रुतलेल्या अर्थचक्राचे प्रगतीकडे सीमोल्लंघन

    05-Oct-2022   
Total Views |
indian economy
 
 
 
जगातील सर्वच प्रमुख अर्थव्यवस्था अनेक अडथळ्यांना सामोरे जात असताना, भारतीय अर्थव्यवस्था मात्र वेगाने प्रगतीकडे वाटचाल करत आहे. दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाच्या संकटाचे काळे ढग बाजूला सारून आता प्रगतीच्या नव्या पहाटेकडे भारतीय अर्थव्यवस्था जात आहे. या प्रगतीची नांदीच जणू सातत्याने वाढणाऱ्या जीएसटी संकलनाने केली आहे. गृहनिर्माण, पर्यटन, सोने खरेदी, करसंकलन, वाहनखरेदी यांसारख्या सर्वच महत्वाच्या क्षेत्रांनी वाढ नोंदवण्यास सुरुवात केली आहे. महागाईने अर्थव्यवस्थेची चिंता थोडीशी वाढवली जरी असली तरी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दावा केल्याप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्था याही संकटाचा समान करेल आणि सहीसलामत बाहेर पडेल. या प्रगतीचे सीमोल्लंघन या दसऱ्याला होणार हे निश्चित.
 
गृहखरेदी
 
देशातील सर्वात जास्त रोजगार निर्माण करणारे क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे बांधकाम क्षेत्र कोरोनाच्या तडाख्याने पूर्णपणे कोलमडले होते. पतपुरवठा, कामगारांची उपलब्धता या सर्वांवरच मोठा परिणाम झाल्याने बरेच मोठे प्रकल्प रखडले होते. कोरोना निर्बंधांच्या शिथिलीकरणानंतर सरकारकडून दिल्या गेलेल्या सवलतींमुळे लोकांचा घरे खरेदी करण्याकडे कल वाढतोय. विकासकांकडूनही ग्राहकाभिमुख प्रकल्प निर्मितीकडे तसेच किंमतीही आटोक्यात राहतील याची काळजी घेतली जात असल्याने मोठ्या प्रमाणावर लोक घर खरेदीकडे वळत आहेत. या क्षेत्रात उत्साहाचे आणि आशादायी चित्र तयार झाले आहे. दसऱ्याचा मुहूर्त साधण्यासाठी एकट्या मुंबईत ८६०० घरांच्या विक्रीची नोंद झाली आहे. "सरकारने दिलेल्या सवलती आणि बांधकाम व्यावसायिकांनी ठेवलेले ग्राहकाभिमुख धोरण यांमुळे यंदा भरघोस विक्री होणार आहे, ग्राहकांचा असाच असा प्रतिसाद कायम राहिल्यास लवकरच हे क्षेत्र कोरोनापूर्व स्थिती जाईल" असा विश्वास या क्षेत्रातील तरुण उद्योजक आणि ठेका कॉर्पोरेशनचे प्रसाद वाकोडे यांनी व्यक्त केला आहे.
 
पर्यटन
कोरोना काळाचा फटका बसलेले दुसरे महत्वाचे क्षेत्र म्हणजे पर्यटन. कोरोनाचा फटका एवढा जबरदस्त होता की या क्षेत्रातील कित्येक कित्येक उदयोग बंदच पडले होते. पण याच्या बरोबर उलटी स्थिती कोरोना निर्बंध शिथिलीकरण झाल्यावर झाली. लोकांचा ओघ प्रचंड वाढायला लागला. नवरात्री, दिवाळी या पर्यटकांच्या हक्काच्या दिवसांबरोबरच पर्यटकांची नवीन वर्षासाठीही आता पासूनच तयारी सुरु झाली आहे. कित्येक ठिकाणची बुकिंग्स फुल्ल झाली आहेत. या सर्व सकारात्मक गोष्टीच आहेत या बरोबरीने अजून एक नवा ट्रेंड दिसून येतो आहे तो म्हणजे पर्यटकांकडून भारताच्या वारसास्थळांना जास्त पसंती मिळत आहे. "साधारणतः २०० टक्क्यांहून अधिक बुकिंग्स सध्या झाली आहेत, कित्येक ठिकाणी तर बुकिंग्स तर आता आम्हांला बंद करावी लागत आहेत, हा प्रतिसाद बघता आम्ही आताच नवीन वर्षाच्या बुकिंग्सची तयारी करत आहोत, कोरोना काळात जेवढे नुकसान झाले होते ते अवघ्या एकाच वर्षात बरेचसे भरून निघाले आहे" अशी प्रतिक्रिया पुण्यातील गॅलवन्ट टूर्सच्या निशिकांत यांनी दिली आहे.
  
