शाश्वत ऊर्जाबचतीसाठी ‘एनर्जी बे’

    07-Oct-2022   
Total Views |
energy bae
 
 
 
ऊर्जा हे उद्योगधंद्यांसाठी इंधनच. तेव्हा, या ऊर्जेचा सुयोग्य आणि किफायतशीर दरांत वापर करणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे. त्यातच आजचा जमाना हा अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा. तेव्हा, सर्वसामान्यांच्या तसेच उद्योजकांच्या ऊर्जेच्या नेमक्या गरजा ओळखून, त्याचा परिपूर्ण विचार करणार्‍या ‘एनर्जी बे’ या स्टार्टअपच्या प्रणय खोब्रागडे आणि अक्षय जयंत यांची ही यशोगाथा...
 
 
आजच्या ‘इन्स्टंट’च्या युगात सगळ्याच गोष्टी आपल्याला हव्या असतात. मोबाईल्स हवेत, कमीत कमी वेळात लोकांशी ’कनेक्ट’ होण्यासाठी वेगवान इंटरनेट हवे, वेगाने धावणारी वाहनेही पाहिजेत. त्यासाठी आपण मग ‘बुलेट ट्रेन’ वगैरेंसारख्या माध्यमांचा विचार करतो. पण, या सर्वांसाठी लागणारी ती ऊर्जा, ती नेमकी कुठून येणार, हा साहजिकच या सर्व मोठ्या अपेक्षांच्या मागोमाग येणार प्रश्न आहे. मग त्यासाठी आपण काय करतो, याचा विचार आपण कधी केलाय का? आजही आपली जास्तीत जास्त ऊर्जा ही औष्णिक, पेट्रोल, डिझेल यांसारख्या प्रदूषण करणार्‍या स्रोतांतूनच मिळवतो, पण शेवटी त्याचा निसर्गाला आणि पर्यायाने मानवजातीला त्रासच होणार आहे. कारण, हे सर्व ऊर्जास्रोत आपल्यासाठी हानिकारक आहेत. आज नाही तर उद्या त्यांच्यापासून आपल्याला अपाय होणारच आहे. त्यावर पर्याय आहे तो अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा. त्यांच्यापासून मिळणारी ऊर्जा ही स्वच्छ, शुद्ध आणि कधीच न संपणारी शाश्वत ऊर्जा आहे. त्यामुळे ऊर्जेच्या या स्रोतांचा वापर भारतासह जगभरातही वाढलेला दिसतो.
 
 
मात्र, या ऊर्जास्रोतांचा वापर करताना आपल्याकडे त्याबाबतीत एक सरसकटपणा आला आहे. कारण, नेमका कशा पद्धतीने आपण या ऊर्जास्रोतांचा वापर केला पाहिजे, त्याचे ‘पॅटर्न’ कसे ठरवले पाहिजे, या सर्वच गोष्टींचा आपल्याकडे सांगोपांग विचार होताना दिसत नाही. कारण, या क्षेत्रात अजूनही संशोधनाची कमतरता आहे. अजून बराच लांबचा पल्ला याबाबतीत गाठायचा आहे. त्यातून लोकांना शिक्षित करणे गरजेचे आहे. हे काम मोठे, वेळखाऊ, पण सर्वात महत्त्वाचे आहे. याच संकल्पनेचा विचार करून यात स्वतःच्या क्षमतेवर नवीन ‘प्रॉडक्ट’ तयार करण्याचे काम प्रणय खोब्रागडे आणि अक्षय जयंत यांनी केले आहे त्यांच्या ‘एनर्जी बे’ या ‘स्टार्टअप’च्या माध्यमातून...
 
