सकारात्मकतेचे सीमोल्लंघन...

    04-Oct-2022
Total Views |
सकारात्मक
 
दसर्याचा मुहूर्त येतो आहे, सीमोल्लंघन तर करायचे आहे. अशावेळी आयुष्यातील यशासाठी स्वत:ला का तयार करू नये? सकारात्मक व्हा. कष्ट केल्याशिवाय स्वप्नांची पूर्तता होत नाही.
 
 
कधीकधी जीवनातील सर्वात मोठे धडे स्वीकारणे अत्यंत कठीण असते आणि तरीही आपल्याला ते स्वीकारले पाहिजेत. आपल्या दुःखाचे मूळ कारण, आपण आपल्या जीवनाच्या सर्व क्षेत्रांत, आयुष्यातील सत्याला नाकारत असतो, हे आहे. कारण, सत्याचा स्वीकार करण्याचे हे असे धडे आहेत, जे शेवटी आपले जीवन सुंदर बनवतात. अगदी कठीण काळातही कसे भरभराट करायचे, हे दाखवून देतात.
 
 
आनंदाची सुरुवात नाते, सुट्टी, नोकरी, चंगळ किंवा पैशाने होत नाही. याची सुरुवात तुमच्या विचारसरणीपासून होते आणि ‘तुम्ही दररोज स्वतःला काय सांगत आहात, हे महत्त्वाचे असते. सामान्यतः जेव्हा मी एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला तुम्ही कसे आहात, हा प्रश्न विचारते, तेव्हा ते सर्वसामान्य उत्तर देतात की, “मी ठीक आहे.” पण, कोणी आपल्याला असे उत्तर दिले की, “अरे, मी अगदी खूप आनंदात आहे.” तेव्हा हा उत्साही प्रतिसाद आपल्यालाही आश्चर्यचकित करतो. माझ्या एका मैत्रिणीला अशा उत्तरानंतर मी विचारले की, “तिला इतके प्रसन्न का वाटते?” ती म्हणाली, “मी निरोगी आहे. माझा मुलगा आणि मुलगी दोघेही निरोगी आहेत आणि आम्हा सर्वांना स्वच्छ पाणी, अन्न, निवारा आणि बरेच काही उपलब्ध आहे.
 
 
त्यामुळे माझ्याकडे प्रसन्न न होण्याचे काहीच योग्य कारण नाही.” या उत्तरानंतर माझ्या लक्षात आले की, हे सगळे बर्याच लोकांकडे असले, तरी सगळे आनंदी असत नाहीत. असे का? फरक होताच तो फक्त तिची वृत्ती आणि तिची ती व्यक्त करायचे शब्द. इतरांपेक्षा तिच्याकडे स्वर्गीय सुख नक्कीच नव्हते, पण ती खूप आनंदी आणि समाधानी दिसत होती.
मला शंका वाटते की, आपल्यापैकी बर्याच जणांसाठी आपण जीवनात सुरुवातीपासून अनुभवलेला निखळ आणि निरागस आनंद आणि नंतर मोठे झाल्यावर येणार्या अनेक जबाबदार्यांचा गंभीर स्वीकार यांच्यामध्ये कधीतरी आपण एका अजाणतेपणाने आणि सुप्त मानसिकतेने गुरफटत जातो. त्यामुळे आपल्या अनेक नकारात्मक आत्मसंवादाला आपोआप उत्तेजन मिळते.
 
 
तुमच्या सामान्य दिवसाबद्दल तुम्ही कसे व्यक्त करू शकता, याचा जरा विचार करून पाहा. समजा, तुमच्याकडे रोजच्या कामाची यादी आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमचे काम करत आहात. अशावेळी एखादा मित्र किंवा सहकारी तुम्हाला विचारतो की, “तुम्ही दिवसभरात काय करत आहात?” साहजिकच तुम्ही सहज उत्तर द्याल, “अगं, मला या कामाच्या ई-मेलला प्रतिसाद द्यावा लागेल आणि मला माझ्या नवीन क्लाएंटच्या ऑफिसला भेट द्यावी लागेल आणि मला माझ्या कामानंतर मुलीच्या गाण्याच्या क्लासला जावं लागेल. नंतर घरासाठी लागणार्या आठवड्याभरच्या भाज्या खरेदी करायला लागतील वगैरे...”
 
