मुख्यमंत्री येणार माहिती असूनही पालिकेकडून रस्त्याची सफाई नाहीच?

    05-Oct-2022
Total Views |

goregaon
 
 
मुंबई  : मुंबईमध्ये सर्वत्र स्वच्छता राखण्यात येत असल्याचा दावा मुंबई महानगरपालिका वरचेवर करत असते. मात्र मुंबईच्या रस्त्यांवर पसरलेल्या अस्वच्छतेकडे पाहिल्यावर या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे याची सत्यता पटते. मात्र ही अस्वच्छता केवळ मुंबईच्या रस्त्यांवर नाही तर मुंबईतील पदपथांवर देखील पाहण्यास मिळते. गोरेगाव येथील फिल्मसिटी मार्गावर देखील असाच काहीसा प्रत्यय आला आहे.
 
 
गोरेगाव मधील फिल्मसिटी मार्गावर असणाऱ्या पदपथावर कचऱ्याचा अक्षरशः ढीग झाला असून मागील अनेक काळापासून मुंबई महापालिकेने येथे लक्ष दिले नसल्याचा दावा येथील स्थानिकांनी केला आहे. तसेच या रस्त्यावर दुतर्फा गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर पार्किंग केल्याचेही दिसून येते. विशेष म्हणजे आज याच परिसरात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवीचे दर्शन घेण्यास येणार आहेत. मात्र तरीही मुंबई महापालिकेने कोणतीच कारवाई केली नाही, असे सांगत राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबतही मुंबई महापालिकेला काही वाटत नाही का? असा प्रश्नही स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
 
 
तसेच या अस्वच्छतेसंदर्भात अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र मुंबई महापालिकेने कोटींचं कारवाई केलेली नाही. फर्निचर, खुर्च्या, टेबल अशा अनेक गोष्टींचे अवशेष देखील येथे पडलेले असतात. हे पदपथ कचऱ्यासाठी पालिकेने उपलब्ध केले आहे का? असाही प्रश्न येथील स्थानिकांनी उपस्थित केला आहे. तसेच लवकरात लवकर यासंदर्भात पालिकेने पाऊल उचलावे अशी मागणी करत आज मुख्यमंत्र्यांना देखील यासंदर्भात निवेदन देणार असल्याचेही स्थानिकांनी म्हटले आहे.
 
- शेफाली ढवण