‘अनंत’ त्याची ध्येयासक्ती...!

    11-Nov-2022   
Total Views |
 
अनंत चौगुले
 
 
 
कलेची आवड आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर या दोन गोष्टींची सांगड घालून कोणतीही पदवी न घेता त्याने आपली कला महाराष्ट्रभर पोहोचवली. जाणून घेऊया सावंतवाडीच्या अनंत चौगुले याच्याविषयी...
 
 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील माजगावी जन्मलेल्या अनंत गणपत चौगुलेची घरची परिस्थिती तशी बेताचीच. आई घरकाम, तर वडील रिक्षा चालवून घर चालवत. आजोबांप्रमाणेच अनंतच्या वडिलांनाही मूर्तिकलेची आवड होती. वडील गणेशमूर्ती घडवताना अनंत निरिक्षण करायचा. हळूहळू तोदेखील वडिलांना मदत करू लागला. माजगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेत असताना त्याला चित्रकलेची आवड निर्माण झाली. घरातून कलेचे बाळकडू मिळाल्याने अनंतचा कलही चित्रकला आणि मूर्ती घडविण्याकडेच होता. शाळेतही तो पहिला नंबर मिळवायचा. पाचवीत असताना कलाशिक्षक प्रकाश केसरकर यांनी त्याला चित्रकला स्पर्धेत भाग घेण्यास सांगितले. त्यावेळी भले बक्षीस मिळाले नाही. परंतु, त्याची जिद्द पाहून केसरकरांनी त्याला मार्गदर्शन करत पुढे चित्रकलेत करिअर करण्याचा सल्ला दिला. सातवीत असताना त्याने बनवलेल्या संत जनाबाईंच्या मूर्तीचे त्याला 700 रूपये मिळाले. त्यामुळे त्याचा उत्साह आणखी वाढला. मळगाव इंग्लिश स्कूलमधून 2016 साली 91 टक्के गुण मिळवून तो दहावी उत्तीर्ण झाला. गणेशोत्सवाच्या दोन-तीन महिन्यांआधी तो वडिलांना गणेशमूर्ती घडविताना मदत करायचा.
 
 
अनेकदा चित्र काढण्यासाठी पेपर, पेन्सिल, रंग आणण्यासाठी पैसे मागितल्यावर त्याला घरच्यांकडून मिळायचे नाही. तेव्हा अक्षरशः रडून रडून अनंत वडिलांकडून पैसे मिळवायचा. साच्यातून मूर्ती काढणे, रंगकाम करणे या गोष्टीत तो प्रवीण झाला होता. पुढे कला शाखेत प्रवेश घेल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षांचा विचार केला, परंतु नंतर तोदेखील बारगळला. बारावीनंतर ‘जे.जे स्कूल ऑफ आर्ट’साठी प्रवेश घेण्याचे स्वप्नही अधुरे राहिले. एक वर्ष घरी थांबण्यापेक्षा त्याने संदीप नाईक या मित्राच्या सल्ल्यानुसार ‘व्हिडिओ एडिटिंग’चा कोर्स करण्यासाठी जून 2018 साली मुंबई गाठली. चित्रकला, मूर्तिकला सर्व काही मागे पडले आणि त्यातच कोर्स पूर्ण होण्यासाठी दोन महिने शिल्लक असताना कोरोनामुळे त्याला घरी परतावे लागले. कोरोना काळात घरात बसण्यापेक्षा त्याने एप्रिल 2019 साली स्वतःचे युट्यूब चॅनेल सुरू केले. मुंबईत ‘व्हिडिओ एडिटिंग’चे ज्ञान मिळवल्याने त्याला ही गोष्ट तशी सोपी होती. परंतु, गावी इंटरनेटचा पत्ता नव्हता. मूर्ती घडवितानाचे व्हिडिओ शूट केल्यानंतर ते ‘अपलोड’ करण्यासाठी ‘नेटवर्क’ नव्हते. तेव्हा सगळीकडे फिरून झाल्यानंतर बाजूच्याच झाडाखाली रात्री ’नेटवर्क’ येत असल्याचे त्याच्या लक्षात आले.
 
 
तेव्हापासून तो पहाटे 3-4 वाजता घराशेजारील झाडाखाली जाऊन व्हिडिओ ‘अपलोड’ करायचा. व्हिडिओ ‘व्हायरल’ झाल्यांतर प्रसिद्धी वाढली आणि अनंतला श्री स्वामी समर्थ, छत्रपती शिवाजी महाराज, विठ्ठल-रखुमाई अशा अनेक महापुरूष, देवदेवतांच्या मूर्तींची मागणी येऊ लागली. सोशल मीडियाचे महत्त्व समजल्याने अनंत मूर्ती घडविण्याचे व्हिडिओ अपलोड करत होता. त्यामुळे त्याला आधी महिन्याकाठी एक मूर्तीची ऑर्डर यायची, जी सध्याच्या घडीला महिन्याला 30 हून अधिक मूर्तींवर गेली आहे. नागपूरहून शिवाजी महाराजांची 12 फूट उंचीची मूर्ती बनवण्याचे आव्हानही त्याने यशस्वीरित्या पेलले. चित्रकलेचे व्हिडिओदेखील तो पोस्ट करू लागला. एकदा पुण्याहून विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची ऑर्डर आल्यानंतर त्याने पंढरपूरच्या विठ्ठलमूर्तीचा सखोल अभ्यास वाचन करून मूर्ती बनवली.
 
 
घराच्या बाजूला त्याने आपला छोटासा स्टुडिओ तयार केला असून तिथे सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत तो मूर्ती घडविण्यात व्यस्त असतो. सध्या त्याच्यामुळे दोन जणांना रोजगाराची संधी मिळाली आहे. देवदेवतांच्या मूर्ती घडविण्याकडे त्याचा जास्त कल असतो. चित्रकला, शिल्पकला, मूर्तिकला, व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी अशा अनेक गोष्टी तो समर्थपणे हाताळतो. सध्या त्याच्या युट्यूब चॅनेलचे 1 लाख, 84 हजारांहून अधिक ‘सबस्क्राईबर्स’ आहेत.
 
 
आपल्या मूर्तिकलेच्या व्यवसायाला व्यापक स्वरूप देण्याचा त्याचा भविष्यात प्रयत्न असून पुढे देशभरात मूर्ती कशी पोहोचवता येईल, यासाठी तो प्रयत्नरत आहे. मातीच्या मूर्ती घरपोच पाठवता येत नाही. त्यामुळे मातीची मूर्ती तुटणार नाही, यासाठीदेखील तो वेगवेगळे प्रयोग करत आहे. ‘तू गावात काय करतोय, मुंबईला जा तिकडे नोकरी कर,’ असे सल्ले त्याला मिळायचे खरे. परंतु, त्याने त्याकडे वेळीच दुर्लक्ष केले.
 
 
“जिद्द, तुमचे काम सर्वात महत्त्वाचे. त्यामुळे तुमच्याकडे पदवी असो वा नसो. नवीन कलाकारांनी सोशल मीडियाचे महत्त्व ओळखून त्याचा फायदा करून घ्यावा,” असे तो सांगतो. बहीण नयना, आई गीता, काका तुळशीदास चौगुले यांचेही त्याला मोलाचे सहकार्य लाभते. आधी वडिलांना मूर्तिकामात मदत करणार्‍या अनंतला आता त्याचे वडील मदत करतात. अनंतने कलेची आवड आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर या दोन गोष्टींची सांगड घालून कोणतीही पदवी न घेता आपली कला महाराष्ट्रभर पोहोचवली. दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे त्याच्या आगामी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा...
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.