मुंबई : मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत येणारी रुग्णालये म्हणजे त्यांमध्ये कोणत्याही पद्धतीची स्वच्छता नसणार, योग्य त्या सेवा पुरवल्या जात नसणार, अशी नागरिकांची समज आहे. मात्र याची अक्षरशः प्रचितीच नायर मधील एका रुग्णास आली आहे. मुंबईतील नायर रुग्णालय म्हणजे एक प्रतिष्ठित नाव. सर्व प्रकारचे उपचार येथे करण्यात येतात. याच रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच गांवदेवी येथे स्थायिक असणारे ८४ वर्षीय सुभाष दिघे यांच्यावर मधुमेहासंबंधी उपचार सुरु होते.
मात्र वॉर्डमध्ये कुत्रे, मांजरी फिरत असल्यामुळे या जनावरांच्या सानिध्यात रुग्णांवर उपचार करण्याचे नायर रुग्णालयाने ठरविले आहे का? असा प्रश्न दिघे यांनी उपस्थित केला. यासंदर्भात सुभाष दिघे यांच्यासोबत "दै. मुंबई तरुण भारत"च्या चमूने संवाद साधला असता नायरमध्ये मी उपचार घेत होतो. मात्र मी ज्या वार्ड मध्ये होतो तेथे कुत्रा मांजरांचा वावर मोठ्या प्रमाणावर होता. यासंबंधी मी तेथील कर्मचाऱ्यांकडे देखील अनेकदा तक्रारी केल्या मात्र कोणत्याही प्रकारची पावले मुंबई महापालिकेकडून उचलण्यात आली नाहीत," असे दिघे यांनी म्हटले.
तसेच "नायरमधील हॉस्पिटल इमारत येथील तिसऱ्या मजल्यावर ९ नंबर वॉर्डमध्ये माझ्या सोबत अनेक रुग्णांवर उपचार सुरु होते. या वॉर्डमध्ये मुख्यत्वे मधुमेहाचे रुग्ण अधिक आहेत. मधुमेहामुळे माझे स्वतःचेही दोन्ही पाय कापावे लागले. असेच अनेक रुग्ण त्या वॉर्डमध्ये आहेत. परंतु कुत्रे मांजरी जर या वॉर्डमध्ये अशीच फिरत राहणार असतील तर येथील रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होतो," असेही दिघे यांनी स्पष्ट केले आहे.
त्याचप्रमाणे जर रुग्णांचे नातेवाईक वॉर्डमध्ये असतील तर त्यांना कर्मचारी बाहेर जाण्यास सांगत आणि या प्राण्यांबद्दल विचारणा केली असता ते आमचे नातेवाईक आहेत असे उत्तर येथील कर्मचाऱ्यांकडून देण्यात आल्याचेही दिघे यांनी स्पष्ट केले आहे.तसेच यासंदर्भात कोणासही माझ्याशी संपर्क साधायचा असल्यास माझ्या ९९६९०८७७०३ या क्रमांकावर संपर्क देखील साधावा असेही दिघे यांनी म्हटले आहे.
- शेफाली ढवण