साहित्य संस्कृतीच्या दूत : डॉ. स्मिता दातार

    31-Oct-2022   
Total Views |
 

डॉ. स्मिता दातार
 
 
 
 
 
सौंदर्यतज्ज्ञ, साहित्यिक, वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक भान असलेल्या संवेदनशील डॉक्टर म्हणून स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवलेल्या मुंबईच्या डॉ. स्मिता निखिल दातार. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...
 
 
 
हृदयात विषाणूचा संसर्ग झाला म्हणून त्या गंभीर आजारी पडल्या. मृत्यूशी झुंजच होती ती. मात्र, प्रचंड ताकदीने त्या मृत्यूच्या दाढेतून परतल्या, तो एक संकल्प घेऊनच की ”हा माझा पुनर्जन्म आहे. देवाने मला नव्याने जीवनदान दिले ते काहीतरी सकारात्मक करण्यासाठीच.” हीच उमेद घेऊन त्यांनी त्यांचा लेखनप्रवास जोमाने सुरू केला. साहित्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात स्वत:चा अविचल ठसा उमटवणार्‍या डॉ. स्मिता निखिल दातार यांच्या जीवनाचा हा दुसरा सुरू झालेला अध्यायच म्हणायचा. तशा डॉ. स्मिता निखिल दातार या ‘जनरल फिजिशियन.’ 15 वर्षे ’स्कीन अ‍ॅण्ड मोअर’ हे सौंदर्यविषयक ‘क्लिनिक’ चालवतात. तसेच मालाड येथे ‘लाईफ वेअर हॉस्पिटल’ आणि गोरेगाव येथे ‘यशदा हॉस्पिटल’ अशी त्यांची दोन हॉस्पिटल्स आहेत. मुंबई परिसरातील रूग्णांना उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, हा त्यांचा ध्यास. त्याचबरोबर त्या सौंदर्यतज्ज्ञही आहेत.
 
 
 
लेखिका म्हणून डॉ. स्मिता यांच्या साहित्यिक कार्याचा आढावा घेणे, अनिवार्यच आहे. त्यांच्या ‘डी. के. दातार : द व्हायोलिन सिंग्ज’ या पुस्तकाला ‘पं. शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशन’ चा ‘तापीपूर्णा पुरस्कार’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी’ राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार, ‘शब्दसृष्टी साहित्यरत्न पुरस्कार’, ’संत नामदेव राज्यस्तरीय चरित्र लेखन पुरस्कार’, ‘मराठा मंदिर’ तृतीय पुरस्कार प्राप्त असून या पुस्तकाचा हिंदी अनुवाद ‘गाता रहे व्हायोलिन’ नुकताच प्रकाशित झाला आहे. ‘कॅनव्हास’ कथासंग्रह प्रसिद्ध असून त्याचे अंधशाळेसाठी ओडिओ रुपांतर करण्यात आले. त्यांच्या ‘चौकोनाचा पाचवा कोन’ या कांदबरीला ‘बडोदा मराठी साहित्य परिषदे’चा प्रथम पुरस्कार, ’अक्षरसाहित्य’चा प्रथम पुरस्कार, ‘मराठा मंदिर’चा द्वितीय पुरस्कार, ‘सावित्रीबाई फुले साहित्यभूषण पुरस्कार’ प्राप्त झाले. महाराष्ट्र उच्च शिक्षण आणि तंत्रविभागाने ’चौकोनाचा पाचवा कोन’ कादंबरी आणि ’प्रभू अजि गमला’ या चरित्राची अनिवार्य ग्रंथ म्हणून निवड केली गेली. पारितोषिक प्राप्त अनेक लघुचित्रपटांचे पटकथालेखन व फिल्ममध्ये अभिनय केला आहे. सध्या वेबसीरिज, चित्रपट, पटकथा लेखन सुरू असून दूरदर्शनवर ’रूप देखणं’ ही सौंदर्यविषयक मालिकाही त्यांनी सादर केली आहे. सामाजिक भान असलेल्या डॉ. स्मिता या ‘संस्कार भारती, गोरेगाव’च्या (पूर्व) सचिव आहेत.
 
