गैरसमजूतीतून मुक्त व्हा, भारत मुक्ती तर दूरच!

    08-Oct-2022   
Total Views |

Bamsafe
 
 
 
दि. 5 ऑक्टोबर... दसरा. रा. स्व. संघाचा स्थापनादिवस आणि धम्म चक्र प्रवर्तन दिन. भारतीय धार्मिक, साामाजिक जीवनामध्ये या दोन्ही घटनांना महत्त्व. याच दिवशी वामन मेश्राम यांनी ‘भारत मुक्ती मोर्चा’ ‘बामसेफ’ आणि आणखीन कसल्या मुक्तीबिक्ती संघटनांच्या साहाय्याने नागपूर येथे संघाच्या मुख्यालयावर शेकडो लोकांच्यासोबत मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. अर्थात, वामन मेश्रामवर लिहिणे मलाही अप्रस्तुत वाटते. पण, म्हातारी मेल्याचे दुःख नसते, तर काळ सोकावतो हेच खरे. त्यामुळे या घटनेवर लिहिणे गरजेचे. वामन मेश्राम त्याच्या संघटना ‘बहुजन’ म्हणत कायम रडतात. पण, बहुजन समाजाची प्रतिनिधी म्हणून मला या घटनेबद्दल काय वाटते, हे मांडण्यासाठी हा लेखप्रपंच...
 
 
 
एक सिंह असतो. तो सद्गुणी आणि अतिशय कार्यक्षम. सगळ्यांचा लाडका. त्या सिंहाची कार्यक्षमता आणि लोकप्रियता पाहून एक गाढव उगीचच त्याच्यावर जळत असते. त्या गाढवाला स्वत:बद्दल भयंकर गैरसमज असतात. त्याला वाटत असते की, तो सिंहापेक्षा कोणत्याही बाबतीत कमी नाही. पण, तरीही सगळे लोक सिंहाचेच गुणगान गातात. बोलायचे तर सोडा, कधी कुणी आपल्याकडे येतही नाही. मग तो गाढव ठरवतो की, आपण सिंहापेक्षा श्रेष्ठ आहोत, हे सिद्ध करायचे. त्यामुळे तो सिंहाकडे जातो. मुळच्याच जळक्या वृत्तीचा गाढव सिंहाला म्हणतो, “मी तुझ्यापेक्षा सर्वशक्तीमान आहे. माझ्याशी शर्यत लाव. तू हरशील. तुला आणि जगाला कळेल की, मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे.” यावर सिंह काहीही म्हणत नाही, तर गाढव मनातल्या मनात खूश होतो आणि मनातल्या मनातच मांडे खात म्हणतो की, “वा वा, सिंह मला घाबरला!” तसे तो सिंहालाही म्हणतो.
 
 
सिंह मग स्पर्धा लावण्यास तयार होतो. त्यापैकी एक शर्यत असते लांब पल्ल्यात शिकार गाठायची. त्यामध्ये अर्थात गाढव हरते. दुसरी शर्यत असते जंगलात राजा म्हणून स्वतःला सिद्ध करायचे. अर्थात, यातही गाढव हरतो. दोन वेळा हरल्यानंतर गाढव आपल्या हरण्याचे समर्थन करत म्हणतो की, “सिंहाला नशिबाने साथ दिली. त्याच्या शिकारीला जास्त पळता आले नाही आणि दुसर्‍या शर्यतीत जंगलातल्या इतर प्राण्यांची बुद्धी गहाण पडली म्हणून ते सिंहाला राजा मानतात.” तो असे बोलून दाखवतो, यावर सगळेच हसतात. कारण, गाढवाची शून्य बुद्धी आणि गाढवाचे शून्य कर्तृत्व सगळ्यांनाच माहिती असते. पण, तरीही गाढवाची खुमखुमी जिरत नाही. ते गाढव पुन्हा सिंहाला आव्हान करते.
 
