सर्वांगाने, सर्वार्थाने श्रीमंत...

    14-Nov-2022
Total Views |

बाबासाहेब पुरंदरे 
 
 
 
 
 
आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा प्रथम स्मृतिदिन. त्यानिमित्त बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त करणारा लेख प्रकाशित करत आहोत. बाबासाहेबांच्या तनामनातून, रोमारोमातून फक्त एकच नाद ऐकू येत असे... छ. शिवाजी महाराज. त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्रातल्या मातीवर, गडकोटांवर, इतकंच नाही, तर भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीवर अपरंपार प्रेम केलं.
 
 
‘पुण्यभूषण’, ‘महाराष्ट्र भूषण’, ‘पद्मविभूषण’ श्रीमंत बळवंत मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे... त्यांना ही उपाधी कोणी, कधी दिली हे मला ठाऊक नाही. पण व्यक्तिगत मला त्यांना श्रीमंत म्हणायला खूप आवडायचे. सर्वांगांनी, सर्वार्थाने होतेच ते श्रीमंत. आपल्या वयाने, वाणीने, वचनाने, वर्तनाने, वक्तृत्वाने, लेखनाने, काव्य प्रतिभेने ही श्रीमंती त्यांनी हजारो लोकांवर अक्षरश: उधळली.
वास्तविक बाबासाहेबांवर आतापर्यंत इतकं लिहिलं गेलंय. यापुढेही लिहिलं जाईल. पण प्रत्येक वेळी हेच जाणवत राहतं की त्यांच्याबद्दल कितीही लिहिलं तरी त्यात ते मावतच नाहीत. दशांगुळे राहतातच.
 
 
 
भगवंताने बाबासाहेबांना छ. शिवाजी महाराजांच्या रुपात प्रत्यक्ष दर्शन दिले असावे. असावे काय दिले होतेच. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी दगडा-धोंड्यात आणि माणसांमाणसातही त्यांना छ. शिवाजी महाराज दिसत होते. बाबासाहेबांच्या तनामनातून, रोमारोमातून फक्त एकच नाद ऐकू येत असे... छ. शिवाजी महाराज. त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्रातल्या मातीवर, गडकोटांवर, इतकंच नाही, तर भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीवर अपरंपार प्रेम केलं. भेटलेल्या प्रत्येक बालवृद्धासहित प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांचे संबोधन आहो-जाहोचेच राहीले. भेटायला येणार्‍या व्यक्तीला घराच्या दारापर्यंत सोडायला जाणारे श्रीमंत विसरताच येणार नाहीत. त्यांनी शिवचरित्र केवळ लिहीलं सांगितलंच नाही तर प्रत्यक्ष आचरणात आणलं.
 
 
 
राष्ट्रीय चारित्र्य निर्माण होण्यासाठी शिवचरित्राशिवाय दुसरा पर्याय नाही, असं ते नेहमी म्हणत असत. त्या शिवचरित्राच्या प्रचार-प्रसारासाठी श्रीमंतांनी आपलं अवघं आयुष्य खर्ची घातलं. असंख्य व्याख्याने दिली.
 
 
 
बाबासाहेब पुरंदरे म्हणजे एक चालतेबोलते विद्यापीठ होते. जो कोणी उघड्या डोळ्याने आणि नितळ मनाने बाबासाहेबांच्या संपर्कात आला त्याला काही ना काही लाभ झाल्याशिवाय राहिलाच नाही. ऐतिहासिक अंगरखे, पगड्या, विविध प्रकारे बांधले जाणारे फेटे, वस्त्र, विविध प्रकारची शस्त्र, शिंगे, तुतार्‍यासारखी वादय, चवर्‍या, मोरचेलं, राजदंड अशा कितीतरी गोष्टी इतरत्र बाहेर केवळ पाहायला मिळणे दुष्प्राप्य आणि इथे बाबासाहेबांकडे मुक्त हस्ताने हाताळायला मिळत होत्या. अंगावर ल्यायला लाभत होत्या. त्या वस्त्र, वस्तूंबाबतची कितीतरी नवनवीन माहिती मिळत होती. हे झालं वस्तूंबाबत पण महाराष्ट्रातील देवळे, दीपमाळा, मूर्ती, विहिरी, विविध चित्रकारांनी रेखाटलेली चित्रं, विविध ठिकाणची भौगोलिक परिस्थितीनुसारची पिकं, अवाक् होऊन जावे असा बाबासाहेबांचा या सर्वच विषयांचा सूक्ष्म अभ्यास होता.
 
 
 
वर्षानुवर्षे रुक्ष सनावळ्यांच्या जंजाळात सापडलेला छ. शिवाजी महाराजांचा इतिहास रंजक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी केवळ शिवाजी महाराजांचाच इतिहास अभ्यासला असे नाही, तर भगवद्गीतेपासून संत वाङ्मय, गोंधळी, भराडी, चित्रकथी इत्यादी लोककला प्रकार, पुराण यांचाही अभ्यास केला. या प्रत्येक विषयासाठी विद्यापीठातील वाचस्पती पदवीसाठी ते मागदर्शक म्हणून नावाजले गेले असते, एवढा प्रचंड त्यांचा व्यासंग होता. त्या त्या विषयातला अधिकार होता.
 
