एक गाव, एक मंदिर, एक स्मशानभूमी!

परभणीतील कळगाववाडी, साबा गावाच्या सामाजिक समरसतेची यशोगाथा...

    12-Nov-2022   
Total Views |
 
स्मशानभूमी
 
 
 
‘सब समाज को साथ लिये हैं’ हे सूत्र गौरवशाली भारताच्या उज्जवलतेचे मंगलगान. त्यासाठी जातीपातीची विषमता दूर सारून बंधुत्वाने आणि स्नेहाने सगळा समाज एक होणे गरजेचे आहे. परभणीमधील कळगाववाडी येथे ‘एक गाव, एक मंदिर’ तर साबा गावात ‘एक गाव, एक स्मशानभूमी’ हे निर्णय गावकर्‍यांनी सर्वानुमते घेतले आणि त्याची कार्यवाहीही सुरू आहे. दोन्ही गावच्या ग्रामस्थांचे अभिनंदन करण्यासाठी, त्यांना वंदन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सामाजिक समरसता गतिविधीचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य रमेश पांडव, रा. स्व. संघ महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य तसेच महाराष्ट्र गोवा सामाजिक समरसता गतिविधी समन्वयक निलेश गद्रे, परभणी शहर संघचालक डॉ. रामेश्वर नाईक यांच्यासह अनेक समरसतेचे कार्यकर्ते तिथे उपस्थित होते. हे सगळे ‘याची देही याची डोळा’ पाहिले आणि अनुभवले. तो समरसतेचा अनुभव इथे शब्दबद्ध करण्याचा केलेला हा प्रयत्न...
 
 
दि. 28 ऑक्टोबर... परभणी शहराच्या कळगाववाडी गावातील सगळे गावकरी दिवाळीनंतरही अगदी सजले धजले होते. गावातल्या तथाकथित उच्चभू्र समाजाने ज्यांना आजपर्यंत मंदिर प्रवेश नव्हता, अशा समाजबांधवांना हातालाधरले. अगदी वाजत गाजत सर्व समाजाने गावातील रूद्र हनुमानाच्या ग्राममंदिरामध्ये प्रवेश केला. तो क्षण गावासाठी ऐतिहासिक होता. शेकडो वर्षांची रूढीप्रथा आज स्नेहबंधाने सहज तुटली होती. जोरजबरदस्ती, कुभांड किंवा समाजविघातक दृष्टिकोन कृती न करताही सर्व समाजाने स्वेच्छेने आणि आंतरिक प्रेरणेने ही कृती केली होती. गावातल्या सर्वमान्य ग्रामदेवतेच्या रूद्र हनुमानाच्या मंदिरात प्रवेश करताक्षणीच सर्व समाजबांधवांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. कारण, एका मोठ्या ऐतिहासिक घटनेचे ते साक्षीदार, सहभागी होते. आजपर्यंत गावात परस्परावलंबन, परस्परस्नेह आणि परस्परसहभागिता हे सगळे होते. मात्र, जिथे गावच्या ग्रामदेवतेचा प्रश्न आला, तिथे गावात नाही म्हंटले तरी नाईलाजाने दोन गट पडत. एका गटाला मंदिर प्रवेश होता आणि एक गट विशिष्ट समाजात जन्मला म्हणून त्याला मंदिर प्रवेश नव्हता.
 
