मारहाणीची दादागिरी राज्यात सहन करणार नाही!

    14-Nov-2022
Total Views |


मारहाणीची दादागिरी राज्यात सहन करणार नाही!
मुंबई : 'एखाद्या चित्रपटातील काही दृश्यांबाबत आक्षेप असेल तर त्याच्या विरोधात तक्रार करता येईल किंवा शांततामय पद्धतीने त्यावर आपला विरोधही प्रदर्शित करता येईल. परंतु, आपला आक्षेप नोंदवण्यासाठी चित्रपटगृहात शो सुरु असताना घुसणे आणि प्रेक्षकांना मारहाण करण्याची दादागिरी शिंदे - फडणवीस यांच्या राज्यात कोणीही सहन करणार नाही,' असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जितेंद्र आव्हाडांना दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपटगृहात घुसून केलेल्या दादागिरीवर बोलताना बावनकुळेंनी त्यांना इशारा दिला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या संघटनात्मक प्रवास दौऱ्यावर असताना शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, भाजप कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, भाजपा कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे व विभागीय संघटनमंत्री मकरंद देशपांडे उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले की, 'कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. एखाद्या चित्रपटात काही आक्षेपार्ह असेल तर त्याच्या विरोधात सेन्सॉर बोर्डाकडे तक्रार करावी. विरोध करण्यासाठी शांततामय मार्गाने धरणे देता येते, निदर्शने करता येतात किंवा उपोषण करता येते. पण सीसीटीव्ही चित्रिकरण चालू असूनही थिएटरमध्ये जाऊन कोणी लोकांना मारहाण करेल आणि महिलांचा अपमान करेल तर दादागिरी खपवून घेणार नाही. जर कुणी अशी दादागिरी करत असेल तर त्यावर सरकार कायदेशीर मार्गाने कारवाई नक्की करेल.'

निष्ठावंतांचा भारत जोडोशी संबंध नाही
'काँग्रेस पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची यात्रा राज्यात आली आहे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपात प्रवेश करत आहेत. काँग्रेसच्या बाराशे कार्यकर्त्यांनी नुकताच सातारा येथे भाजपामध्ये प्रवेश केला. गेल्या आठवड्यात नंदूरबार जिल्ह्यातील काँग्रेसचे तीन नगरसेवक भाजपामध्ये दाखल झाले. राहुल गांधी यांची यात्रा काँग्रेसचे नेते आणि त्यांच्या मुलांनी ताब्यात घेतली आहे. याचा अर्थ असा की काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना यात्रेचा गंधही नाही.' असे बावनकुळे म्हणाले आहेत.
गजानन कीर्तिकारांच्या पक्षप्रवेशावर ते म्हणाले की, 'शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत नुकताच प्रवेश केला. किर्तीकरांसारखा शिवसेनेसाठी आयुष्य देणारा कार्यकर्ता ठाकरेंना सोडून जातो हे गंभीर आहे. अशा रितीने शिवसेनेच्या मूळ विचारांचे सर्वजण सोडून गेले तरी उद्धव ठाकरे यांना काही फरक पडत नाही. कारण त्यांच्या पाठीशी आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाचे सर्व काही स्वीकारले आहे.'
ऊर्जा निर्मिती प्रकल्पावरून गैरसमज नकोत
'ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्प मध्य प्रदेशला मिळाला आहे,यावर चर्चा केली जात आहे. परंतु, वास्तविकदृष्ट्या याबाबतीत गैरसमज पसरवू नये अशी माझी विनंती आहे. हा प्रकल्प मिळण्यासाठी जून महिन्यात केंद्र सरकारला एक निर्दोष प्रस्ताव सादर करायचा होता, पण त्यावेळी सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीने ते काम केले नाही, त्यामुळे हा प्रकल्प गमावण्यासही महाविकास आघाडीच दोषी आहे. त्याबद्दल शिंदे फडणवीस सरकारला दोष देता येणार नाही.' असे म्हणत बावनकुळेंनी पुन्हा एकदा मविआ सरकारकडे बोट दाखवले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.