दक्षिण कोरियात मशिदीवरून रणकंदन

    13-Nov-2022   
Total Views |
korea
शांतताप्रिय दक्षिण कोरियात सध्या स्थानिक आणि स्थलांतरित मुस्लिमांमधील वाद उफाळून आला आहे. दक्षिण कोरियातील डेगू शहरातील दाहेयोंग-डोंग येथील 2020च्या अखेरीस बांधण्यास सुरुवात झालेल्या एका मशिदीवरून स्थानिक आणि स्थलांतरित मुस्लीम आमनेसामने आले आहेत. नाटक आणि ‘पॉप’ संस्कृतीसाठी ओळखल्या जाणार्‍या या देशापुढे आता झपाट्याने वाढणार्‍या स्थलांतरित नागरिकांचे मोठे आव्हान आहे. 2020च्या आकडेवारीनुसार स्थलांतरित नागरिकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या 3.3 टक्के असून जी 2022च्या अखेरपर्यंत आणखी वाढू शकते.दाहेयोंग-डोंग मध्ये मशिदीच्या बांधकामामुळे स्थानिक दक्षिण कोरियन नागरिक दहशतीत असून अनेकजण आपली घरे सोडण्याच्या तयारीत आहे.


दरम्यान, क्युंगपुक राष्ट्रीय विद्यापीठात शिकणारे मुस्लीम विद्यार्थी 2014 पासून नमाज अदा करण्यासाठी दाहेयोंग-डोंगमधील एका घराचा वापर करत होते. 2020मध्येपाकिस्तान आणि बांगलादेशातील सहा मुस्लिमांच्या गटाने याठिकाणी जमीन खरेदी केल्यानंतर परिस्थिती बदलली. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये या मुस्लिमांनी स्थानिक अधिकार्‍यांची परवानगी घेऊन 20 मीटर लांबीची मशीद बांधण्यास सुरुवात केली. ज्या ठिकाणी नमाज अदा करत आहोत, तिथे केवळ 150 लोक जमू शकतात, असे कारण या स्थलांतरीत मुस्लिमांनी दिले. मशीद बांधली जात असल्याने स्थानिक कोरियन नागरिक भयभीत झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिमांसोबत राहत असून त्यांची अडचण नाही. पण, येथे मशीद बांधल्याने नमाजाचा आवाज वाढेल. मशिदीच्या बांधकामामुळे परिसर गजबजून जाईल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.





 जांग नावाच्या 62 वर्षीय व्यक्तीने माध्यमांशी बोलताना सांगितले की, जर ही मशीद बांधली गेली, तर मी हा भाग सोडून जाईल. आम्ही अनेक वर्षांपासून मुस्लीम समुदायासोबत एकोप्याने राहतो. सुट्टीच्या काळात अन्न आणि भेटवस्तू वाटून घेत होतो. आम्ही त्यांच्या सभांबद्दल तक्रार केली नाही. परंतु, लोकांचा मोठा जमाव, बोलणे-चालणे, मोटारसायकल चालवण्याचे आवाज आणि अनधिकृत पार्किंगचा त्रास वाढला आहे. मशिदीच्या बांधकामाला परवानगी मिळाली असली तरी स्थानिकांचा मशिदीला विरोध कायम आहे. 2020 साली मशिदीचे बांधकाम सुरू झाल्यापासून स्थानिक जिल्हा प्रशासनाकडे येथील स्थानिकांनी सातत्याने तक्रारी पाठवल्या.





स्थानिकांच्या दबावामुळे जिल्हा प्रशासनाने मशीद बांधण्याची परवानगी रद्द करत मशिदीचे बांधकाम थांबवले. परंतु, यानंतर स्थलांतरित मुस्लिमांनी थेट जिल्हा प्रशासनाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आणि न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला. यानंतर सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली. त्यानंतर स्थानिकांनी जिल्हा प्रशासनाकडे मशीद स्थलांतरित करण्याचे आवाहन केले. पण त्याचा उपयोग झाला नाही. तरीही मशिदीचे बांधकाम थांबविण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. स्थानिक कोरियन लोक आता मशिदीच्या गेटवर वाहने उभी करत असून डुकराचे कापलेले शिर रस्त्यावर ठेवत आहेत. इस्लाममध्ये डुकराचे मांस निषिद्ध असल्याने येथील स्थानिक उघड्यावरच डुकराचे मांस शिजवत असून नमाजाच्या वेळी मोठ्या आवाजात गाणी वाजवून मशीद निर्माणाचा निषेध करत आहेत.


ठिकठिकाणी पोस्टर लावून मशिदीच्या बांधकामाला विरोध केला जात आहे. स्थानिकांच्या विरोधानंतरही मशिदीचे बांधकाम 60 टक्के पूर्ण झाले असून 2022च्या अखेरीस ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यांनी आमच्या देशात कधीही पाय ठेवू नये, यासाठी केवळ त्यांचे हिजाब नियम पुरेसे असल्याचे स्थलांतरित मुस्लीम विरोधी चळवळीतील निर्वासित ‘आऊट’चे नेते ली ह्युंग-ओह यांनी म्हटले आहे.





 2007 मध्येही, तालिबानने दक्षिण कोरियाच्या 23 कर्मचार्‍यांना ओलीस ठेवून एका ख्रिश्चन धर्मगुरूंची हत्या केली होती. त्यामुळे आता पुन्हा एका मशीद निर्माणाच्या मुद्द्यावरून स्थानिक दक्षिण कोरियन नागरिक आणि स्थलांतरित मुस्लिमांमध्ये जुंपली आहे. त्यामुळे हा वाद कधी शांत होईल, हे येणारा काळच ठरवेल. परंतु, अनेक देशांनी अशा कट्टरतावाद्यांना आश्रय देण्याचे गंभीर परिणाम भोगले आहेत. त्यात भारतासह अमेरिका, फ्रान्स यांसारख्या देशांचाही समावेश आहे. त्यामुळे दक्षिण कोरियातील व्यवस्था भले जागी झाली नसेल. परंतु, तेथील जनता खडबडून जागी झाली, हे मात्र विशेष...




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.