नशेखोरीची जागतिक क्रूरता

    08-Oct-2022   
Total Views |

jp


तो लहान मुलांच्या ‘डे-केअर सेंटर’मध्ये घुसला. तिथे एक गर्भवती महिला होती. कोण अगंतुक आला म्हणून तिने त्याला अडवले, तर त्याने तिला गोळी मारली. सेंटरमध्येघुसल्यानंतर त्याने तिथे अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यात १९ मुलं आणि तीन मुली मृत्युमुखी पडल्या काही झोपलेल्या बालकांवर तर त्या नराधमाने चाकूहल्लाही केला. दोन-दोन वर्षांची ती बालके होती. एकच हलकल्लोळ माजला.


मग तो बाहेर आला. जे लोक बाहेर होते, त्यांच्यावरही गोळीबार केला. त्यात १२ जण जखमी झाले. ही भयंकर घटना आहे उत्तर थायलंडमधल्या नोंग बुवा लांफू या शहरातील आणि हल्लेखोर सैतान आहे. ३४ वर्षांचा पान्या खामराप. पान्या तिथून घरी आला, मग त्याने त्याच्या पत्नीला आणि मुलालाही मारून टाकले आणि स्वतः देखील आत्महत्या केली. पान्या हा पोलीस होता, पण अमली पदार्थांचा व्यसनी होता.
 
 
नशेखोर पान्या नशा करून नोकरीवर गेला. त्यामुळे त्याला कामावरून निलंबित करण्यात आले होते. या घटनेचा न्यायालयीन न्यायनिवाडा ७ ऑक्टोबर रोजी होणार होता. पण, त्याआधी एक दिवसापूर्वी म्हणजे ६ ऑक्टोबर रोजी त्याने हे भयंकर कृत्य केले. अमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या नशेबाज पान्याने स्वतःच्या कुटुंबासकट ३४ कुटुंबाना दुःखाच्यामरणयातनेत लोटले. ‘डे-केअर सेंटर’मध्ये हकनाक मृत्युमुखी पडलेली ती कोवळी बालकं... आईबाबांनी किती विश्वासाने त्यांना या ‘डे-केअर सेंटर’मध्ये ठेवले असेल.
 
 
या चिमुकल्यांनाच काय कुणालाही वाटले नसेल की, त्यांचा असा क्रूर खून होईल. नशेने पान्याला सैतान बनवले. नीती-अनीती, पाप-पुण्य यापलीकडे जाऊन पान्या राक्षस बनला तो केवळ नशेने. त्याच्या पापाला कुठेही माफी नाही. नशेचे भयंकर परिणाम, नशेचा विळखा माणसाला किती हैवान बनवू शकतो, हे सांगण्यासाठी थायलंडमध्ये ६ ऑक्टोबर रोजी घडलेली ही घटना पुरेशी आहे. नातीगोती विसरायला लावणार्‍या या नशेने सगळ्या जगाला त्रस्त केले, नव्हे जागतिक समाज अभ्यासकांचे म्हणणे आहे की, समजा, दोन देशांत शत्रुत्व असेल आणि एका देशाला दुसर्‍या देशाला जेरीस आणायचे असेल, तर आता युद्धशस्त्राने नाही, तर अमली पदार्थाने लढले जाते
 
 
शत्रू देशातील नागरिकांना, युवकांना अमली पदार्थांचे व्यसन लावण्याची कटकारस्थान रचली जातात. देशाचे नागरिक व्यसनाच्या अधीन गेले की त्या देशाचे सर्व उद्योगधंदे ठप्प, गुन्हेगारीचे सम्राज्य वाढते. तसेच नशेखोर नागरिक नशेसाठी स्वतःच्या देशाविरोधात ही कारवाई करू शकतात. अर्थात, समाज अभ्यासकांचे म्हणणे खरेच आहे. गेल्या काही महिन्यांत आपल्या देशातल्या घटना आठवा. पोलीस आणि विशेष दलाला कारवाईमध्ये गुजरात आणि मुंबईमधून कोट्यवधींचे अमली पदार्थ सापडले.
 
 
६ ऑक्टोबर रोजी तर आखाती देशातून मुंबईला आलेल्या व्यक्तीकडून १०० कोटींचे अमली पदार्थ सापडले. करोडोंचे हे अमली पदार्थ मुंबईमध्ये आणले गेले. पाकिस्तान आणि इतर देशातून या अमली पदार्थांची आवक होते, हे उघड सत्य. आज पंजाबमध्ये काय दृश्य आहे? अमली पदार्थांचे तिथे तर पेव फुटले आहे. पंजाब हे भारत-पाकिस्तान सीमेवरचे प्रमुख राज्य. इथून देशभरात ट्रक आणि इतर वाहनेही प्रवास करतात. इथे अमली पदार्थच्या धंद्याचे जाळे विणले, तर भारतात घुसायला मार्ग मोकळा, असा शत्रूराष्ट्राचा डाव. त्यामुळेच की काय गुजरात, मुंबई, राजस्थान अशा ठिकाणी वारंवार अमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांवर कारवाईच्या घटना निदर्शनास येतात. अमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप सक्रिय आहे. ६ ऑक्टोबर रोजी अमेरिकेच्या मेक्सिकोमध्ये घडलेल्या घटनेने याची प्रचिती येते.
 
 
सेन मिगल टोटल येथील टाऊन हॉलमध्ये ‘लॉस टेकिलर्स’ या गँगने हल्ला केला. त्यात शहराच्या महापौरासकट १८ जणांचा मृत्यू झाला आहे. यात महापौराचे पिता जे माजी महापौर होते, त्यांचाही खून करण्यात आला. या घटनेनंतर या ‘लॉस टेकिलर्स’ गँगने धमकी दिली की, आम्ही पुन्हा येऊ. ही गँग तशी कुख्यात. त्यांनी हे का केले तर येणार्‍या काळात त्यांच्या तस्करीआड या घाणेरड्या धंद्याविरोधात कुणी येऊ नये म्हणून. २००० सालापासूनमेक्सिकोमध्ये ९४ महापौरांच्या हत्या झाल्या. नशेखोराने थायलंडमध्ये ६ ऑक्टोबर रोजी ३४ जणांचा जीव घेतला आणि याच दिवशी नशेचा बाजार करणार्‍यांनी मेक्सिकोत २० जणांची हत्या केली. जगभरात छोटे-मोठे गुन्हे घडलेत. या सगळ्यांचे संबंध अमली पदार्थ, नशा, व्यसन यांच्याशीच आहे. तुर्तास थायलंड आणि मेक्सिकोच्या दुःखात जग सहभागी आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.