 
मात्र, आज सर्वानुमतीने आणि प्रेमाने गावातल्या सर्व समाजातील बांधवांनी मंदिरात प्रवेश केला. एकमेकांना गोडधोड अन्न भरवले. ही घटना कधीची आहे? संविधानाने तर भारतीयांना जातीपाती निर्मूलनासाठीचे अतिशय महत्त्वाचे हक्क आणि मार्गदर्शक तत्व दिले आहेत. मग कालपर्यंत समाजाच्या एका गटाला मंदिरप्रवेश नव्हता, हे कसे शक्य आहे, तर मान्य आहे संविधानाने समान हक्काची शाश्वती दिली. पण, त्यासाठी कठोर महत्त्वाचे आवश्यक कायदेही केले आहेत. मात्र,त दुदैवाने आजही म्हणावे लागते की, कायद्याचे पालन करणे, न करणे ही सर्वस्वी कायदेशीर प्रक्रिया आहे, जोपर्यंत माणसाच्या अंतरंगातून आणि समाजाच्या अंत:प्रवाहातून हे कायदे समरस होत नाहीत, तोपर्यंत कायदा हा शासन होऊ नये किंवा व्हावे, यासाठीच्या तरतुदींपुरताच मर्यादित राहिलेला दिसतोे. त्यामुळेच जातीविषमता प्रथेचे समूळ उच्चाटन झाले, असे म्हणणे धाडसाचे आहे. रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवतही म्हणाले हेाते की, ”एक गाव, एक पाणवठा, एक मंदिर आणि एक स्मशानभूमी असणे महत्त्वाचे आहे.” ते असे म्हणाले कारण, जातीयतेचा विखार आज निवळला असला तरीसुद्धा काही प्रमाणात तो थोड्याफार प्रमाणात दिसतो. असो. तर आजही काही गावांतील मंदिरांमध्ये जातीवरून प्रवेश दिला जातो. काल परवापर्यंत परभणीमधल्या कळगाववाडीमध्येही ही प्रथा होतीच.
 
 
कळगाववाडी हे गाव तसे छोटेच. चारही बाजूने शेतीभातीने वेढलेले. गावात सर्व समाज गुण्यागोविंदाने राहतात. गावाचे ग्रामदेवत रूद्र हुनमान. सोबत हनुमानाचे रूप रोकडोबा हनुमान. रूद्र हनुमान, पवनपुत्र हनुमानाचे रौद्र स्वरूप. हे रौद्र रूप सर्व अमंगल आणि अभद्राचा नाश करते. रूद्र हनुमान ग्राममंदिरामध्ये विशिष्ट समाजच प्रवेश करू शकत होता. अर्थात, तशी काही नियमावली नव्हती. मात्र, जेव्हापासून गाव वसले म्हणजे साधारण 250 ते 300 वर्षांपूर्वी तेव्हा सर्वप्रथम या मंदिराची स्थापना झाली. त्यावेळच्या वहिवाटीनुसार किंवा प्रचलित प्रथेनुसार मंदिरात विशिष्ट समाजाचेच लोक जायचे. बाकी समाजबांधव मंदिराच्या शेवटच्या पायरीखाली उभे राहून मारूतीरायाचे दर्शन घ्यायचे. इतर मागासवर्गीय आणि मागासवर्गीय समाजाचे बाहुल्य असणार्‍या या गावात शेकडो वर्षांपूर्वीची विशिष्ट समाजाला मंदिर प्रवेश प्रथा लोक कालपरवापर्यंत पाळायचे. त्यात कुणावरही सक्ती किंवा अमानुषपणे अत्याचारीत बंदी नव्हती. बरे, मंदिराच्या आत जाण्यास समाजबांधवाला कोणी अडवलेले नसे, पण ते स्वतःहूनच मंदिरात जात नसत. असेही नाही की त्यांची दैवतावर, धर्मावर श्रद्धा नाही. श्रद्धा, भक्ती सारे काही होते. मात्र, शतकानुशतकांची परंपरा जी आपल्या वाडवडिलांनी पाळली, ती आपण कशी तोडायची? या विचाराने या गावातले हे समाजबांधव स्वतःहूनच मंदिरात जात नसत. यात काही विषमता आहे, वाईट आहे, असे त्यांनाही वाटतही नसे.
 
