टाकाऊतून टिकाऊ... स्वप्निल जोशी यांचा टिकाऊ ब्रॅण्ड

    10-Nov-2022   
Total Views |

स्वप्निल जोशी
 
 
 
 
आपण सर्वच जण ‘ग्लोबल वॉर्मिंग’बद्दल, वातावरणातील घातक बदलांबद्दल नेहमीच बोलत, ऐकत, वाचत असतो आणि त्यावर कायमच जनजागृतीसाठी व्यापक पातळीवर प्रयत्नही सुरू असतात. तसेच आपल्याला हे ‘ग्लोबल वार्मिंग’ करणारे घटक कोणकोणते याबद्दलही माहिती असते. उदा. वाहनांचा धूर, कोळसा, लाकूड यांच्यासारख्य ज्वलनशील पदार्थांमधून येणार धूर, रासायनिक प्रदूषण, जलप्रदूषण यांसारख्या गोष्टी आपल्याला नवीन नाहीत. पण, याच प्रदूषकांच्या यादीत कपड्यांचा समावेश आहे, असे सांगितले, तर बर्‍याच जणांचा विश्वास बसणार नाही. पण, ते खरे आहे. कपडेही प्रदूषण करतात आणि त्या प्रदूषणाचीही झळ आपल्याला बसते. पण, याच कपड्यांचा पुनर्वापर करून त्यापासून नवीन वाटणारे चांगले कपडे तयार केले, तर आपल्याला ते नक्कीच आवडतील ना? आणि असाच एक उद्योग आपल्यासमोर आला, तर किती उत्तम! हीच संकल्पना स्वप्निल जोशी घेऊन आले आहेत, त्यांच्या ‘इको रेगेन’च्या माध्यमातून. त्याची सविस्तर माहिती आजच्या लेखात जाणून घेऊया...
 
 
आपण आपले जुने झालेले कपडे बरेचदा फेकून देतो किंवा दुसर्‍या कोणालातरी दान करुन टाकतो. यातून आपण फक्त कपडे एकाचे दुसर्‍याला देत असतो आणि त्यातून ते कपडे तसेच राहतात. कालांतराने जेव्हा ते कपडे कोणासाठीही वापरण्यायोग्य राहत नाहीत, तेव्हा ते फेकून दिले जातात. पण, साधारणतः फेकून दिलेले कपडे पूर्णपणे नष्ट होण्यासाठी तब्बल 40 ते 50 वर्षांचा कालावधी लागतो. त्यातून खूप कार्बन उत्सर्जनही होत असते. त्यामुळे हे जुने कपडेही प्रदूषणाचे कारक ठरतात. त्यामुळे हे प्रदूषण टाळायचे असेल, तर या कपड्यांचा पुनर्वापर करणे गरजेचे आहे. जर तो करता आला, तर त्यातून कार्बन उत्सर्जन, पाण्याचा पुनर्वापर, या सर्व गोष्टी साध्य होऊ शकतात. त्यामुळे हे कपड्यांचे ‘रिसायकलिंग’ खूप महत्त्वाचे आहे. एक किलो कपड्यातून 3.6 किलो ‘कार्बन उत्सर्जन’ कमी करता येते. तसेच जर एक किलो कपड्यांचा पुनर्वापर सहा हजार लीटर पाणी वाचवू शकतो. यामुळे जर आपल्या भारतात 137 कोटी जनता आहे आणि जर एका माणसाकडे दहा अशा दराने जर कपडे आपण गृहीत धरले, तर आपण फक्त कल्पनाच करू शकतो की, किती मोठ्या प्रमाणावर हा कचरा तयार होत असेल आणि याचा पुनर्वापर करणे किती गरजेचे आहे. यातून या प्रश्नांची गंभीरता आणि गरज आपल्याला लक्षात येईल आणि याच गरजेतून स्थापना झाली आहे ती ’इको रिगेन’ची!
 
 
जेव्हा कुठल्याही कापडाचे विघटन होते, तेव्हा ती प्रक्रिया साधारण 30 ते 40 वर्षे घेत. त्यानंतरही त्या विघटन झालेल्या कपड्यांमधून दोन प्रकारचे वायू बाहेर पडतात. पहिला म्हणजे कार्बनडाय ऑक्साईड आणि दुसरा म्हणजे मिथेन. हे दोन्ही वायू जागतिक तापमानवाढीसाठी कारणीभूत आहेत. त्यामुळे यातून जेव्हा आपण जुन्या कपड्यांपासून नवीन कपडे तयार करतो, तेव्हा आपण यांसारख्या प्रदूषणकारी वायूंचे उत्सर्जन कमी करत असतो. जेव्हा आपण आपले कपडे घेऊन ‘इको रिगेन’कडे येतो, तेव्हा त्या कपड्यांचे पहिल्या दोन गटांत विभाजन केले जाते. पहिले ज्या कपड्यांपासून नवीन कपडे तयार होऊ शकतात आणि दुसरा म्हणजे ज्या कपड्यांपासून पिशव्या, पर्स यांसारख्या वस्तू तयार केल्या जाऊ शकतात. मग ते कपडे दहा रुपये किलो दराने विकत घेतले जातात. त्यानंतर त्या कपड्यांना व्यवस्थित धुतले जाते. त्यानंतर जेव्हा ते कपडे स्वच्छ होतात, तेव्हा नक्की कशा पद्धतीने त्या कपड्यांचा उपयोग करायचा, हे ठरविले जाते. त्यानंतर जे नवीन कपडे तयार केले जाणार आहेत, ते कशापद्धतीने डिझाईन केले जाणार, त्यांच्यापासून कशा पद्धतीने ‘जीन्स’, तसेच इतर कपडे बनवले जाणार, हे सर्व निश्चित केले जाते. या सर्व कपड्यांवर किलो मागे दहा रुपये या दराने सवलत दिली जाते. यामुळे ग्राहकांना या अशा कपड्यांचे नुसते महत्त्वच पटणार नाही, तर त्यांना तसे कपडे घेणे आवडेलही, अशा पद्धतीने काम चालते. या प्रक्रियेतून तयार होणारे कपडे हे इतके आकर्षक आणि माफक दरात उपलब्ध असतात की, कुठल्याही ब्रॅण्डेड कपड्यांपेक्षा हे कपडे अजिबात कमी दर्जाचे दिसत नाहीत. अशा पद्धतीने ‘इको रिगेन’चे काम चालते.
 