 
ते म्हणते, “सिंहा, तू दोन शर्यती जिंकलास. पण, उद्या तू पाहशील, तू मला हरवू शकणार नाही.” सिंह पुन्हा आवाहन स्वीकारतो. दुसर्‍या दिवशी ठरलेल्या ठिकाणी सिंह आणि गाढव एकत्र येतात. गाढव सरळ जाते आणि उकिरड्यावर लाथा झाडत लोळत पडतो. त्यातच तोे खूप खूश होतोे. उकिरड्याचा राडा उडवत तो सिंहाला म्हणतो, “सिंहा, ये आता माझ्याशी स्पर्धा कर.” अर्थात सिंह म्हणतो, “नाही गाढवा, या स्पर्धेत तूच जिंकलास. मी हरलो!” अशी ही कथा. अर्थात, या कथेमध्ये मूळ प्राणी घोडा आणि गाढव आहेत. मी फक्त घोड्याच्याऐवजी सिंह प्राणी घेतला आहे. का? ते विचारू नये. कारण, जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य ‘बामसेफ’, ‘भारत मुक्ती मोर्चा’च्या वामन मेश्रामला आहे, तेच अभिव्यक्तिस्वातंत्र्य मलाही आहे. संविधान काय फक्त वामन मेश्राम आणि तशाच प्रवृत्तीच्या, विकृतीच्या माणसांसाठी नाही. तर असो. ही सिंह आणि गाढवाची गोष्ट आठवण्याचे कारण की, दि. 6 ऑक्टोबर रोजी वामन मेश्राम याने रा. स्व. संघाच्या नागपूर येथील मुख्यालयावर काढलेला आणि फसलेलामोर्चा.
 
 
या गोष्टीतला सिंह आणि गाढव कोण? तर रा. स्व. संघ आणि ‘बामसेफ’ या दोन संघटनाचा विचार करू. अर्थात रा. स्व. संघाच्या सेवाविवेकी कार्य आणि ‘बामसेफ’चे कार्य याची तुलनाच होऊ शकत नाही. कारण, कुठे गेली जवळपास 98 वर्षे देशाच्या प्रगतीसाठी समाजाच्या, विकासासाठी आणि एकतेसाठी तन-मन-धन अर्पण करणारे रा. स्व. संघाचे कार्य आणि कुठे तीन टक्के विदेशी ब्राह्मण, मनुवादी षड्यंत्र वगैरे वगैरे शब्दांत अडकलेली आणि त्याला अनुसरूनच देशभरात भोळ्या-भाबड्या लोकांना काही बाही सांगणारी ‘बामसेफ’ तर ‘बामसेफ’ जेव्हा तेव्हा रा. स्व. संघाविषयी बोलण्यात स्वतःचे धन्यत्व समजते. रा. स्व. संघ असे करते, रा. स्व. संघ तसे करते. अरे पण ते काय करतात, याबाबत ते कधी बोलणार? ते कधी समाजासमोर येणार? रा. स्व. संघाला विरोध करण्यात ऊर्जा घालवण्यापेक्षा समाजाचे कल्याण करण्यात ‘बामसेफ’, ‘भारत मुक्ती मोर्चा’, ‘बहुजन मुक्ती मोर्चा’ वगैरे ऊर्जा आणि वेळ का देत नाहीत? तर मुद्दा हाच की, माझ्या मते या गोष्टीतला सिंह रा. स्व. संघाचे कार्य आहे आणि गाढव कोण आहे? वेगळे सांगायलाच हवे का?
 
 
हा मोर्चा का काढला, यावर वामन मेश्राम सहित बहुतेकांनी सांगितले की,रा. स्व. संघ संविधानानुसार काम करत नाही, म्हणून आम्ही मोर्चा काढणार आहोत. अरे, पण एखादी जागतिक स्तरावरची संघटना संविधानानुसार काम करते की नाही, हे ठरवण्याचे कंत्राट यांना कुणी दिले? माझ्या वैयक्तिक अनुभवावरून मी सांगू शकते की, या देशात जाऊ दे, रा. स्व. संघ आणि त्याच्याशी संलग्न संघटना जितक्या संवैधाऩिक कायद्याच्या चौकटीत काम करतात, तितके कुणीही करत नसेल. याचे कारण स्पष्ट आहे. संघटनेच्या लोकप्रियता आणि जनमताच्या समर्थनामुळे आणि ही संघटना आपल्याला राजकीय साथ देणार नाही, हे कळल्यामुळे संघटनेवर बंदी आणण्याची कटंकारस्थान या पूर्वीही झाली आहेत. अर्थात, त्यानंतर संघटना तावूनसुलाखून निघाली आणि तिची सच्चाई आणखीन सिद्ध झाली. तर मी काय सांगत होते की, रा. स्व. संघाचे संविधानात्मक कार्य.
 
