, असे गृहीत धरण्यास हरकत नाही.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.