‘केएफसी’चा जर्मनीला माफीनामा

    11-Nov-2022   
Total Views |
 
जर्मनी
 
 
 
 
"क्रिस्टलनाचटचा स्मरणोत्सव-अधिक नरम पनीर आणि कुरकुरीत चिकनसोबत साजरा करा आता ‘केएफसी’सेाबत.” ‘केएफसी’ (पुर्वाश्रमीचे केंचुई फ्राईड चिकन)ने दि. 9 नोव्हेंबर रोजी जर्मनीमध्ये नागरिकांना समाजमाध्यमांवर सूचनावजा जाहिरात पाठवली. त्यानंतर जर्मनीमधील हजारो लोकांनी तत्काळ यावर आक्षेप घेतला. जर्मनी तर सोडाच, पण जगभरातील मानवातावादी आणि संवेदनशील लोकांच्या मनाला यामुळे प्रचंड वेदना झाल्या आणि संतापही आला. कारण, या जाहिरातीमध्ये ‘क्रिस्टलनाचटचा स्मरणोत्सव’ असे जे म्हटले आहे, ते भयंकर आहे.
 
 
क्रिस्टलानचट, 9 नोव्हेंबर म्हणजे जर्मनीमधील नाझींनी ज्यू लोकांवर केलेल्या भयंकर अत्याचाराचे ते क्रूर प्रतीक. दि. 9 नोव्हेंबर, 1938 रोजी प्रचंड मोठ्या प्रमाणात नाझींनी ज्यूंचा नरसंहार करण्यास सुरुवात केली. 100 पेक्षा जास्त ज्यूंची कत्तल झाली. ज्यूंची सात हजार दुकाने आणि कार्यालये जाळली गेली, तोडली गेली. ज्यूंची 100च्यावर असलेली प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त गेली. सगळ्यात भयंकर म्हणजे तीन लाख निष्पाप ज्यूंना नाझींच्या छळछावणीत जबदरदस्तीने मरण्यासाठी कोंडले गेले. हे सगळे मानवतेला काळीमा फासणारे होते. सगळे जग या क्रूर कृत्याचा मनापासून निषेध करते. जर्मनीतील बहुसंख्य लोकसुद्धा या काळ्या इतिहासाबद्दल मनापासून खेद व्यक्त करतात.
 
 
पण, आजही काही लोक जर्मनीमध्ये आहेत, ज्यांना नाझी, हिटलरबद्दल प्रेम वाटते. आजही जर्मनीमध्ये चोरून लपून काही लोक नाझीवाद जपतात आणि ज्यूंच्या प्रार्थनास्थळांवर अधूनमधून हल्लेही जर्मनीत होतात. मात्र, हे सगळे करणारे लोक उजळ माथ्याने वावरत नाहीत. कारण, आज जग एक झाले आहे आणि वशंश्रेष्ठत्व किंवा वर्णभेद यासगळ्या थोतांडाला जगाने नाकारले आहे. कोणताही देश शक्यतो स्वतःला मानवतावादी दाखवण्याचा प्रयत्न करतो, तर जर्मनीही याला अपवाद नाही. त्यामुळे जर्मनी कधीही नाझी किंवा ज्यूंच्या छळछावण्यांचा उदोउदो उघडपणे करत नाही. मात्र, याच जर्मनीमध्ये दि. 9 नोव्हेंबर रोजी ‘केएफसी’ने जर्मन नागरिकांना नाझी क्रूरतेच्या मानवतेला काळीमा फासणार्‍या घटनेचा आनंदोत्सव साजरा करायला सांगणे हे लज्जास्पद आहे.
 
 
मान्य आहे की, आपल्या उत्पादनांचा खप वाढविण्यासाठी प्रत्येक कंपनी काही ना काही क्लृप्ती करत असते. ग्राहकांच्या भावनांना हात घालत त्या भावनांशी खेळत त्या ग्राहकाला आपले उत्पादन घेण्यास भरीस पाडणे, हा तर सगळ्याच छोट्या- मोठ्या कंपन्यांची एक मोठी कसरतच आहे. मात्र, आपल्या उत्पादनाची तडाखेबंद विक्री व्हावी यासाठी नीतीमत्ता, ताळतंत्र याचीही आवश्यकता असते की नसते? निष्पाप लोकांच्या मृत्यूचा आणि त्यांच्या यातनांचाही स्मरणोत्सव ठरवणार्‍या ‘केएफसी’च्या जाहिरातीला हजारो जर्मन नागरिकांनी विरोध केला. ‘आम्हाला निष्पाप ज्यूंच्या क्रूर मृत्यूचा उत्सव साजरा करायचा नाही’ असे म्हणत जर्मन नागरिकांनी ‘केएफसी’ला माफी मागायला लावले. ‘केएफसी’नेे बहुसंख्य लोकांचा कल पाहून माफीही मागितली.
 
 
यंत्रणा खराब झालेली. आम्हाला असे काही म्हणायचे नव्हते वगैरे वगैरे मखलाशी ‘केएफसी’ने केली. तरीही प्रश्न उठतोच की ‘केएफसी’ला का वाटले की, जर्मनीमध्ये नाझींच्या हिंसाकृत्याचा उदोउदो केला, तर आपल्या उत्पादनाचा खप वाढेल? कारण, जर्मनीमध्ये लपूनछपून का होईना नाझीवादाने पुन्हा डोके वर काढले आहे. अशावेळी ‘केएफसी’ने नाझी हिंसेच्या भयाण कृत्याचे समर्थन करणारी जाहिरात करणे हे केवळ विक्रीसाठीचे प्रयोजन हे स्वरूप असू शकते का? आपल्या देशातही काही जाहिरातींवरून वादळ उठले. या जाहिराती आपल्या देशाच्या धर्मसंस्कृती आणि नीतिमत्तेवरचा घालाच होत्या. या जाहिरातीमागचे तर्क काय असतील? काही लोकांच्या मते असे होते कारण काही लोक असेही आहेत की, जे त्यांचे जगाने नाकारलेले विचार जगावर बिंबवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी जगप्रसिद्ध कंपन्यांमध्ये- संस्थांमध्ये येनकेन प्रकारे प्रवेश मिळवतात. प्रवेश मिळवून त्या कंपन्यांच्या नावाखाली स्वतःचे विचार कोणत्याही माध्यमातून जगासमोर मांडतात. सगळ्याच विवादित जाहिरातींमागचे हेच सत्य असेल का?
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.