 
दोघेही महाविद्यालयामधले मित्र. लोणावळ्यासारख्या एका निसर्गरम्य ठिकाणी असलेले त्यांचे इंजिनिअरिंग महाविद्यालय. इंजिनिअरिंग झाले की, कुठल्याशा मोठ्या कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी घेऊन आपले आयुष्य सुरळीत करण्याचे स्वप्न बरेचजण बघतात. पण, या दोन्ही मित्रांचे जरा वेगळेच ‘प्लान्स’ होते. त्यांनी सुरुवातीपासूनच उद्योजकतचे स्वप्न उरी बाळगले होते. त्यादृष्टीनेच ते कार्यरत होते. इंजिनिअरिंगला अभ्यासाचा भाग म्हणून एखादा प्रोजेक्ट करायचा असतो. त्यासाठी प्रणय आणि अक्षयने तेथील हवामानाचा अभ्यास करून त्यावर काम करणारे एक ‘मॉडेल’ तयार केले. लोणावळासारख्या एका थंड हवेच्या ठिकाणी अशा पद्धतीचे ‘मॉडेल’ विकसित करणे गरजेचे आहे, जे अपारंपरिक ऊर्जास्रोतांवर चालेल. कारण, त्या ठिकाणी सोलरवरचे मॉडेल विकसित करून काहीच फायदा नाही. कारण, तिथे ऊन आणि वारा दोन्ही समप्रमाणातच असते. त्यासाठी दोन्हींचा समन्वय साधणारे एखादे ’मॉडेल’ विकसित करावे लागेल, असा विचार करून या दोघांनी महाविद्यालयाच्या प्रकल्पासाठीच एक असे ‘मॉडेल’ विकसित केले की, ज्यात हवा आणि ऊन या दोन्ही गोष्टींमधून ऊर्जा तयार होऊ शकते. हे सर्वात महत्त्वाचे आहे. असे ‘मॉडेल’ या दोघांनी बनवले आणि त्याला नाव दिले वायुमित्रा. 2017 मध्ये त्यांनी आपल्या ‘स्टार्टअप’ची सुरुवात केली. 2018 मध्ये सर्व ‘रजिस्ट्रेशन प्रोसेस’ करून काम करायला सुरुवात केली.
 
 
सुरुवातीला या दोन्ही उद्योजकांसमोर दोन पर्याय उपलब्ध होते, एक तर अशा प्रकारचे ‘हायब्रीड मॉडेल’ विकसित करण्याचे आणि ‘हायड्रोजन एनर्जी’च्या क्षेत्रात काम करण्याचा. पण, ‘हायड्रोजन’च्या क्षेत्रात अजून देशाला पल्ला गाठायचा असल्याने त्यांनी याच आपल्या पहिल्या ‘मॉडेल’चा विचार केला आणि काम करायला सुरुवात केली. त्यांच्या कामाची पद्धत खूप सोपी आणि सुटसुटीत आहे. जेव्हा एखादा क्लाएंट ‘एनर्जी बे’कडे येतो, तेव्हा सर्वप्रथम त्या क्लाएंटची महिन्याची ऊर्जेची गरज किती, याचा अभ्यास केला जातो. त्यासाठी क्लाएंटची दोन ते तीन महिन्यांची बिले तपासली जातात. त्यानुसार त्याची ऊर्जेची गरज एकदा समजली की, त्यानुसार त्या क्लाएंटचा विचार केला जातो. संबंधित क्लाएंट ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे, त्या ठिकाणचे हवामान, तापमान किती बदलते इत्यादी सगळ्या बारीकसारीक बाबी तपासल्या जातात आणि मगच सर्व ‘इन्स्टॉलेशन’ची प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यात परत थोडा खोलवर जाऊन विचार करावा लागतो. जर तोच ‘क्लाएंट’ एका थंड हवेच्या ठिकाणी राहत असेल, तर त्याला जास्त करून पवनऊर्जा वापरण्यास किंवा तशाच प्रकारची ऊर्जा त्याला जास्तीत जास्त कशी मिळेल, अशा पद्धतीने त्याच्या गरजेनुसार ‘वायुमित्रा’चे ‘इन्स्टॉलेशन’ केले जाते. तसेच जर एखाद्या ग्राहकाला उन्हाळ्यात सिंचनासाठी वगैरे या यंत्राची गरज असेल, तर त्याला जास्तीत जास्त सौरऊर्जा वापरण्याचा सल्ला दिला जाईल किंवा त्यापासून जास्तीत जास्त ऊर्जा कशी मिळेल, अशी व्यवस्था त्या यंत्रात करण्यात येईल. अशा पद्धतीने ‘एनर्जी बे’चे काम चालते.
 