 
देशभरात संघाच्या अनेक संस्था कार्यरत आहेत.त्या संस्थांचे कार्य या मंडळींनी एकदा तरी पाहायला हवे. रा. स्व. संघाच्या मुख्यालयावर म्हणे मोर्चा. का बरं? तर ते वनवासींचे हिंदुत्वकरण करतात. आता यावर मला असे वाटते की, वामन मेश्राम याने कुठे पाहिले हे? मला हे बोलण्याचा अधिकार आहे. कारण, प. बंगाल, झारखंड, छत्तीसगढ, ओडिशा आणि महाराष्ट्रातील बहुतेक सर्वच वनवासीबहुल क्षेत्रात कामानिमित्त दौरे झाले आहेत. झारखंडची पत्थलगढी, तिथले भोळेभाबडे मुंडा वनवासी,त्यांच्या धर्मांतरासाठी काम करणारी चर्चसंस्था आणि त्यांना समर्थन देणारे नक्षली, हे वामन मेश्राम आणि ‘बामसेफ’ तसेच मुक्तीपिक्ती वगैरे नाव धारण करणार्‍या संस्थांना ऐकून तरी माहिती आहेत का? या वनवासी समाजाला समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी सगळे तरूणपण तिथे खर्ची घातलेले रा. स्व. संघाचे स्वयंसेवक आणि अत्यंत जीवघेण्या परिस्थितीमध्ये तग धरून असणार्‍या संघाच्या विचाारधारेशी समर्पित असणार्‍या संस्था यांनी कधी तरी पाहिल्या आहेत का? समाज एक आहे. भारतीय म्हणून सगळे एक आहेत, हे जनमानसांत रूजवण्याऐवजी ‘अमूक एक विदेशी आहे’ आणि ‘तमूक एक मूलनिवासी आहे’ अशा भ्रामक कल्पना लोकांमध्ये कोण रूजवते?
 
 
नुकतेच मी ओडिशाला मयुरभंज जिल्ह्यात जाऊन आले. तिथल्या संथाली समाजाचे काही युवक म्हणाले की, “आम्ही स्वतंत्र आहोत. आमचा संथाल समाज वेगळा आहे,” असे म्हणून ते इतर समाजाशी फटकून वागतात. पूर्वी ते सगळे गुण्यागोविंदाने राहायचे. पण, त्यांच्या डोक्यात हे आम्ही तुम्ही, आपले परके आणि मूलनिवासीचे भूत कोणी टाकले? अर्थात, ते संथाल समाजाला ‘स्वतंत्र समाज’ म्हणतात, यातही पुन्हा माझे काहीच म्हणणे नाही. कारण, त्यांची मर्जी. मात्र, सगळ्या समाजासोबत आनंदात जगणार्‍या मयुरभंजच्या भोळ्याभाबड्या संथाल समाजाला कोण चिथावत आहे? त्या तरुणांशी मी बोलले की, हे तुम्हाला कोणी सांगितले, तर त्यांचे उत्तर होते की, ‘बामसेफ’चे कुणीतरी आले होते आणि ते सांगत होते. त्यांना विचारले, तुमच्यावर काही अन्याय-अत्याचार केला का कुणी?
 
 
तर हे भोळे युवक म्हणाले नाही. पण, उद्या झाला तर? तर अशा लोकांच्या संघटनेने एखादी संघटना संविधानाला मानत नाही, हे म्हणणेच हास्यास्पद आहे. त्यातही वनवासींचे हिंदुत्वकरण करते हे म्हणणे तर जास्तच मुर्खपणाचे. रा. स्व. संघाच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्याचे एक कारण वामन मेश्रामने असेही सांगितले आहे म्हणे की, रा. स्व. संघ ओबीसी समाजाला जबरदस्तीने हिंदू बनवत आहे. आता याला हसावे की रडावे? काय करावे? वामन मेश्राम आणि त्याच्या संघटनेने देशभरात सर्वेक्षण करावे. देशात जितके म्हणून ओबीसी समाज आहेत, ते स्वतःलाआजच हिंदू म्हणवून घेत नाहीत किंवा आजच हिंदू समाजानुसार त्यांचे जगणे-मरणे नाही. नव्हे नव्हे हिंदू संस्कार-संस्कृतीपासून त्यांना वेगळे काढलेच जाऊ शकत नाही. ओबीसी समाजाच्या जातपंचायती आजही आहेत. ओबीसींच्या का, भटक्या-विमुक्त समाजाच्या आजही जातपंचायती आहेत. त्या आता कायद्यासमोर भावकी म्हणून वावरतात.
 
