वाढवलं तेच उलटतंय...!

    09-Oct-2022   
Total Views |
pakistan
 
 
 
आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानमध्ये अंतर्गत कलह शिगेला पोहोचला आहे. कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून पाकिस्तानातील सामान्य जनता तर दूरच राहिली, पण खुद्द पाकिस्तानचे मंत्रीच सुरक्षित राहिलेले नाहीत. पाकिस्तानचे अर्थमंत्री अब्दुल्ला बेग यांचे शुक्रवारी दुपारच्या सुमारास दहशतवाद्यांनी अपहरण केले आणि पाकिस्तानात एकच खळबळ उडाली. नंतर दहशतवाद्यांनी काही मागण्या समोर ठेवून त्यांची शनिवारी सकाळी सुटका केली. दहशतवाद्यांनी त्यांच्या सहयोगी दहशतवाद्यांना तुरुंगातून सोडण्याची मागणी केली. तसेच, ही मागणी पूर्ण करण्यासाठी दहशतवाद्यांनी दहा दिवसांची मुदत दिली आहे.
 
 
पाकिस्तानी माध्यमांनुसार, दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वाला गिलगिट-बाल्टिस्तानशी जोडणार्‍या मुख्य रस्त्याला वेढा घातला होता. यानंतर अर्थमंत्री अब्दुल्ला बेगसह दोन पर्यटकांचे अपहरण करण्यात आले. या सर्वांचे अपहरण ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ या प्रतिबंधित संघटनेने केल्याचा दावा केला जात आहे. पाकिस्तानचे अर्थमंत्री अब्दुल्ला बेग इतर दोघांसोबत इस्लामाबादहून गिलगिटला जात होते. यादरम्यान त्यांचे अपहरण करण्यात आले. साथीदारांच्या सुटकेची मागणी करणार्‍या दहशतवाद्यांनी नंगा पर्वत परिसरात परदेशी नागरिकांची हत्या केली होती. याशिवाय डायमेरमधील इतर दहशतवादी कारवायांमध्येदेखील हे दहशतवादी सामील आहेत. शुक्रवारी सोशल मीडियावर एक ‘ऑडिओ क्लिप’ही व्हायरल झाली होती. ‘ऑडिओ क्लिप’मध्ये अब्दुल्ला बेग इस्लामाबादहून गिलगिटला जात असताना त्यांचे अपहरण करण्यात आल्याचे कथितपणे ऐकू येते. त्यांच्या साथीदारांना तुरुंगातून सोडण्यासाठी अधिकार्‍यांवर दबाव आणण्यासाठी दहशतवाद्यांनी रस्ता अडवला होता.
 
 
पाकिस्तानातील आघाडीच्या वृत्तपत्रातील वृत्तानुसार, दहशतवाद्यांनी पाकिस्तानमध्ये इस्लामिक कायदा लागू करण्याची आणि महिलांना खेळापासून दूर ठेवण्याची मागणी केली आहे. याशिवाय त्यांच्या साथीदारांची सुटकादेखील करण्याची मागणी समोर ठेवली आहे. या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी दहशतवाद्यांनी दहा दिवसांचा अवधी दिला आहे. दरम्यान, ज्यावेळी पाकिस्तानचे अर्थमंत्री अब्दुल्ला बेग दहशतवाद्यांच्या ताब्यात होते, त्यावेळी गिलगिट-बाल्टिस्तान सरकारचे माजी प्रवक्ते फैजुल्ला यांनी अब्दुल्ला बेग यांच्याशी बोलणे झाले होते आणि त्यांच्या सुटकेसाठी चर्चा सुरू असल्याचे सांगितले होते. सदर घटनेची माहिती समोर आल्यानंतर शुक्रवारी पाकिस्तानच्या सिनेटर्सनी ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ या प्रतिबंधित संघटनेच्या दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाल्याबद्दल चर्चा केली. एवढेच नाही, तर अलीकडेच एका सिनेटरनेही दहशतवाद्यांच्या कारवायांची माहिती मागितली होती.
 
 
पाकिस्तानची हालत दिवसेंदिवस खराब होत चाललेली असताना दहशतवाद्यांनीदेखील उच्छाद मांडलेला आहे. इमरान खान यांना सत्तेवरून खाली खेचून शहूबाज शरीफ पंतप्रधान झाले खरे. परंतु, त्याने तसा काही फार मोठा फरक पडलेला नाही. पाकिस्तानात सध्या नागरिकांना दहशतीत जगावे लागत आहे. नुकतेच पाकिस्तानी गायक अब्दुल्ला कुरैशी याने इन्स्टाग्रामवर एक ‘पोस्ट’ करून संगीत विश्व सोडण्याचा निर्णय जाहीर केला. विशेष म्हणजे, केवळ इस्लामसाठी त्याने संगीत विश्व सोडले. इस्लामी तत्त्वांनुसार यापुढे काम करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. इस्लाममध्ये संगीत पूर्णपणे हराम नसल्याच्या त्याच्या वक्तव्यानेही चांगलाच वादंग उठला होता. यावरून हे स्पष्ट आहे की, कलाकारांचे जगणेही मुश्किल होऊन बसले आहे.
 
 
सामान्य कलाकार आणि खुद्द मंत्र्यांचीच अशी अवस्था असेल तर सामान्य पाकिस्तानींची काय स्थिती असेल, याची कल्पना न केलेली बरी. मागील महिन्यातच पाकिस्तानात महापूर आला. जवळपास 3 कोटींहून अधिक नागरिकांना महापुराचा फटका बसला. लाखो नागरिक बेघर झाले. पाकिस्तानात महागाई दिवसेंदिवस उच्चांक गाठत असताना जबाबदार मंत्र्यांच्याच जर अपहरणाचा प्रयत्न केला जात असेल, तर नेमकी दाद मागायची कुणाकडे? बेनझिर भुत्तोंची तर भर सभेत हत्या करण्यात आली होती. त्यामुळे पाकिस्तानातील राजकीय नेते यांसहित लोकप्रतिनिधीदेखील कायम दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असतात. याला पाकिस्तान स्वतः तितकाच जबाबदार आहे. दुसर्‍यांचे घर पोखरण्यासाठी पायघड्या अंथरल्या आणि आता तीच लोकं पाकिस्तानला पोखरत आहेत. उद्या पंतप्रधानांच्या अपहरणाचादेखील प्रयत्न झाला तर नवल वाटू नये.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.