 
अशाप्रकारे तुमच्या जबाबदार्यांबद्दल असे बोलण्याने, त्या आपल्या अंगावर पडल्यासारखे वाटते. त्या तुम्हाला जबदस्तीने करणे भाग पडते. या सर्व गोष्टी करायला हव्यातच, कराव्या लागणारच आहेत. असे काहीतरी अवघड, बोजड मनात वाटायला लागते.
पण, जर तुम्ही तुमची ही सगळी उत्तरे फक्त ‘मला करायचे आहे’ वरून ‘मी करणार आहे’मध्ये बदलली तर? हा फक्त शब्दांचा फरक आहे, जो मुख्यत्वेकरून तुम्ही कसे विचार करता आणि नंतर तुम्हाला कसे वाटते आणि वागता, यात मोठा बदल करू शकतो. एकदा असा प्रयत्न करून पाहा.
 
 
कारण, सत्य हे आहे की, जर एखादी गोष्ट तुम्हाला खरंच आवडत नसेल, तर तुम्ही ती बदलू शकता का, हा महत्त्वाचा प्रश्न किंवा किंवा त्या गोष्टीबद्दल बद्दल विचार करण्याची तुमची पद्धत तुम्ही बदलू शकता का, हा विचार निर्णायक ठरतो. बहुतेकदा परिस्थिती बदलता येत नाही, तरी त्याबद्दल विचार करण्याची तुमची पद्धत बदलता येणे, सर्वोत्तम असे व्यावहारिक पाऊल असते. प्रत्येक दिवशी खरी लढाई तर तुमच्या मनात होत असते. जर तुम्ही तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत पराभूत होत असाल, तर तुम्ही आधीच हरलेले असता.
 
 
तुम्हाला आयुष्यात एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल, तर ती मिळवण्यासाठी लागणारे कष्टही तुम्हालाच घ्यावे लागणार आहेत. बहुतेक लोकांना जोखीम न घेता फायदा हवा असतो. पण, प्रवास केल्याशिवाय तुम्हाला तुमचे गंतव्यस्थान मिळू शकत नाही आणि आयुष्यातील प्रवासाला नेहमीच खर्च येतो. किमान, तुम्हाला तुमचा वेळ आणि शक्ती आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गुंतवावी लागतेच. म्हणून तुम्हाला काय हवे आहे, याचा विचार करण्याऐवजी, प्रथम स्वत:ला एक प्रश्न जरूर विचारायला हवा - मला जे हवे आहे ते मिळविण्यासाठी मी काय सोडण्यास तयार आहे? किंवा त्या अपरिहार्यपणे येणार्या कठीण दिवसांसाठी मी किती दुःख सोसणे योग्य आहे? याचा गांभीर्याने विचार करायला हवा.
 
 
जर तुम्ही स्वत:ला दिवसेंदिवस, वर्षानुवषे काहीतरी प्राप्त करायचे आहे, असे मनात बाळगून असाल, तरीही ते मिळविण्यासाठी लागणारे कष्ट तुम्ही कधीही करत नाही आणि त्यामुळे तुमची कधीही प्रगती होत नाही. याचा अर्थ कदाचित असा असू शकतो की, तुम्हाला ती गोष्ट खरोखर नको असेल. कारण, तुम्ही त्यासाठी दुःख झेलण्यास तयार नसता, ते साध्य करण्यासाठी लागणारे प्रयत्न आणि परिश्रम करायला तयार नसता. जर एखाद्या तरुण पुरुषाला पिळदार शरीर बनवायचे आहे किंवा आजच्या काळातील ‘सेक्सी अॅब्स’ हवे असतील, तर त्याला दुखलेले स्नायू, घामाने भिजलेले कपडे, सकाळी किंवा दुपारी व्यायाम आणि निरोगी जेवण हवे आहे.
 
 
जर तुम्हाला यशस्वी व्यवसाय करायचा असेल, तर तुम्हाला धकाधकीचे व्यावसायिक सौदे आणि निर्णय घेण्याची क्षमता असायला लागते आणि दीर्घकाळात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला काय अनुभव असणे आवश्यक आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेक वेळा अयशस्वी होण्याची शक्यतादेखील तितकीच महत्त्वाची आहे.
दसर्याचा मुहूर्त येतो आहे, सीमोल्लंघन तर करायचे आहे. अशावेळी आयुष्यातील यशासाठी स्वत:ला का तयार करू नये? सकारात्मक व्हा. कष्ट केल्याशिवाय स्वप्नांची पूर्तता होत नाही. लक्षात घ्या.
 
- “A dream does not become reality through magic. It takes sweat, determination and hard work.”
 
डॉ.शुभांगी पारकर