बीज अंकुरे अंकुरे

Total Views |
 Venus


गर्भधारणेसाठी उत्तम प्रतीचे शुक्र असणे गरजेचे असते. प्राकृत, अतिकृतशुक्र कसे असते, प्रजोत्पादानाव्यतिरिक्त त्याची मनुष्यदेहातील विविध कार्ये काय असतात, याबद्दल मागील लेखात आपण माहिती करुन घेतली. आजच्या लेखातून शुक्राची विकृती आणि त्याची विविध कारणे याबद्दल जाणून घेऊयात.


शुक्राणूचा आकार बघितल्यास त्याला एक अंडाकृती डोळा असतो व लांब शेपटी असते. शेपटीमुळे त्याला गती मिळते व डोक्यामुळे तो गर्भाशयात शिरकाव करु शकतो. अविकृत शुक्राणूचा आकार, गती ठरलेली असते. शुक्राणू शुक्रात असतात व शुक्रस्खल्लन होते तेव्हा शुक्राणू बाहेर पडतात. यासाठी शुक्रधातू हा द्रव स्वरुपात असतो. याची तरलतादेखील विशिष्ट घनतेचीअसणे अपेक्षित आहे. द्रवता खूप दाट किंवा खूप पातळ खाण्यासारखी नसावी.


शुक्राणूच्या विकृती या मुख्यत्वे करून दोन प्रकारच्या असू शकतात. आकारात्मक किंवा क्रियात्मक आकारातील विकृती. डोक्याच्या व शेपटीच्या दोन्हीच्या एकत्र किंवा भिन्न-भिन्न असू शकतात. विकृती कशी तर अंडाकृती डोक असण्याऐवजी गोलाकार, चपटे, विविध आकाराचे एकापेक्षा अधिक एकाच शेपटीला असलेले इ. प्रकाराचे असू शकते.

 
शुक्राणूच्या शेपटीची विकृती बघता ती खूप आखूड असणे, एकापेक्षा अधिक असणे इ. विकृती या स्वरुपात्मक आकृतीदृष्ट्या असतात. पण, ठरावीक गतीपेक्षा कमी गती शुक्राणू हे क्रियात्मकदृष्ट्या विकृत शुक्राणूचे लक्षण आहे. 100 टक्के शुक्राणू अविकृत असावेत, असे काही गरजेचे नसते. पण, किमान 60-70 टक्के शुक्राणू अविकृत (अ‍ॅनोटॉमिकली म्हणजेच स्वरुपात्मकदृष्ट्या) व (फिजिओलॉजिकली म्हणजेच क्रियात्मक दृष्ट्या) असावेत, तेव्हा प्रजोत्पादन होण्याची क्षमता राहते. वीर्यस्खलनातून दीड ते पाच मिली इतके शुक्र निष्कासित होते. प्रत्येक मिलीलीटरमध्ये 20 ते 150 दशलक्ष इतके शुक्राणू असतात. म्हणजेच, थोडक्यात असे म्हणता येईल की, किमान दशलक्ष शुक्राणू उत्तम प्रतीचे एका स्खलनातून जर स्त्री शरीरात प्रवेशित झाले, तर गर्भधारणा होणे शक्य आहे.



 Venus 3
 

 
शुक्रधातूची विकृती असल्यास हे शक्य होत नाही. शुक्रदुष्टीची चिकित्सा केल्यानंतर उत्तम शुक्राणू निर्माण होतात. शुक्रदुष्टीची काही महत्त्वाची कारणे आहेत. विषयुक्त रसायनांशी संपर्क, अंडकोषाची तापमानवृद्धी अनुवंशिकता, संक्रमण, काही विशिष्ट, जीर्ण व्याधींमध्ये शुक्राणूची उत्पत्ती कमी होते. विशेषत: स्थौल्य, मधुमेह इ. असंक्रामक या दोन्ही व्याधींमध्ये केवळ शुक्राणूंची मात्रा कमी होत नाही, तर वीर्याचेही प्रमाण कमी होते व त्यांची गतीदेखील मंदावते, तसेच काही व्यसनांमुळेदेखील शुक्राणूसंख्या व क्रिया बिघडते. वार्धक्यामध्ये शरीर जीर्ण होऊ लागले की, त्याचा परिणाम शुक्राणूंवरही होतो. शुक्राणूची गुणवत्ता कमी होेते. शुक्रधातू प्रत्येक मनुष्य शरीरात मरेपर्यंत उत्पन्न होत असला, तरी तो सार्ववैहिक धातू आहे. प्रजोत्पादनाचे कार्य करणारे त्यातील घटक कमकुवत होतात व गर्भधारणेची क्षमता कमी होते. यातील विकृतीची काही कारणे आपल्या आहार-विहार व सवयींमध्ये बदल केल्यास दूर करणे सोपे होते. त्यातील काही कारणांबद्दल आज सविस्तर बघूयात.