 
 
एकदा सहज म्हणून बाबासाहेबांना पर्वती वाड्यावर भेटायला गेला होतो. रात्रीचे 10-10.30 वाजले असतील. गप्पा होता होता शिवचरित्रातील एका प्रसंगाबाबत मी त्यांना विचारले आणि त्यांनी तो प्रसंग सांगायला सुरुवात केली. हावभावासहित अत्यंत नाट्यमय पद्धतीने. ते बोलायचे थांबले त्यावेळेस रात्रीचे 12.30 वाजले होते. कदाचित मी ऐकणारा एकटा होतो, पण समोर जणू हजारो श्रोते ऐकायला बसलेत अशा आविर्भावात तो प्रसंग ते डोळ्यांसमोर उभा करत होते. त्यावेळेस त्यांचं वय होते फक्त 92 वर्षांचं. कोणत्याही ऐतिहासिक संदर्भात कोणत्याही वयातील कोणीही अगदी साधी जरी शंका विचारली तरी त्यांच्या डोळ्यात एकदम चमक यायची आणि सुरू व्हायची त्यांची प्रभावी ओघवती वाणी. हीच त्यांची ऊर्जा होती.
 
 
 
बाबासाहेब इतिहासकार, शिवचरित्रकार व वक्ते म्हणून प्रसिद्ध झाले नसते तर एक थोर सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध पावले असते. त्यांचे त्याबाबतचे प्रचंड काम अप्रकाशितच राहीलं. या हाताचं त्या हाताला कळू न देता त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत प्रचंड दानधर्म केला. व्यक्तीपासून सामाजिक संस्थांपर्यंत उदंड स्वरुपात आर्थिक मदत दिली. आज त्यांच्या आर्थिक सहकार्यातून अनेक सामाजिक संस्था विविध क्षेत्रात कार्य करत आहेत. सामाजिक चालीरीतीत, रूढी परंपरांमध्ये न बसणारी अनेक लग्नं त्यांनी लावून दिली. एवढेच नाही, तर त्या नवीन दाम्पत्यांचा प्रपंच मार्गी लागेपर्यंत राहण्याच्या जागेपासून आर्थिक मदतीपर्यंत सर्व प्रकारची मदत वडीलकीच्या नात्याने खंबीरपणे मागे उभे राहून केली. बाबासाहेबांनी उभे केलेले अनेक प्रपंच आज गुण्या-गोविंदाने नांदतायेत. आम्ही बाबासाहेबांच्या सहवासात संपर्कात आहेत म्हणून आम्हाला मुलगी तरी दिली, आमची लग्न झाली, नाहीतर आम्हाला कोणी मुलगी दिली असती? अशीही अनेक उदाहरणे आहेत. बाबासाहेबांच्या सहवासात आलो नसतो तर मारामारी आणि गुंडगिरीकडेच वळालो असतो, असे म्हणणारे अनेक तरुण आज विविध प्रकारे विधायक शिवकार्यात आहेत.
व्यसनं सुटावीत म्हणून बाबासाहेबांनी पंढरपूरला नेऊन अनेकांना तुळशीच्या माळा घालायला लावल्या. अनेकांच्या लग्नात अंतरपाट धरलेत. आग्रहाने लग्नाच्या पंक्ती वाढल्यात. बारशाच्या दिवशी शालीची अंथरूण-पांघरूण करून मांडीवर घेतलेली बाळं घसघशीत आहेरासहित त्यांच्या आई-बापाच्या हाती सोपवलीयेत. ही सर्व मंडळी श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे कुटुंबीय आहेत.
 
 
 
