सरसंघचालकांच्या भाषणातील प्रदीप लोखंडे कोण आहेत?

    07-Oct-2022
Total Views |



सरसंघचालकांच्या भाषणातील प्रदीप लोखंडे कोण आहेत? :
सर्व प्रथम तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा... आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीच्या उत्सवातील आपल्या संबोधनात सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी प्रदीप लोखंडेंच्या नावाचा उल्लेख केला. पण हे प्रदीप लोखंडे नेमके आहेत तरी कोण तुम्हाला माहितीयं का? पोस्टकार्ड मॅन, अशी ख्याती असलेल्या प्रदीप लोखंडे आणि पुणे १३ हे नेमकं काय समीकरण आहे हेच जाणून घेऊया या लेखातून....
 
एक मुलगा, ६ वीत शाळा सोडून पुण्यातल्या एका छापखान्यात नोकरीला लागतो, तिथेच तो आपले शिक्षण पूर्ण करत करत आपली जाहिरात एजन्सी सुरु करतो. काम करता असताना त्याच्या लक्षात येत की गावांचा विकास करायचा असेल तर त्यांची संपूर्ण माहिती गोळा केली पाहिजे. म्हणून तो पोस्टकार्डवर गावच्या सरपंचांना, कोतवालांना पत्र पाठवण्यास सुरुवात करतो असं करत करत तब्बल ८ लाख पत्रांपर्यंत हा उपक्रम पोहोचतो, सर्वच स्तरांवरून त्याचं कौतुक होतं आणि त्याला पोस्टकार्डमॅन म्हणून ओळख मिळते. आज झालेल्या विजयादशमीच्या भाषणात सरसंघचालकांनीही त्यांचा उल्लेख केला. त्याचं नाव आहे प्रदीप लोखंडे.
 
 
एक उद्योजक होण्यासाठी इंग्रजीचा बागुलबुवा आवश्यक नाही हे सिद्ध करणारा उद्योजक म्हणून सरसंघचालकांनी प्रदीप यांचा गौरव केला आहे. मराठी भाषेतील सर्वात मोठे डेटा संग्रहक असणाऱ्या प्रदीप यांचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. सुरुवातीला छापखान्यात नोकर करत कात त्यांनी स्वतःचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि ९९९६ मध्ये पुण्यात स्वतःची जाहिरात कंपनी सुरु केली. तेव्हा गाव खेड्यांत फिरायचे म्हणजे पुरेशी दळणवळणाची, संपर्काची साधने उपलब्ध नव्हती.मग प्रदीप यांनी एक शक्कल लढवली त्यांनी गावातल्या सरपंचांना, कोतवालांना, शिक्षकांची माहिती मिळवायची आणि पत्र पाठवायची आणि त्यातून तुमच्या इथे बाजार कितीला भरतो, नक्की काय सुविधा उपलब्ध आहेत, कुठला माल विकला जातो, माल येतो कुठून ? अशा सर्व गोष्टींची माहिती ते त्यांना विचारायचे, हळू हळू करत त्यांना मिळणारा प्रतिसाद वाढायला लागला. गावखेड्यांतुन त्यांना येणाऱ्या पत्रांचा ओघ वाढायला लागला. प्रदीप यांना येणाऱ्या पत्रांची ख्याती इतकी पसरली की पत्रावर प्रदीप लोखंडे, पुणे १३ एवढे जरी पाठवलं तरी ते पत्र प्रदीप यांच्याकडे पोहोचायला लागलं.
 
 
असं करता करता तब्बल ८ लाख पत्र त्यांच्या कडे आहेत, फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातील ४९ हजार गावांशी त्यांचा संपर्क झाला आहे. त्यातील ५८०० गावांना त्यांनी स्वतः भेट दिली आहे. प्रदीप यांच्या रूरल रिलेशन्स या जाहिरात कंपनीच्या माध्यमातून त्यांनी एवढ्या गावांचा डेटा गोळा केला. ही माहिती इतकी महत्वाची होती प्रत्यक्ष महाराष्ट्र सरकारदेखील योजना तयार करताना प्रदीप यांच्या कडून माहिती घेऊन योजनांची आखणी करायला लागले. कित्येक मोठ्या मोठ्या कंपन्यासुद्धा प्रदीप यांच्याकडूनच डेटा घ्यायला लागल्या. इतकी लोकप्रियता आणि विश्वासार्हता प्रदीप यांनी मिळवली आहे. पण विकासाची गंगा शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे हेच त्यांचे धेय्य असल्याने त्यांनी व्यवसायाबरोबरच सामाजिक प्रश्नांना भिडायला सुरुवात केली. आज गावात तंत्रज्ञान पोहोचले पाहिजे मुलांना ते समजले पाहिजे यासाठी त्यांनी स्वतः देशाच्या विविध भागांतील २८००० गावांमध्ये कम्प्युटर्स इन्स्टॉल केले आहेत. यातच त्यांनी ग्यानकी नावाचा एक उपक्रम सुरु केला. गावातील मुलांना वाचायला पुस्तके मिळाली पाहिजेत या हेतूने त्यांनी हा पुस्तके गोळा करण्याचा उपक्रम सुरु केला. आज १२ लाखांहून अधिक मुलांपर्यंत हा उपक्रम पोहोचला आहे.
 
 
व्यवसायातून स्वतःच्या फायद्याबरोबरच समाज शिक्षण आणि त्यातून होणारी देशउन्नतीचे कार्य करणाऱ्या प्रदीप यांचे हे कार्य खूपच मोठे आहे. "मला येणारी पत्रे वाचणे हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, ही पत्रे वाचून मला लोकांसाठी काम करता येते हीच आनंदाची गोष्ट आहे असे प्रदीप स्वतः सांगतात. ही पत्र पाठवण्याची परंपरा लुप्त आपल्या पुढच्या पिढीपर्यंत जावी यासाठी त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नात तिच्या मित्रांना पोस्टकार्डवरून निमंत्रण पाठ्वण्यास सांगितले होते. सरसंघचालकांनी म्हटल्याप्रमाणे आपली आपल्या मातीतील परंपरा जपून त्यातून व्यवसाय आणि सामाजिक कार्य या दोन्ही गोष्टी साध्य करून त्यात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या प्रदीप यांचे कार्य खरंच खूप मोठे आहे.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.