 
मात्र, गावात एकी होती. ग्रामदेवतेचा भंडारा असला की सगळा गाव एक होऊन तयारी करे. सगळे समाजबांधव मिळून पालखी काढत आणि मंदिरात वाजतगाजत ती पालखी येई. मंदिराच्या शेवटच्या पायरीपर्यंत सगळेच एक असत. मात्र, मंदिराच्या शेवटच्या पायरीनंतर काही बांधव तिथेच उभे राहत, तर बाकीचे मंदिरात प्रवेश करत. तसेच, भंडारा असला की विशिष्ट समाज मंदिरात पंगतीला बसे, तर बाकीचे मंदिराबाहरेच्या पटांगणात. अशावेळी पाऊस आला की मंदिराबाहेर पंटागणात पंगतीला बसणार्‍या त्या बांधवांची त्रेधातिरपीट उडे. चिखल, माती, पाऊस आणि हातात भंडार्‍याचा प्रसाद. हे दृश्य वाईट असे. अशावेळी मंदिरात पंगतीला बसलेल्या लोकांना वाटे की, या बाहेरच्या बांधवांना मंदिरात बोलवावे, पण तेही या विचारात की शेकडो वर्षे पूर्वजांनी जपलेली परंपरा कशी काय तोडायची? बरं या मंडळींना ‘मंदिरात या’ म्हंटले तर तेही येणार नाहीत. कारण, त्यांच्यावरही असाच अलिखित प्रथेचा पगडा. जगात कुठेही खुट्ट जरी झाले तरी त्याची साग्रसंगीत माहिती जगाच्या कानाकोपर्‍यात सहज पसरते. कळगाववाडी गाव तरी याला अपवाद कसा राहील? जातींचा आधार घेत समाज फोडणे-तोडणे असे काम काही लोक करतात अशा विघ्नसंतोषी लोकांमुळे समाजाचे नुकसान होते. गावातल्या तरुणांना समजत होते. ”तू अमक्या जातीचा म्हणून तुला असे वागवले जाते. त्यांनी तुझ्या पूर्वजांवर अत्याचार केले. आता तुला पण असेच करतात. या सगळ्यांच्या विरोधात हल्ला कर.
 
 
समाज आणि हा देश जर तुझा असता, तर मग त्यांना आणि तुला समान हक्क असते,” असे म्हणत गावातल्या तरुणांना भडकावण्यासाठी समाजविघातक शक्ती असुरी प्रयत्न करतानाही गावातल्या तरुणांनी पाहिले होतेच. गावात तर स्पृश्य-अस्पृश्यता भेदभाव कुणीच पाळत नाही. केवळ मंदिरप्रवेशामुळे तरी गावात जातीभेद का राहावा? स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये हा विचार करून गावातले मान्यवर एकत्र आले. गावचे पाटील अप्पाराव सकनूर, गावचे पुजारी चांगदेव जोरवर, उपसरपंच प्रकाश भंडे, पांडुरंग सकनुर, रामेश्वर सकनुर, उद्धव भंडे, तुकाराम देवकते, कैलास खंडेकर, साहेबराव सकनुर, लिंबाजी कुकडे, बाळू वाकोडे, अतुल हुसनर असे गावातले ज्येष्ठ ग्रामस्थ एकत्र आले. त्यात ‘जातीभेद अभद्र अमंगळ’ या सूत्रावर काम करणार्‍या ‘विवेक विचार मंचा’चे कार्यकते ऋषिकेश सकनूर ही होते. त्यांनी गावासमोर प्रस्ताव मांडला की, गावातल्या सर्व समाजबांधवांसाठी मंदिर प्रवेश खुला असावा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरचे विठोबा मंदिर ते अगदी तिरूपती बालाजीपासून सगळीच मंदिरे सर्वांसाठी खुली आहेत. मग आपल्या मूळ गावच्या ग्रामदेवतेच्या मंदिरातच काही बांधवांना प्रवेश नसणे, हे योग्य नाही, हा मुद्दा पुढे आला. गावातूनसर्व समाजाचे बांधव पंढरपूरची वारी करतात. मग आपल्याच गावातल्या मंदिरात त्यांना प्रवेश का नाही? आपण त्यांना आपल्यापासून दूर करतो आहोत का? असे असेल तर मग या बांधवांना दुसर्‍या कुणी भडकवले आणि त्यांचे मतपरिवर्तन, धर्मपरिवर्तन झाले, तर याचे दोषी कोण? अशी चर्चा गावकर्‍यांनी केली. त्यात सर्व समाजाचे प्रतिनिधी एकत्र होते. या सगळ्या चर्चा संवाद आणि विचारमंथनानंतर मग ठरवले गेले की, गावातले ग्रामदैवत रूद्र हनुमानाच्या मंदिरामध्ये सर्वांना प्रवेश असावा.
 