ऑटोमोबाईल
 
तब्बल ११ टक्क्यांच्या वाढीसह भारतातील वाहननिर्मिती क्षेत्र झपाट्याने पूर्वपदावर येत आहे. दुचाकी, प्रवासी गाड्या यांच्या खरेदीत विक्रमी वाढ होत आहे. पेट्रोल - डिझेलचे चढे भाव लवकरच आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत असल्याने ग्राहकांचा उत्साह वाढतोच आहे. खनिज तेलांच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीच्या प्रभावापासून भारतीय अर्थव्यवस्था मुक्त राहील यासाठी भारत सरकार करत असलेल्या प्रयत्नांना आता यश मिळत आहे. रशियाकडून स्वस्त तेल खरेदीला मंजुरी मिळाली आहे. यासर्वच गोष्टींचा परिणाम म्हणून वाहनखरेदीकडे ग्राहकांचा कल वाढतोय. २०१९च्या सप्टेंबर महिन्यातील वाहन खरेदीशी तुलना करता यंदाची खरेदी ही ४ टक्क्यांनी कमीच आहे पण ग्राहकांचा हाच कल कायम राहिला तर लवकरच हे क्षेत्र कोरोनापूर्व स्थितीत पोहोचेल असा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे.
  
सोने
सोनेखरेदी हा कायमच भारतीयांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. सणासुदीला सर्वच शहरांमध्ये सोने - चांदी खरेदीची लगबग सुरु होते. यंदाही सोन्याच्या मागणीत वाढच बघायला मिळत आहे. एकाच दिवसात तब्बल ५५० रुपायांनीं किंमती वाढून तोळ्यामागे ५१ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. चांदीच्या किमतींही किलोमागे ६१,८०० रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. यांमुळे ग्राहकांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या वातावरणात सोन्यामधील गुंतवणूक ही अत्यंत किफायतशीर आणि सुरक्षित मानली जात आहे. त्यामुळेही सोनेखरेदीकडे ग्राहक वळत आहेत. एकूणच सोन्याला असलेली झळाळी कायमच राहिली आहे.
 
करसंकलन
देशाच्या जीएसटी करसंकलनात सातत्याने वाढ दिसत आहे. सलग सातव्या महिन्यात देशातील जीएसटी संकलनाने दीड लाखांचा टप्पा गाठला आहे. प्रत्यक्ष करसंकलनातही ३० टक्के वाढ झाली आहे. हे अतिशय आशादायी चित्र आहे. सर्वच क्षेत्रांमध्ये होत असलेल्या प्रगतीने ही वाढ होत आहे. या करसंकलनात वाढीचा हा ट्रेंड यापुढेही कायम राहणार आहे असाच तज्ज्ञांचा अंदाज आहे. हे करसंकलन भारतीय अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याची निदर्शक आहेत. भारतीय अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असली तरी एकच चिंतेची गोष्ट आहे तरी म्हणजे वाढती महागाई. "भारतातही महागाईचा दर वाढतोच आहे पण या सर्वांना मोठ्या प्रमाणावर जागतिक घडामोडी जबाबदार आहेत, हा धोका लवकरच कमी होईल आणि सगळी स्थिती पूर्वपदावर येईल" अशी प्रतिक्रिया करसल्लागार आणि सनदी लेखापाल केतन जोगळेकर यांनी नोंदवले आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

हर्षद वैद्य

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये उपसंपादक (वेब आणि प्रिंट) म्हणून कार्यरत. रुईया महाविद्यालयातून गणित या विषयात पदवीचे शिक्षण घेतले. आर्थिक क्षेत्राशी संबंधित वृत्तांकन आणि लेखन. भारतीय संगीत, इतिहास या विषयांमध्ये विशेष रस. महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य. अर्थशास्त्र विषयात महाविद्यालयात संशोधन केले आहे. शैक्षणिक, सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्राचाही अनुभव.