सप्तश्रृंगीला मूळ रूपात आणणार्‍या स्मिता कासार-पाटील

    05-Oct-2022   
Total Views |
navdurga
 
 
 
 
घरातून शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाल्याने त्यांनी वास्तुविशारदासारखी एक वेगळी वाट निवडली. लग्नानंतरही त्यांनी शिक्षण सोडले नाही.एकीकडे प्राध्यापिका, स्वतःची कंपनी आणि दुसरीकडे घरसंसार, अशी तारेवरची कसरत करून त्यांनी वास्तुविशारदाच्या विश्वात आपली स्वतंत्र छाप पाडली. स्वा. सावरकर वाडा, सुंदरनारायण मंदिर, सरकारवाडा याबरोबरच नुकतेच सप्तश्रृंगी मातेचे शेकडो वर्षांपूर्वीचे मूळ रूप समोर आणण्यातही त्यांचा मोलाचा वाटा आहे. जाणून घेऊया नाशिकच्या प्रसिद्ध वास्तुविशारद स्मिता कासार-पाटील यांच्याविषयी...
 
 
नाशिक शहरात 1978 साली जन्मलेल्या स्मिता योगेश कासार-पाटील यांना त्यांचे आजोबा अ‍ॅड. नामदेवराव गीते यांच्यामुळे वाचनाची आवड निर्माण झाली. स्मिता यांनी पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण अभिनव बाल विकास मंदिर शाळेत, तर पुढे मराठा हायस्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पाचवीपासून त्यांनी अभ्यासासोबतच ‘हॉकी’चाही सराव सुरू केला. बारावीपर्यंत त्या ‘हॉकी’मध्ये राज्यस्तरावर खेळत होत्या. त्याचप्रमाणे, चित्रकलेची आवडदेखील त्यांच्यात निर्माण झाली. बारावीला असताना तर आजारपण मागे लागले.
 
 
‘बीसीएस’ला प्रवेश घेण्यासाठी वडिलांसोबत गेलेल्या स्मिता यांनी अचानक प्रवेश घेण्यास नकार देत वास्तुविशारदसाठी प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. परंतु, तांत्रिक चुकांमुळे त्यांना अखेर अहमदनगरच्या लोणी येथील ’प्रवरा रुरल कॉलेज ऑफ आर्किटेक्ट’ या महाविद्यालयात प्रवेश मिळाला. परंतु, तब्येतीच्या कारणास्तव वडिलांनी जाण्यासाठी नकार दिला. नंतर, आजीकडे हट्ट केल्यानंतर वडिलांनी होकार दिला. पहिलीच बॅच असल्याने सगळ्यांसाठी अभ्यासक्रम नवा होता. अभ्यासासाठी अनेक गोष्टी मिळत नसल्याने त्यांना मोठी धडपड करावी लागे. अनेकदा वर्गातील सगळेजण एकत्र अभ्यास करत. सहा महिन्यांच्या ‘इंटर्नशिप’च्या माध्यमातून त्यांनी 1999 साली बडोद्यात मीनाक्षी जैन यांच्याकडे वास्तुविशारदातील अनेक तपशील, छोट्या छोट्या गोष्टी शिकून घेतल्या. पाच वर्षानंतर म्हणजेच 2001 साली शिक्षण पूर्ण करून त्या घरी परतल्या.
 
 
पुढे ‘एम.आर्क’साठी प्रवेश घेण्याची त्यांची इच्छा होती. परंतु, घरी परतताच वडिलांनी नोकरी शोधण्यास सांगितले. एकदा त्यांचे म्हणणे ऐकल्याने स्मिता यांनी यावेळी वडिलांचे ऐकले. काही दिवस ‘ऑटोकॅड’चा सराव करून त्यांनी ‘देवरे-धामणे आर्किटेक्ट’ याठिकाणी नोकरी सुरू केली. 2002 साली त्या अभियंते योगेश कासार- पाटील यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. एकदा त्यांना गावठाणमधील छोटेसे काम मिळाले. स्मिता यांनी काम करताना केलेल्या सूचनेला आधी होकार मिळाला नाही परंतु नंतर त्यानुसार खोदकाम केल्यानंतर त्याठिकाणी चक्क 200 सोन्याची नाणी आणि दागिने सापडले. नंतर हे सोने सरकारजमा करण्यात आले. विशेष म्हणजे, पहिलेच काम करताना असा शुभशकुन झाल्याने त्याचा त्यांना आनंद झाला.
 