बाबासाहेब सतत दुसर्‍याच्या आनंदासाठी जगले. चार वर्षांपूर्वी ते दिवाळीनिमित्त पुण्याबाहेर एका व्यक्तीकडे राहायला गेले होते. दीपावलीनंतर ते पुण्यात आले त्यावेळेस त्यांच्या हातावर सुबक नाही पण ओबडधोबड मेंदी काढलेली दिसली. त्यांना विचारले बाबासाहेब मेंदी? तर म्हणाले आहो ज्यांच्याकडेराहिलो त्यांच्या घरात एक बाळ (लहान मुलगी). त्यांनी काढली ही मेंदी.
आता हे ‘पद्मविभूषण’ चार ठिकाणी कार्यक्रमांना जाणार, ती हातावरची मेंदी लोकं बघणार या गोष्टी त्या लहान मुलीच्या आनंदापुढे श्रीमंतांना गौण होत्या. नागपंचमीला श्रीमंतांचा तिथीने वाढदिवस. पुण्यातील, पुण्याबाहेरील सर्वच मंडळींचे ते एक प्रकारचे स्नेहसंमेलनच. सकाळपासूनच ‘पर्वती’ वाड्यावर बाबासाहेबांना भेटण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी लोकांचा जो ओघ सुरू व्हायचा तो रात्री 10.30-11पर्यंत सुरूच असायचा. त्याचदरम्यान लतादीदींपासून विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे शुभेच्छांचे दूरध्वनी प्रतापराव टिपरे (बाबासाहेबांचे स्वीय सहाय्यक) बाबासाहेबांकडे देत असायचे. रात्री 10-10.30ला हा सोहळा संपला की बाबासाहेब त्यांच्या घरात जायचे. त्यांच्याकडेशिक्षणासाठी राहिलेली मुलं आणि आणखी काही दहा-पाच मंडळी असे 15-20 लोक तिथे असायचे. दिवसभर मान्यवरांच्या गराड्यात असलेले बाबासाहेब आता फक्त त्या तरुणांचे असायचे. कोणी बाबासाहेबांना कपडे बदलायला मदत करतंय, कोण औषधे देतंय. तोपर्यंत कोणीतरी एकजण भला थोरला केक घेऊन बाबासाहेबांच्या समोरील चौपाईवर ठेवायचा. बाबासाहेबांच्या हस्ते केक कापला जात असतानाच कपट्याचे फटाके फोडले जायचे. फुले उधळली जायची.
 
 
 
बाबासाहेब केक खायचे नाहीतच. ही तरुण मुलेच तो केक संपवायची. त्या मुलांच्या चेहर्‍यावर प्रचंड आनंद दिसायचा. 95 वर्षांचे श्रीमंत 19 वर्षांचा तरुण झालेला असायचे.
 
 
 
1922 साली स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या श्रीमंतांनी सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक केवढी तरी स्थित्यंतरे पाहिली. पण ते काळानुरूप स्वतःला बदलत राहिले. स्वतः भरभरून आनंद घेतानाच तो असंख्य हातांनी इतरांना वाटत राहीले. बाबासाहेबांना ‘पद्मविभूषण’ जाहीर झाले त्यावेळेस मी त्यांना म्हणालो की, आतापर्यंत स्थितप्रज्ञ व्यक्तीची लक्षणं फक्त वाचलीयत, ऐकलीयत की जी व्यक्ती प्रचंड दुःखानेही डळमळीत होत नाही. अतीव आनंदाने हुरळून जात नाही. पण अशी व्यक्ती प्रत्यक्ष पाहण्याचा योग मात्र आज तुमच्या रूपाने लाभतोय. तेव्हा ते मिश्किल हसले किंचितसे आणि म्हणाले, मला त्या गोपाळ कृष्णाला विचारायचंय (गोपाळ कृष्ण त्यांचा अतिशय आवडता देव) की तू स्वतःला एवढा स्थितप्रज्ञ म्हणवतोस, मग ज्यावेळेस अभिमन्यू मारला गेला त्यावेळेस तुझ्या डोळ्यात अश्रू का आले? मी अजूनही त्यांच्या म्हणण्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतोय.
 
 
 
मी बाबासाहेबांना कधीच चिडलेलं, संतापलेलं पाहिलं नाही. कोणाचा द्वेष, निंदा करताना ऐकलं नाही. त्यांच्या इप्सित ध्येयापुढे या गोष्टी करायला त्यांना वेळच नव्हता. त्यांची काही वाक्यं वज्रलेपासारखी मनावर कोरली गेलीयत. ते म्हणायचे, कोणतंही काम एकदम उत्तम करा. अगदी चिता रचायची झाली तरी इतकी उत्तम आणि सुरेख रचली गेली पाहिजे की, पाहाणार्‍याला वाटावं की जाऊन झोपावंच त्या चितेवर.
 
 
 
बेचैनीत जगावं आणि चैनीत मरावं, हेही त्यांचंच वाक्य. या वाक्याप्रमाणेच जगले ते. अगदी बेचैनीत जगले आणि गेले ते अगदी चैनीत. लेकी, सुना, मुलं, बाळं आणि असंख्य जोडलेल्या प्रचंड मोठ्या कुटुंबाच्या समृद्धीत. जाताना मात्र त्यांचे अपूर्ण राहिलेले शिवसृष्टीचे स्वप्न पुढच्या पिढीकडे पूर्ण करण्यासाठी म्हणून सोडून गेलेत.
 
 
 
त्यांना म्हणायचे खरंतर बाबासाहेब पण त्या होत्या मात्र आईसाहेब. त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला आईचे प्रेम, माया, वात्सल्य, दिले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चुकलेल्या सर्वांना अगदी त्यांचा द्वेष करणार्‍यांनाही उदार अंतःकरणाने फक्त आणि फक्त क्षमाच केली. जी केवळ आईच करू शकते.
 
 
 
- मंदार परळीकर