 
यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे स्वप्निल यांनी या उद्योगाच्या माध्यमातून जपलेले सामाजिक भान. त्यांच्या या व्यवसायात त्यांनी जास्तीत जास्त गृहिणींना सामावून घेतले आहे. यामागचे कारण म्हणजे त्या महिलांकडे काहीवेळा कौशल्याचा अभाव असला तरी काही तरी करण्याची इच्छा आणि घरच्या कामांच्या वेळा सांभाळून चार पैसे कमविण्याची इच्छा नक्कीच असते. त्यामुळे अशा पद्धतीने या महिलांना हे कपडे धुण्याची, शिवण्याची कला जर शिकवली, तर त्या नक्कीच ती कला आत्मसात करु शकतात आणि त्या पद्धतीने कामदेखील करू शकतात. अशा प्रकारे त्या महिलांच्या हाताला कामसुद्धा मिळते आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभारसुद्धा लागतो. या महिलांना स्वतःच्या हक्काचे उत्पन्न मिळायला लागल्याने त्या स्वतंत्रपणे काहीतरी करू शकतात. त्यामार्फत त्या सक्षम बनून पुढे अजून काहीतरी चांगले काम करून दाखवू शकतील, असा विश्वास त्यांना मिळतो आणि ते सर्वात मोठे समाधान मिळते. अशा पद्धतीने ’इको रिगेन’च्या माध्यमातून अनेक महिलांना काम मिळाले आहे आणि असे छोटे-छोटे उद्योगच महिला सक्षमीकरणाचे काम अत्यंत उत्तम पद्धतीने करू शकतात, हेच यातून दिसते आहे.
 
 
 

joshi
 
 
 
 
या अशा पद्धतीने कपड्यांवर प्रक्रिया करून त्यांचा पुनर्वापर करणारा उद्योग येणे, ही काळाची गरज आहे. कारण, भारत हा 130 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येचा देश आहे. प्रत्येक माणसाकडे दहाच्या दराने जरी कपडे पकडले तरी केवढे कपडे होतील, याची कल्पनाच केलेली बरी! यातून हा केवढा मोठा प्रदूषणकारी कचरा तयार होतो आहे, हे आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे अशा पद्धतीने कपड्यांचा पुनर्वापर, कपड्यांचे ’रिसायकलिंग’ खूप गरजेचे आहे.
 
 
सध्या हा प्रकार खूप नवीन असून फारशी लोकप्रियता मिळालेली नाही. पण भविष्यात नक्कीच या गोष्टींना खूप लोकप्रियता मिळेल हे नक्की. सध्या ‘इको रिगेन’ मुंबई, पुणे यांसारख्या महाराष्ट्राच्या मोठ्या शहरांमध्येच मर्यादित आहे. पण, हळूहळू हा व्यवसाय वाढवण्याचा स्वप्निल यांचा प्रयत्न आहे. भविष्यात संपूर्ण भारत तसेच जगभरात हा व्यवसाय पोहोचवण्याचा त्यांचा विचार आहे. त्यामुळे या गोष्टींकडे नागरिकांनी सकारात्मक पद्धतीने बघणे गरजेचे आहे आणि भविष्यात ते नक्कीच साध्य होईल, असा स्वप्निल यांना विश्वास वाटतो.
 
 
‘टाकाऊतून टिकाऊ’ ही संकप्लना आपण ऐकली आहे. पण या संकल्पनेकडे फक्त एखादी समाजसेवा किंवा आवड म्हणून न बघता, त्यातून एक शाश्वत उद्योग उभा करण्याचे काम करणार्‍या स्वप्निल जोशी यांच्या ‘इको रिगेन’ला खूप खूप शुभेच्छा...!
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

हर्षद वैद्य

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये उपसंपादक (वेब आणि प्रिंट) म्हणून कार्यरत. रुईया महाविद्यालयातून गणित या विषयात पदवीचे शिक्षण घेतले. आर्थिक क्षेत्राशी संबंधित वृत्तांकन आणि लेखन. भारतीय संगीत, इतिहास या विषयांमध्ये विशेष रस. महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य. अर्थशास्त्र विषयात महाविद्यालयात संशोधन केले आहे. शैक्षणिक, सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्राचाही अनुभव.