बारिश की जाये...

    05-Oct-2022   
Total Views |
NCP
 
 
 
येरे येरे पावसा तुला देतो पैसा’पासून गेल्या वर्षांपर्यंतचे ‘मेरा यार हस राहा हैं बारिश की जाये...’ अशी पावसाबद्दलची सगळी गाणी कविता आपण ऐकत आलो आहोत. देशाच्या राजकारणात मात्र पावसाबद्दलच्या संवेदना अगदी समसमान आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणू नका, शिवसेना म्हणू नका की, अगदी काँग्रेस पक्ष म्हणू नका, राजकीय पक्षातील नेत्यांना पाऊस यावासा वाटतो, असेच दिसते. मागच्या निवडणुकीत ज्यांना खरंच आरामाची गरज आहे, असे वयोवृद्ध शरद पवार यांनी पावसात भिजत भिजत भाषण केले.
कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ व्हावी, तसेचझाले. त्यानंतर कुठच्या तरी कोपर्‍यात गेलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष थोडा वर तरला. त्यानंतर मग काही विचारता सोय नाही. जो तो राजकीय नेता पावसात भिजून भाषण करू लागला. आता या वर्गवारीत राहुल गांधी यांनीही वर्णी लावली आहे. तोच तो एकसारखा सगळ्यांचा फोटो... पाऊस धिंगाणा घालतोय, लोक हैराण आहेत. पण, नेते पावसात चिंब भिजून कडक भाषण करत आहेत. नेत्यांना वाटत राहते की, ते पावसात भिजले की, लोकांना त्यांच्याबद्दल प्रेम आणि आपुलकी वाटते. मग त्यांचा जनाधार वाढतो. खरेच हे खरे आहे का? मुळात पाऊस आल्यावर त्यापासून वाचण्यासाठी स्वतःसकट उपस्थित सर्वच श्रोत्यांना छत्री उपलब्ध करून द्यायची आर्थिक कुवत या नेत्यांमध्ये असते.
किती जणांना छत्री देणार, हा प्रश्न असेल तर सभेच्या ठिकाणी ताडपत्री लावण्याचे नियोजनही हे नेते किंवा त्यांच्या सभेचे आयोजक करू शकतात. पण, काय करावे? पावसात भिजून भाषण केले नाही तर नेतेपद मिळणार नाही, अशी अंधश्रद्धा नेत्यांमध्ये पसरली आहे. दुसरीकडे पावसात भिजून भाषण ऐकण्यात उपस्थित श्रोत्यांना खूप चांगले वाटत असेल का? शक्यच नाही. अर्थात, एखाद् दुसरा निवडणूक तिकिट इच्छुकाला पावसात भिजून नेत्याचे भाषण तल्लीन होऊन ऐकतोय, असे नाटक करावेच लागते. पण, बाकीच्यांचे काय? नेते पावसात भिजून भाषण करतात. नंतर त्यांच्या अलिशान गाडीत बसून उबदार घरात आराम करतात. पण, त्या पावसात भिजणार्‍या कार्यकर्त्यांचे काय? पावसात भिजून भाषण करणे आणि तो फोटो पराक्रम म्हणून मिरवणे, हेच नेत्यांचे इतिकर्तव्य असेल, तर मग आपण तरी काय करणार? इतकेच म्हणू नेता भाषण कर रहा हैं, बारिश की जाये...
 
वांगी की आलू? गहन प्रश्न!
 
कृषी कायद्याबद्दल एकदाही मोदी शेतकर्‍यांशी बोलले नाहीत. शेतकर्‍यांचे नुकसान व्हावे म्हणूनच मोदींनी नायजेरियामधून चित्ते आणले. त्यामुळेच भारतात ‘लम्पी’ व्हायरस पसरला.” महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अशा पाट्या टाकल्या आहेत. अर्थात ‘उचलली जिभ लावली टाळ्याला’ अशी नानांची ख्यातीच! बरं आपण काय बोलतो, याबाबत जराही अभ्यास नाना करत नसावेत, नव्हे करतच नाहीत. त्यामुळेच मोदींनी चित्ते नायजेरियामधून नाही, तर नामिबिया या देशातून आणले, हेसुद्धा त्यांना माहिती नाही.
काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाच्या महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याच्या अध्यक्षाला वर्तमानकाळातील सामान्य ज्ञान अजिबात नाही, हेच यातून प्रतित होते. नाना असे का करत असतील? याचे उत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. असे काहीही बोलले की, प्रसारमाध्यमांत त्याची भरपूर चर्चा होते. त्यामुळे नाना असे बोलतात. ‘बदनाम हुये तो क्या नाम तो हुआ’ असे नानांचे प्रकरण आहे. पण, तसे पाहिले, तर यातला एक आयाम असा आहे की, भारतीय लोक भोळे आहेत. अगदी खोट्या बातम्यांनाही खरे मानणारे आपल्या इथे कमी नाहीत. खेडेगावातल्या शेतकर्‍यांपर्यंत नानांचे म्हणणे पोहोचले, तर या मुर्खतापूर्ण विधानाचे खंडन करणारी विधाने पुन्हा या शेतकर्‍यांपर्यंत पोहोचतीलच, असे नाही.
दुसरे असे की, सध्या काँग्रेसमध्ये राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. नाना पटोले या निवडणुकीत दूरदूरपर्यंत कुठेही नाहीत. नानांना माहिती आहे की, मोदींबद्दल बोलले की प्रसिद्धी मिळते. त्यामुळे मागेसुद्धा नाना मोदींबद्दल असेच काहीसे बरळले होते आणि मग स्वतःच्याच विधानांचा वेगळाच अर्थ त्यांनी लावला होता. ‘मी मोदींना मारू शकतो,’ अशी उद्दाम भाषा केली होती. या विधानावरून वातावरण पेटले तेव्हा मग नाना म्हणाले की, “ते गावच्या गुंडाबद्दल बोललो होतो, पंतप्रधान मोदींबद्दल नाही.” तर असे हे नाना! जिभेत काँग्रेसी गवतासारखी निरूपयोगी ताकद. पण, डोक्यात बुद्धी असणेही गरजेचे ना? तिथे सुप्रियाताईंच्या शेतातले एक कोटी रुपयांचे उत्पन्न देणारी वांगी भरलीत की राहुल गांधींच्या आलूपासून सोना बनवण्यातलेे जे आलू आहेत ते भरले, ते नाना जाणोत आणि त्यांची काँग्रेस हायकमांड... वांगी की आलू गहन प्रश्न!!
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.