 
 
वैद्यकीय क्षेत्रात आणि त्याचबरोबर कला-साहित्य क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणार्‍या डॉ. स्मिता यांचे वडील विजय वैद्य हे इंजिनिअर, तर आई प्रभा गृहिणी. वैद्य कुटुंब मूळ पुण्याचे, पण नंतर मुंबईत मालाड येथे स्थायिक झालेले. स्मिता यांच्या आई प्रभा यांना वाचनाची आवड. त्यामुळेच की काय, स्मिता यांनाही लहानपणापासून वाचनाची आणि लेखनाचीही आवड लागली. इयत्ता तिसरीत असताना त्यांनी लिहिलेली कविता छापून आली होती. स्मिता या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या धनी होत्या आणि आहेत. त्यांना लहानपणापासून डॉक्टर व्हायचे होते. सगळे सुरळीतच होते. मात्र, पुढे ‘एमबीबीएस’साठीचा त्यांचा प्रवेश एका गुणांनी हुकला. त्यांना खूप वाईट वाटले. पण, ‘अपने मन का हो तो अच्छा, अगर अपने मन का न हो तो और भी अच्छा’ हे कवी हरीवंशराय बच्चन यांचे वाक्य त्यांच्या मनात नवी उमेद देऊन गेले. त्यांनी मग मुंबईतच ‘बीएएमस’ शिक्षणाला प्रवेश घेतला.
 
 
 
शिक्षण पूर्ण झाले आणि त्याच काळात डॉ. निखिल दातार यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला. निखिल यांचे पिता ‘पद्मश्री’ पंडीत डी. के. दातार व्हायोलिनवादक, तर आई डॉ. सुधा दातार स्त्रीरोगतज्ज्ञ. सासरचे घरही कलाविश्वातले संपन्न कुटुंब. विवाहानंतर स्मिता आणि निखिल यांनी एकमेकांचे आयुष्य घडवण्याची आणि यशस्वी सुखी संसार करण्याची जबाबदारी स्वीकारली. स्मिता यांनी दवाखाना सुरू केला. सौंदर्यतज्ज्ञसंदर्भातले त्यांनी शिक्षण घेतले. पती निखिल यांचा पिंड वैद्यकीय समाजसेवेचा. आरोग्य क्षेत्रातील अनेक घटनांमध्ये न्याय-हक्कासाठी निखिल पुढाकार घेतात. त्यांच्या कार्यात अडथळा येऊ नये, यासाठी स्मिता कसोशीने प्रयत्न करतात. स्मिता या वैद्यकीय क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही ठसा उमटवू शकतात, हे जाणून निखिल यांनीही स्मिता यांना सहकार्यच केले. या सगळ्या घडामोडीत स्मिता यांना वाटे की, समाजाचे ऋण फेडायला हवे. समाज आणि देशासाठी काहीतरी करायला हवे. या जाणिवेतूनच त्या ‘संस्कार भारती’शी जोडल्या गेल्या. मराठी भाषिक साहित्यिक म्हणून त्यांचे मराठी भाषेवर निस्सीम प्रेम आहे.
 
 
 
 
नव्या पिढीला, त्यातही इंग्रजी माध्यमातील मुलांना मराठी साहित्याची गोडी लागावी, यासाठी स्मिता ‘मराठी विचार धारा परिषदे’च्या माध्यमातून विविध उपक्रम राबवतात. सामाजिक भान असलेल्या स्मिता अत्यंत संवेदनशील आहेत. वैद्यकीय पेशात कार्यरत असताना त्यांनी रुग्णांची विविध कारणांनी होणारी ससेहोलपट अनुभवली आहे. रुग्णांना होणारा मानसिक किंवा इतरही त्रास दूर करण्यासाठी स्मिता आणि निखिल यांनी ‘रुग्णसुरक्षा अभियान’ही सुरू केले आहे. अशा विविध आयामांमध्ये स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवणार्‍या डॉ. स्मिता दातार. यापुढेही त्यांना साहित्याच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात योगदान द्यायचे आहे. डॉ. स्मिता यांनी समाजसंस्कृतीच्या दूत म्हणून कार्यरत राहण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे डॉ. स्मिता दातार त्यांचे ध्येय नक्कीच पूर्ण करतील.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.