फोटोचा अट्टहास कशासाठी?

    07-Oct-2022   
Total Views |

Bharat Jodo
 
 
 
सध्या राहुल गांधी ‘भारत जोडो’ यात्रेवर निघाले असून ही यात्रा सुरुवातीपासूनच वादात सापडली आहे. आता यात्रा कर्नाटकात पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा ’भारत जोडो’ यात्रा वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. कर्नाटक नवनिर्माण समितीसह अनेक कन्नड समर्थक संघटनांनी काँग्रेस आणि राहुल गांधींना कर्नाटकचा अवमान केल्याप्रकरणी इशारा दिला आहे. कर्नाटकच्या ध्वजाचा गैरवापर करण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचे सांगत ध्वजावर काँग्रेस राहुल गांधींचा फोटो टाकत आहे, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असल्याचे या संघटनांनी म्हटले आहे.
 
 
म्हैसूरमध्ये राहुल गांधींची ’भारत जोडो’ यात्रा पोहोचल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते पक्षाच्या झेंड्यासह कर्नाटकचे झेंडे फडकवताना दिसले. परपंतु, धक्कादायक बाब म्हणजे या झेंड्यांमध्ये राहुल गांधींचे फोटोदेखील छापण्यात आले होते. त्यामुळे कन्नड समर्थक संघटना चांगल्याच संतापल्या. काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींनी याप्रकरणी माफी मागावी, अशी मागणी या संघटनांनी केली आहे. तसे पाहायला गेले तर पिवळा आणि लाल पट्टा हा कर्नाटकचा ध्वज मानला जातो. हे कन्नड आणि कर्नाटकचे प्रतीकदेखील मानले जाते. कर्नाटकातील ‘व्होट बँके’च्या राजकारणामुळे काँग्रेसने या झेंड्यांमध्ये चक्क राहुल गांधींचे चित्र छापले होते. या प्रकरणी कर्नाटकचे महसूलमंत्री आर. अशोक यांनी कन्नड ध्वजावर फोटो छापल्याचा निषेध केला आहे.
 
 
 
काँग्रेस नेते सिद्धरामय्या सत्तेत असताना त्यांनी कर्नाटकचा झेंडा बदलला. त्यावेळी सर्व कन्नडिगांनी विरोध केला. नंतर त्यांनी तो बदलला. आता झेंड्यावर राहुल गांधींचे चित्र काँग्रेससाठी लाजिरवाणे असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, कर्नाटक भाजपनेही याविषयी आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस कन्नड ध्वजाचा प्रश्न सोडवू देणार नाही, याचे हे आणखी एक उदाहरण आहे. प्रथम ते झेंडा बदलण्यासाठी गेले. आता त्यांनी झेंड्यावर राहुल गांधींचे चित्र वापरले आहे. काँग्रेस कन्नड लोकांचा द्वेष का करते, असा सवालही कर्नाटक भाजपने केला आहे. आधी कंटेनरवरून वाद आणि आता कन्नड लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप, यामुळे ही यात्रा भारत जोडण्यासाठी आहे की तोडण्यासाठी, असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. आधीच तिरंगा ध्वजावर पंजा असताना कर्नाटकच्या ध्वजावर राहुल यांच्या फोटोचा अट्टहास कशासाठी..
 
महामहिमांचा अपमान कुठवर?
 
 
राष्ट्रपती पदाची निवडणूक संपली आणि ‘रालोआ’च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी भरघोस मतांनी विजय प्राप्त केला. परंतु, अजूनही काँग्रेसजनांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयीचा राग आणि द्वेष गेलेला नाही. काँग्रेसचे माजी खासदार उदित राज यांनी नुकताच राष्ट्रपतींचा उल्लेख ‘चमचेगिरी’ असा केला. उदित राज यांच्या अशा खालच्या पातळीवर केलेल्या टिकेने त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका सुरू झाली आहे. यासंदर्भात राष्ट्रीय महिला आयोगानेही तत्काळ दखल घेत त्यांना नोटीस बजावली आहे. दरम्यान, गुजरातमधील एका कार्यक्रमात महामहिम राष्ट्रपतींनी देशातील 70 टक्के मीठाचे उत्पादन गुजरातमध्ये होत असल्याचे सांगत संपूर्ण देश गुजरातचे मीठ खातो, असे एकप्रकारे बोलता येईल, असे म्हटले. परंतु, मुर्मू यांच्या या वक्तव्याचा उदित यांना काय राग आला देव जाणे आणि त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली भडास काढण्यात धन्यता मानली.
 
 
 
आपल्या ट्विटमध्ये त्यांनी, देशाला द्रौपदी मुर्मू यांच्यासारखे राष्ट्रपती कधीही मिळू नयेत. चमचेगिरी करायची हद्द असते. त्या म्हणतात की, 70 टक्के मीठ गुजरातमध्ये उत्पादित होते. संपूर्ण देश गुजरातचे मीठ खातो. पण, त्यांनी स्वतः कमावून मीठ खाल्ले म्हणजे त्यांना समजेल, अशी अभद्र भाषा वापरली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविरोधात अभद्र टिप्पणी करण्याची काँग्रेस नेत्यांची ही काही पहिलीच वेळ नव्हती. त्याआधी काँग्रेसचे लोकसभेतील गट नेते खा. अधीर रंजन चौधरी यांनीदेखील मुर्मू यांचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ असा केला होता. पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी अशी आपत्तीजनक भाषा वापरून उत्तर दिले होते. त्यावरून वाद झाल्यानंतर त्यांनी सारवासारव केली खरी परंतु, त्यातून काँग्रेसचे खरे चरित्र समोर आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी ‘चहावाला’ म्हणून हिणवले होते.
 
 
परंतु, पंतप्रधान मोदींनी दणदणीत विजय मिळवून एक चहावालाही देशाचा पंतप्रधान होऊ शकतो हे दाखवून दिले. त्यामुळे आपल्या स्वकर्तृत्वावर सर्वोच्च स्थानी गेल्यानंतर काँग्रेसला ती गोष्ट पचवणे अवघड होते, हे इतिहास सांगतो. आधीच काँग्रेस रसातळाला गेल्यानंतर अशा वक्तव्यांनी काँग्रेस नक्की वर येणार की बुडणार, हे वेगळे सांगायला नको. ‘भारत जोडो’चा ड्रामा रचला जात असताना देशाच्या पहिल्या वनवासी राष्ट्रपती ठरलेल्या मुर्मू यांना असे हिणवणे कितपत योग्य आहे, असा प्रश्नही उभा ठाकतो.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.