 
यानंतर त्यांनी स्वतःचे असे काही करावे, या उद्देशाने 2003 साली पतीच्या सहकार्याने ‘अजिंक्यतारा कन्सल्टन्सी’ची सुरूवात केली. 2005 साली ‘मविप्र’ समाज संस्थेच्या वास्तुशास्त्र महाविद्यालयात ‘बॅचलर ऑफ डिझायनिंग’ अभ्यासक्रमासाठी त्या प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. सकाळी 8 ते 2.30 वाजेपर्यंत अध्यापन आणि पुढे आपले स्वतःचे कार्यालय सांभाळणे आणि नंतर घर असा दिनक्रम सुरू झाला. सासूबाईंनी तीन नातू झाल्यानंतर पीएच.डी मिळवली होती. त्यामुळे शिक्षणासाठी घरातूनही संपूर्ण पाठिंबा होता. पुढे ‘एम. आर्क’साठी त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून प्रवेश घेतला.
 
 
मुक्त विद्यापीठाचे पुणे केंद्र असल्याने त्या शनिवारी आणि रविवारी एसटीने पुण्याला शिकायला जात. मुलगा लहान असल्याने त्यांची खूप दगदग होत होती. त्यामुळे त्यांनी मुक्त विद्यापीठाचे केंद्र मुंबईला बदलून घेतले. त्यावेळी त्या शनिवारी नाशिकहून रेल्वेने मुंबईला शिकायला येत असत. 2010 साली त्यांनी ’एम.आर्क’ ही पदव्युत्तर पदवी मिळवली. स्मिता यांचे काम पाहून कोकण कृषी विद्यापीठाच्या आर्किटेक्टच्या पॅनेलवर त्यांची निवड झाली. मीनाक्षी जैन यांच्याकडून धडे घेतल्याने त्यांचा गडकिल्ले, मंदिरे संवर्धनाच्या कामांकडे ओढा वाढला.
 
 
2011 साली त्या ‘इंडियन ग्रीन बिल्डींग कौन्सिल’ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि त्या पर्यावरणपूरक प्रकल्पांवर काम करण्यासाठी पात्र ठरल्या. 2012 साली महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाच्या पॅनेलवर त्यांची नियुक्ती झाली. यानंतर त्यांच्या ‘अजिंक्यतारा कन्सल्टन्सी’ला नाशिकमधील ऐतिहासिक सुंदरनारायण मंदिर, सरकारवाडा आणि स्वा. सावरकरांचे जन्मस्थान असलेल्या भगूर येथील सावरकरवाड्याचे काम मिळाले. सुरूवातीला हे काम करताना त्यांना अनेक अडचणी आल्या. तांत्रिक गोष्टींमध्ये त्यांना अनेक अडथळ येत. सरकारवाड्याचा प्रकल्प तीन वेळा रद्द होऊनही त्यांनी हार न मानता तो प्रकल्प मिळवलाच. घर सांभाळत असताना स्मिता एकटी एवढा भार सांभाळू शकत नाही, असे लक्षात आल्यानंतर त्यांच्या पतीने त्यांना मदत करण्यास सुरूवात केली.
 