 
 
त्यात ‘बामसेफीं’नी आणि वामन मेश्रामने जावे. त्यांना कळेल की, ओबीसी समाजाच्या जगण्यामध्ये हिंदू संस्कार-संस्कृतीचे काय स्थान आहे ते. देशातला कुठलाही समाज स्वतःची जात म्हणून ओळख देतो (अर्थात जात संपायलाच हवी) पण, जेव्हा मुद्दा हिंदू संस्कार आणि संस्कृती धर्म-नीतीवर येतो, तेव्हा छातीचा कोट करून हा सगळा समाज एक हेातो. वामन मेश्रामच्या भाषेत देशात केवळ साडेतीन टक्के ब्राह्मण हे देशातल्या बहुजनांवर राज्य करतात. तर मग देशातले 85 टक्के बहुजन काय करतात? वामन यांना काय वाटते की, बाकीच्या समाजाला अक्कल नाही? खोटे बोलण्याला आणि बेडकासारखे फुगवून सांगण्यालाही काही मर्यादा असाव्यात की नाही? या देशाची राष्ट्रपती संथाल वनवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान ओबीसी समाजाचे नरेंद्र मोदी आहेत. देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान झालेल्या या लोकांच्याबद्दल ‘बामसेफी’ मंडळींना सूचत नाही काय बोलायचे. मग ते म्हणतात की, यांना म्हणे ब्राह्मण चालवतात.
 
 
ब्राह्मण समाजाची इतकी धडकी आणि दहशत या ‘बामसेफी’ आणि मुक्तीवाल्यांना का आहे? अर्थात, त्यांचे काही वैयक्तिक कारण असेल. पण, स्वतःच्या वैयक्तिक अजेंड्यासाठी ‘बामसेफी’ समाजातल्या लोकांमध्ये दुही का पेटवत आहेत? अर्थात, त्यांचा जनाधार खूप कमी आहे. तरीही वाटत राहते की, उत्तर प्रदेशातल्या निवडणुकीमध्ये ओवेसीच्या पार्टीला समर्थन देणारी वामन मेश्राम याचा ‘भारत मुक्ती मोर्चा.’ तोडी लावायला चंद्रशेखर अर्थात रावण आहेच. एवढे सगळे उपद्वयाप करून आपले हाल कुत्रा खात नाही, कुणी कुणी विचारत नाही. म्हणून मग प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी वामन मेश्रामने रा. स्व. संघाच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा कार्यक्रम आखला असावा, असे वाटते. हा मोर्चा काढण्याने बहुजन समाजाला काय फायदा होणार आहे? समाजाच्या पुढचे प्रश्न संपले का? समाजाचा युवा नशेखोरीत पिचला आहे. त्याचे काही उत्थान होणार आहे का? मुळात प्रश्न आहे की, आपण 85 टक्के बहुजनांचे नेतृत्व करतो असे म्हणणार्‍या वामन मेश्रामना 85 टक्के समाज ओळखतो तरी का? (टीप- मी मुंबईतल्या विविध समाजांतल्या लोकांना विचारले, पण त्यांना माहिती नाही की वामन मेश्राम कोण आणि ‘बामसेफ’ कोण?) तर असो, प्रसिद्धी मिळवण्यासाठी वामन मेश्रामने केलेली ही खेळीच म्हणता येईल.
 
 
 
हा मोर्चा 6 ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिनी आणि नागपूरसारख्या दीक्षाभूमीतच काढण्यामागे वामन मेश्राम आणि मंडळींचे काही वेगळे प्रयोजन होते का? कारण, दि. 6 ऑक्टोबर रोजी देशभरातला समाज दीक्षाभूमीवर एकवटतो. मोर्च्यात काही अनुचितप्रकार घडला असता, तर मग केवढा अनर्थ झाला असता? पण, विद्यमान शिवसेना-भाजप सरकार आणि प्रशासन यांना धन्यवाद की, त्यांनी हे प्रकरण चांगले हाताळले. कारण, कोरेगाव-भीमा प्रकरण आणि त्यानंतर उसळलेलीहिंसा महाराष्ट्रात समाजामध्ये पसरलेला विद्वेष हे आजही आपण विसरू शकत नाही. दि. 6 ऑक्टोबर रोजीच वामन मेश्रामने मोर्चा का काढला, तेही परवानगी नसताना याचा खोलवर जाऊन विचार करायला हवा.
 
 
वामन मेश्राम आणि सहकारी काहीही करतात, त्यांना गंभीरतेने घ्यावे का? किंवा मी त्यांच्यावर इतके लिहिले हेसुद्धा गरजेचे होते का? पण, असो, लिहिणे गरजेचे आहे. कारण, सत्य मांडायलाच हवे. बाकी एक सत्य असेही आहे की, वामन मेश्रामने स्वतःच्या गैरसमजुतीतून मुक्तता करून घ्यावी. ‘भारत मुक्ती’ वगैरे दूरची बात!!
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.