 
गावकर्‍यांच्या या अतिशय समरस आणि कल्याणकारी निर्णयाचे अभिनंदन करण्यासाठी रा. स्व. संघाचे स्वयंसेवक या गावी आले होते. सामाजिक समरसता गतिविधीचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य रमेश पांडव, रा. स्व. संघ महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य निलेश गद्रे, परभणी शहर संघचालक डॉ. रामेश्वर नाईक आणि त्यांच्यासोबत काही स्वयंसेवक. असे सर्वजण कळगाववाडी येथे पोहोचले. ग्रामस्थांनी त्यांचे सहर्ष स्वागत केले. यावेळी आपल्या खरपूस हजरजबाबी शैलीत आणि खास मराठवाड्यातल्या लयीत रमेश पांडव यांनी गावकर्‍यांचे अभिनंदनही केले. “मंदिरात अमुक एक जातीचा देवदर्शन करण्यास गेल्यावर रूद्र मारूती त्याला आशीर्वाद देतो आणि तमुक जातीचा गेल्यावर मारूती राया त्याला हाकलवून देतो असे कधी घडले का? पाहिले का? देवाच्या दारी सगळे एक! तो देव भेदभाव मानत नाही तर मग तुम्ही आम्ही का मानावा? कलाकौशल्यानुसार कुणीही कोणताही व्यवसाय करण्यास स्वतंत्र आहे. व्यवसाय ओळख त्याला जातीचे बंधन का चिकटवायचे? संतांनी महापुरूषांनी जातीभेदाला नाकारले. आज या गावाने जातीप्रथेचे अस्तित्व दाखवणार्‍या रूढीला स्वेच्छेने परस्पर स्नेहाने मुठमाती दिली. ही ऐतिहासिक घटना आहे. तुमच्या या निर्णयापुढे आम्ही सगळे नतमस्तक आहोत. आडवळणाच्या दुर्गम भागातल्या या गावात मानवतेचा साक्षात्कार करणारी इतका समरस निर्णय झाला हे खरेच महत्त्वाचे आहे,” असे मत रमेश पांडव यांनी मांडले.
 
 
 
 
स्मशानभूमी
 
 
 
 
यावेळी निलेश गद्रे आणि डॉ. रामेश्वर नाईक यांनीही मनोगत व्यक्त केले. या सगळ्या सोहळ्याला उपस्थित असल्याने यावेळी उपस्थित समाजबांधवांच्या भावना अगदी जवळून पाहिल्या. मंदिर प्रवेश करू शकतो यामुळे आनंदित होऊन रडणारे लोकही मी इथे पाहिले. “आज मंदिरात रूद्र हनुमानाला पूजले. माझे पूर्वज धन्य झाले. कारण, ते लांबून या देवाला नवस बोलायचे, पण त्यांना कधीही मंदिरात येता आले नाही. आज त्यांचा वारसदार मी आहे. शेकडो वर्षांनंतर नाही, न जाणे किती वर्षांनंतर गावातल्या देवळात उभा आहे. हे आमच्यासाठी किती आनंददायी आहे, हे तुम्ही समजू शकणार नाही,” असे म्हणत आभाळभर आनंद चेहर्‍यावर आणि डोळ्यात ओसंडून वाहणारे हे समाजबांधव. यांना भेटून मला काही लोक आठवले. जे कायम ‘संविधान बचाव’ म्हणत राजकारण करत असतात. भारत देशात दोन समाज कधीही एकत्र नांदू शकत नाहीत, असे म्हणत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देवळात प्रवेशासाठी लढा दिला. पण, ‘आता आम्हाला देवळात प्रवेश आहे तरी आम्ही देवळात जाणार नाही, आम्ही देव सोडले, आम्ही वेगळे आहोत’ असे म्हणत कायम रडगाणं गाणारी आणि समाजाला, देशाला दुषणे देणारी ही गँग! चारच टाळकी असतील, पण डोक्यात कायमच दुहीचा राक्षस माजलेला. तर अशा या लोकांनी या कळगाववाडीतील समाजबांधवांना जरूर भेटायला हवे. मनात विचार सुरू होते. इतक्यात रमेश पांडव यांचे खड्या मात्र गोड आवाजातले भजन एकू आले-
 