 
या संपूर्ण उद्योगाच्या एकंदर भविष्याबद्दल बोलायचे झाल्यास, भविष्यात खूप संधी तयार होतील. कारण, भारतच नव्हे, तर संपूर्ण जगच या अपारंपरिक ऊर्जास्रोतांवरच भर देण्यास सुरुवात करणार आहे. त्यामुळे भारतातही खूपशा संधी तयार होतील. तसेच या क्षेत्रात काम करण्यासाठी भरपूर वाव आहे. भारत सरकारनेही या क्षेत्रात काम करणार्‍या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना तयार केल्या आहेत. सरकारतर्फे या क्षेत्रात भरघोस गुंतवणूकसुद्धा होताना दिसते. त्यामुळे भारतही या क्षेत्राकडे गांभीर्याने बघतोय, हे दिसून येते. भारत सरकारने तर 2070 पर्यंत ‘शून्य कार्बन’ उत्सर्जनाचे लक्ष्य निर्धारित केले आहे. एकूणच सध्या या क्षेत्रात बरीच जनजागृती तर होत आहेच, पण ग्राहकसंख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसते. तेव्हा या क्षेत्रात काम करताना त्याविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे. कारण अजूनही नागरिकांना याविषयी फारशी माहिती नसते. सोलर असेल, तर त्यासाठीचे कुठले पॅनेल्स खरेदी करावे, कशा पद्धतीने त्याचा वापर करावा, त्यांचा किती काळ वापर होऊ शकतो, याबद्दल जागरूकता निर्माण करणे महत्त्वाचे आहे आणि सध्या ‘एनर्जी बे’च्या माध्यमातून प्रणय खोब्रागडे आणि अक्षय जयंत त्यासाठीच प्रयत्नशील आहेत. याचबरोबरीने या जोडीने त्यांच्याचसारख्या अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या क्षेत्रात काम करणार्‍या उद्योजकांची एक साखळीच तयार केली आहे, ज्यामार्फत बायोगॅस, तसेच तत्सम ऊर्जास्रोतांच्या अनेक पर्यायांची ते ग्राहकांना माहिती उपलब्ध करून देतात. याचबरोबरीने पुढे जाऊन धावत्या गाडीपासून ऊर्जानिर्मिती करण्यासारख्या अभिनव उपक्रमांवरही ते काम करीत आहेत.
 
 
याविषयी बोलताना प्रणय व अक्षय म्हणतात की, “या क्षेत्रात काम करायचे असेल तर मुळात आपल्याला हे क्षेत्र नेमके आहे काय? ते काम कसे करते? याची माहिती हवी. त्यासाठी आपल्याला थोडा काळ का होईना, या क्षेत्रात कुठेतरी नोकरी, ‘इंटर्नशिप करणे भाग आहे. ते जरूर केलेच पाहिजे. त्याशिवाय हे क्षेत्र पूर्णपणे समजणार नाही. त्याचबरोबरीने सतत या क्षेत्राची माहिती करून घेणे आवश्यक आहे. कुठे काय नवीन चालले आहे, कुठली नवी उत्पादने बाजारात आली आहेत, त्या सर्वांची माहिती असणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे क्षेत्र आपल्या ‘नेटवर्क’वरच चालते तेव्हा आपले ‘नेटवर्क’ आधी मजबूत करा म्हणजे काम करताना कुठलीही अडचण येणार नाही. या सर्व पूर्वतयारीशिवाय या क्षेत्रात काम करणे अवघड आहे. त्यासाठी या गोष्टी कराव्याच लागतील,” असे हे दोघे नवे उद्योजक आपल्या उद्योजक मित्रांना सल्ला देतात. अपारंपरिक ऊर्जास्रोतांसारख्या एका वेगळ्याच आणि अनवट क्षेत्रात आपल्या स्वतःच्या हिमतीवर उद्योग उभा करून, तो यशस्वीदेखील करण्याचे कसब दाखवणार्‍या प्रणय खोब्रागडे आणि अक्षय जयंत यांचा प्रवास अतिशय स्पृहणीय असाच म्हणावा लागेल.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

हर्षद वैद्य

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये उपसंपादक (वेब आणि प्रिंट) म्हणून कार्यरत. रुईया महाविद्यालयातून गणित या विषयात पदवीचे शिक्षण घेतले. आर्थिक क्षेत्राशी संबंधित वृत्तांकन आणि लेखन. भारतीय संगीत, इतिहास या विषयांमध्ये विशेष रस. महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य. अर्थशास्त्र विषयात महाविद्यालयात संशोधन केले आहे. शैक्षणिक, सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्राचाही अनुभव.