...म्हणून कीर्तिकरांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश उद्धव ठाकरेंना दणका ठरणार

    14-Nov-2022
Total Views |



...म्हणून किर्तीकरांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश उद्धव ठाकरेंना दणका ठरणार
मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील खासदार गजानन कीर्तिकर गेल्या काही दिवसांपासून सध्या कोणता झेंडा घेऊ हाती या भूमिकेत दिसून येत होते. अखेर रविंद्र नाट्य मंदिर येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला जय महाराष्ट्र केला आहे. खासदार गजानन कीर्तिकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.
कीर्तिकरांनी शिंदेंची साथ दिल्याने आता त्यांच्यासोबत असलेल्या लोकसभा खासदारांची संख्या १३ वर गेली आहे, तर राज्यसभेचे तीन खासदार धरुन ठाकरेंकडे ९ खासदार राहिले आहेत. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी बोलाविलेल्या बैठकीला कीर्तीकर यांची अनुपस्थिती सर्वांच्याच भुवया उंचावणारी ठरली विशेष म्हणजे यापूर्वी गटप्रमुखांच्या मेळाव्याला उपस्थित असताना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी अशीच प्रतिक्रिया गजानन कीर्तिकर यांनी दिली होती. शुक्रवारी पुन्हा एकदा किर्तीकर आणि शिंदे एकत्र दिसल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.
कीर्तीकर यांची प्रकृती अस्वस्थ असताना स्वतः एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली होती. कीर्तीकर यांचा मतदारसंघ मानला जाणाऱ्या आणि शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघातील शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते सध्या एकनाथ शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत. मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे विरोधात मोर्चा बांधणी सुरू केली असताना शिवसेनेचे जुने आणि जाणते कार्यकर्तेच शिंदे गटात राहणार म्हटल्यावरती मुंबई महापालिकेच्या जागांसाठी भाजपसोबत युती करण्यासाठी शिंदे उमेदवार शोधत आहेत मुंबई महापालिकेतील सध्याची परिस्थिती पाहता त्रिशंकू असलेली लढत आता पंचरंगी होणार आहे.
काँग्रेस राष्ट्रवादी यांना स्वतंत्र निवडणुका लढवण्याची इच्छा आहे तसेच भाजपा शिंदे गट एकत्र येऊन निवडणूक लढवू इच्छित आहेत तर मनसेने एकला चलोरे ची भूमिका घेतली आहे. याच दरम्यान एका वार्डमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. ठाण्यात वर्चस्व असलेले एकनाथ शिंदे आपली ताकद आता मुंबईत उतरवून पाहत आहेत याचमुळे शिवसेनेतील जुने जाणते नेते आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांचा असणार आहे. कीर्तीकर आजच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते मात्र ते स्वतःच गैरहजर असल्याने त्यांनी काही वेगळा निर्णय घेतलाय का याबद्दल अद्याप स्पष्टता झालेली नाही तसेच त्यांच्या बैठकीला अनुपस्थित असण्याचे ठोस कारणेही समजू शकलेले नाही.


गजानन किर्तीकर यांच्या जाण्याने काय फरक पडेल?
लोकसभा उत्तर-पश्चिम खासदार मतदार संघ हा काँग्रेसकडून हिसकावून घेण्यापासून ते शिवसेनेचा बालेकिल्ला तयार करण्यात किर्तीकरांचे मोठे योगदान आहे. दिवंगत अभिनेते सुनील दत्त आणि त्यांच्यानंतर त्यांच्या कन्या प्रिया दत्त यांच्या रुपाने कित्येक वर्ष हा काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ राहिला आहे. १९६७ सालापासून मतदारसंघात झालेल्या एकूण १४ निवडणुकांमध्ये ९ वेळा काँग्रेसचा खासदार या मतदार संघातून निवडून आला आहे. आणि त्यातही ५ वेळा एकटे सुनील दत्त इथून लोकसभेवर गेले आहेत.


काँग्रेसच्या या एकाधिकारशाहीला २०१४च्या मोदी लाटेचा मोठा धक्का बसला. १९९८च्या निवडणुकांनंतर पहिल्यांदाच इथून गजानन किर्तीकरांच्या रुपाने शिवसेनेचा उमेदवार निवडून आला. जवळपास २ लाख मतांनी काँग्रेसच्या गुरुदास कामतांचा पराभव झाला होता. कामत यांच्यानंतर माजी खासदार संजय निरुपम यांनी या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला टक्कर देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सलग दोन टर्म भाजप शिवसेना महायुतीची ही जागा किर्तीकरांनी राखली होती. स्थानिक लोकप्रतिनिधींचा शिंदे गटाच्या बाजूने असलेला कौल पहाता किर्तीकर यांनी शिंदे गटात हा प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेसाठी उबाठा बालेकिल्ला मानला जाणारा हा मोठ्या मतदार संघाचे खासदार बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे गेल्याने ही उद्धव ठाकरेंसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.


सुनील प्रभू विरुद्ध किर्तीकर असा संघर्ष होणार?
उबाठा गटाचे आमदार सुनील प्रभू यांची सध्या असलेली मातोश्रीशी जवळीक आणि किर्तीकर यांनी घेतलेला हा निर्णय ही भविष्यात या मतदार संघातील संर्घषाची ठिणगी ठरू शकणार आहे. खासदार विरुद्ध आमदार, असे चित्र असणार कि किर्तीकर आमदारांची मने वळविण्यात यशस्वी होणार हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.