 
खेळ मांडियेला वाळवंटी घाई,
नाचती वैष्णवी भाई रे
वर्णाभिमानी विसरली याती,
एकाएका लोटांगणा जाती
निर्मळ चित्ते झाली नवनिते,
पाषाण पाझर फुटतो रे
तुका म्हणे केली सोपी पायवाट,
उतरावया भवसागर रे...
 
 
रमेश पांडव यांचे अभंग गायन सुरू होते. समोर पाहिले तर लहान-थोर सगळेच ‘विठ्ठल विठ्ठल’चा गजर करत तल्लीन झाले होते. कोण पाटील, कोण अधिकारी, कोण या जातीचा, कोण त्या जातीचा... खरेच सगळे भेद त्याक्षणी मिटले होते. मी ग्रामदेवता रूद्र हनुमानाला वंदन केले आणि त्याबरोबरच भक्तिभावाने समरस समाजाचा बंध मानणार्‍या या ग्रामस्थांनाही वंदन केले!
 
साबा गाव : एक गाव, एक स्मशानभूमी
 
 
परभणीमधील साबा गावाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘एक गाव, एक स्मशानभूमी’चा निर्णय घेतला. गावात स्वतंत्र अशी स्मशानभूमी नव्हतीच. ज्यांची शेतजमीन किंवा रान आहे, अशी लोक शेतात-रानात मृत नातेवाईकांचे अंत्यसंस्कार करायचे. ज्यांच्याकडे जमीनच नाही, ते नदीकिनारी मृत नातेवाईकांचे अंत्यसंस्कार करत. त्यातही प्रत्येक जात समाज एकमेकांपासून थोडे अंतर राखूनच अंत्यसंस्कार करत. पावसाळ्यात या सगळ्यांचे खूप हाल व्हायचे. नदीकिनारी अंत्यसंस्कार केले आणि पाऊस पडला तर दुसर्‍या दिवशी विधी करण्यासाठी मृत नातेवाईकांच्या अस्थीही मिळत नसत. कारण, तिथे पाणी भरलेले असे. यासाठी साबा ग्रामस्थांनी गावात स्मशानभूमीसाठी एक जागा घेतली. तिथेच सर्व समाजाचे बांधव जातीभेद न पाळता आपल्या मृत नातेवाईकांचे अंत्यसंस्कार करत आहेत. जातीपातीच्या विषमतेमुळे मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी दहनभूमी नाकारले गेलेल्या घटना आजही घडत असतात. अगदी ख्रिश्चन पंथ स्वीकारलेल्या लोकांनाही ख्रिस्ती दफनभूमी नाकारल्या गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्या पाश्वर्र्भूमीवर सांबा गावचे अभिनंदन करावे तितके थोडेच! ‘एक गाव, एक स्मशानभूमी’साठी समरसता सामाजिक कार्यकर्ता रावसाहेब धरणे यांनी पुढाकार घेतला. गावच्या सरपंच राजामती,उपसरपंच प्रकाश चांदणे, बबनराव धरणे, तसेच ग्रामवासीयांनी त्यासाठी मान्यता दिली. साबा गावच्या या निर्णयासाठी या सगळ्यासोबतच सामाजिक समरसतेचे स्थानिक पदाधिकारी डॉ. विजय हातांगळे, अनंत जोगदंड हेसुद्धा सहभागी होते.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.