 
ऐतिहासिक स्थळांचे काम करत असताना नवीन काहीही करता येत नाही. ज्या गोष्टी आहेत, त्या तशाच ठेवाव्या लागतात. सावरकरवाड्याचे काम करताना नळीचे कौल मिळवण्यासह अनेक गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागले. सावरकरवाडा जसा आहे, तसाच दिसेल या पद्धतीने स्मिता यांनी काम केले आणि त्यात त्या यशस्वीदेखील झाल्या. शिरगाव किल्ल्याचा प्लान, तर त्यांनी अवघ्या तीन-चार दिवसांत तयार केला होता. वसई-विरार मनपासाठी त्यांनी पाच तलावांची कामे केली. ‘मॉडेल अ‍ॅग्रो टुरिझम’च्या मॉडेलचेही त्यांनी काम केले. यशवंतगड, खर्डा, उंदेरी, बाणकोट, अंकाई-टंकाई, साल्हेर या किल्ल्यांच्या संवर्धनाचे कामही त्यांनी केले.
 
 
हळूहळू ‘अजिंक्यतारा कन्सल्टन्सी’ ऐतिहासिक स्थळांच्या पुनर्निर्माण आणि संवर्धनासाठी प्रसिद्ध होऊ लागली. बीडमधील कंकालेश्वर मंदिराच्या विकासाचे कामही त्यांना मिळाले. विशेष म्हणजे, दिवंगत विनायक मेटे यांनी त्यांना याकामासाठी स्वतः फोन केला होता.2015 ते 2017 पर्यंत त्यांनी त्यांच्या पतीसह सोलापूर विद्यापीठातून पुरातत्त्व शास्त्राचे शिक्षण घेतले. 2017 साली डेक्कन कॉलेजमधून त्यांनी एक वर्षाचा अभ्यासक्रम केला. कोरोना काळात त्यांनी प्रेझेंटेशन बनवणे, अभ्यास करणे अशी अनेक कामे केली.
 
 
घरातील अनेकजण कोरोनाच्या सावटातून सुखरूप बाहेर पडले. ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत त्यांनी सटाणा, भुसावळ आणि पनवेल याठिकाणी भुयारी गटार योजनेचे काम केले. दरम्यान, सप्तश्रृंगी देवीच्या मंदिराचे पुनर्निमाण, विकासात्मक कामे आणि मूर्तीचा शेंदूर काढण्याच्या कामाची निविदा निघाली होती. त्यामुळे हे पुण्याचे काम मिळवण्यासाठी स्मिता यांनी प्रयत्न केले. याआधी असे काम न केल्याने त्यांच्यासाठी हे एक मोठे आव्हान होते. डेक्कन महाविद्यालयात शिकवणार्‍या मॅनेजर सिंग सरांची मदत त्यांना झाली. मंदिर 45 दिवस बंद राहणार होते. या वेळेत त्यांना हे काम पूर्ण करायचे होते. याच काळात ढगफुटीसदृश्य पावसाने अधिक अडथळे आणले. थोडीशी चूक न परवडणारी होती. कारण हा विषय थेट भक्तांशी जोडलेला होता. वाराणसीच्या पुरोहित संघाचेही मार्गदर्शन घेण्यात आले. शेकडो वर्षांपूर्वीचा शेंदूर काढल्याने देवीचे रूपडेच पालटले.
 
 
जी कलाकृती आहे ती तशीच ठेवून ती फक्त सुस्थितीत कशी ठेवता येईल, यासाठी वास्तुविशारदाला प्रयत्न करावे लागतात. सप्तश्रृंगी मंदिराच्या कामामुळे एक ऊर्जा मिळाली. देवीचे मूळ रूप भाविकांसमोर आणण्यामध्ये आपला खारीचा वाटा असल्याचे समाधान वाटत असल्याचे स्मिता सांगतात. प्रत्येक वेळी आई विजया आणि वडिल शंकरराव, पती योगेश, सासू डॉ. मिता, सासरे निवृत्ती कासार यांसह माया पाटील यांचेही त्यांना सहकार्य मिळते. त्यांनी वैचारिक स्वातंत्र्य दिले आणि काटकसरीची शिकवण दिली. काम, शिक्षणामुळे मुलांना जास्त वेळ न देऊ शकल्याचे शल्य वाटते. तसेच, “घरात स्त्री शिक्षित असेल, तर तिच्या सात पिढ्या शिक्षित होतात. त्यामुळे तिने शिकले पाहिजे,” असेही त्या सांगतात.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.