पुरुष शरीरातील अंडकोष हे शरीराबाहेर विशिष्ट ’सॅक’मध्ये स्थित असते. याचे मुख्य कारण म्हणजे शुक्राणूंना अतिउष्णता सहन होत नाही. आयुर्वेदाप्रमाणे शुक्रधातू हा सौम्य स्वरुपाचा आहे. त्याला अतिरिक्त उष्मा सहन होत नाही. शरीराच्या तापमानापेक्षा ही शुक्राणूंना कमी तापमान लागते व त्यामुळे त्यांची स्थिती शरीराबाहेर केली आहे. पण, काही विशिष्ट कपड्यांमुळे व व्यवसायांमुळे शुक्राणूंना अधिक उष्मा सोसावी लागते उदा. तंग, शरीराला चिकटून घट्ट आंतर व बाह्य कपडे घालणे, सिंथेटिक आतीलकपडे घालणे, जिन्स व अन्य घट्ट कपडे पेहराव घालणे इ. यामुळे अंडकोषाजवळील उष्मा वाढतो. शुक्राणूंना या वाढीव उष्णतेचात्रास होतो व त्यांची संख्या व क्रिया बिघडते. तसेच बाईकवर खूप लांब किंवा अतिकाळासाठी प्रवास केल्यानेही अंडकोष दबून शुक्राणूंवर त्याचा परिणाम होतो. यावर उपाय म्हणजे तंग कपडे घालू नयेत. आतील कपडे सूतीच असावते. ज्यांच्या शरीरात अधिक उष्णता भासते. त्यांनी थंड पाण्याने दिवसातून दोन वेळा अंघोळ करावी. उन्हातूनजाणे टाळावे, तसेच गरम-पित्तकारक आहार-विहार टाळावा. बाईकवरून अतिप्रवास टाळावा.

 
व्यसनाधिनता आणि शुक्राणूदुष्टी

 
तंबाखू व दारूचे सेवन याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. शाळकरी वयातूनच मित्रांच्या आग्रहाखातर किंवा ‘स्टंटबाजी’ म्हणून सुरू होणारी सवय कधी व्यसनात रूपांतरित होते, हे कळतदेखील नाही. मावा-तंबाखू-मशेरी-पानमसाला ते हुक्का-बिडी-सिगारेट-सिगार इ. स्वरूपातून तंबाखूचे सेवन केले जाते. ‘अ‍ॅक्टिव्ह स्मोकिंग’ने स्वत: बिडी/सिगारेट/सिगार/हुक्का इ.तून, ज्यातून धूर सोडला जातो, अशा पद्धतीने तर त्रास होतोच, पण, त्यांच्या आसपास वावरणार्‍यांना (पॅसिव्ह स्मोकिंग) देखील तंबाखूच्या धुराने होणार्‍या विपरित परिणामांना सामोरे जावे लागते. हल्ली पुरुषांबरोबर स्त्रियांचेही तंबाखू सेवनाचे, विशेषत: ‘स्मोकिंग’ करण्याचे प्रमाण अति वाढले आहे. या व्यसनांचा, सवयींचा परिणाम स्वत:च्या शरीराला तर होतोच, पण त्याचबरोबर प्रजोत्पादन क्षमताही कमी होते व गर्भात विकृती उत्पन्न होण्याची शक्यताही अधिक वाढते.

 
तंबाखूप्रमाणेच मद्यपानाचे बरेच दुष्परिणाम शरीरावर होतात. ‘स्मोकिंग’प्रमाणेच ‘अल्कोहोल’ सेवनाचे प्रमाणही झपाट्याने वाढताना दिसत आहे. लहान वयात पार्टी, ‘सोशल फंक्शन’मधून हळूहळू सुरू होते. ‘कॉकटेल’ किंवा कमी ‘अल्कोहोलिक’ पेयांपासून सुरु होऊन बरेचदा वाढता वाढता ते ‘हॅबिच्युअल ड्रिंकर’ कधी होतात, हे त्यांना स्वत:लाही कळत नाही. मद्यामुळे शुक्राणूंची तरलता कमी होते. त्यांची गती मंदावते व त्यांचे प्रमाणही घटते. म्हणजेच प्रजोत्पादनात अडथळा उत्पन्न होतो.



बरेचदा, आहार उत्तम, व्यायाम आणि आठवडाभर उत्तम दिनचर्या ‘फॉलो’ होते आणि ‘वीकेंड पार्टी’मध्ये सर्व जाते. म्हणजे पाच दिवसांत मिळवलेले फायदे दोन दिवसांत गमावले जातात. किमान र्‍हास अधिक होतो.


काही विशिष्ट व्यवसायांमध्ये, शुक्राणूदुष्टी होण्याची शक्यता अधिक असते. उदा: मोठमोठ्या स्वयंपाकघरात, भट्टीजवळ, अग्नीशी संपर्क येणार्‍या व्यवसायांमध्ये शुक्राणूंचे प्रमाण कमी असण्याची शक्यता सगळ्यात अधिक असते. शेफ, केटर्स, कूक, वेल्डर्स अग्निशमन दल व अन्य अग्नीच्या सान्निध्यात काम करणार्‍यांमध्ये अंडकोषाची उष्णतामान राखण्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. उष्णतेमुळे आहेत. ते शुक्राणू जास्त काळ टिकत नाहीत व नवनिर्मिती ही उशिराने होते. वीर्य अधिक तरल होते. यासाठी शरीराची उष्णता कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. पित्तशमन उपाय उपयोगी पडतात. तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच चिकित्सा करावी. (क्रमश:)
 
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

वैद्य कीर्ती देव

लेखिका बी.ए.एम.एस (मुंबई), बी.ए. (योगशास्त्र) असून आयुर्वेदिक चिकित्सा आणि पंचकर्म क्षेत्रात मुंबई व ठाणे येथे २० वर्षांचा त्यांचा प्रदीर्घ वैद्यकीय अनुभव आहे. त्वचाविकार आणि आयुर्वेदिक चिकित्सा, आयुर्वेद आणि सौंदर्यशास्त्र तसेच अरोमा थेरेपीचा त्यांचा विशेष अभ्यास आहे. आयुर्वेद सिद्धांत, चिकित्सा, औषधे आदी विषयांमध्ये विपुल लेखन करीत असून आयुर्वेद व्यासपीठाद्वारे वैद्यकीय चर्चासत्रे व परिसंवादातही सक्रीय सहभाग.