पुतीन गाती भारताचे गोडवे

    30-Oct-2022   
Total Views |
putin
 
 
 
भारत आणि रशियाची मैत्री जगजाहीर आहे. भारताच्या अनेक संकटकाळात रशियाने भारताला वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला. युद्ध असो वा तंत्रज्ञान प्रत्येक वेळी रशियाने भारताची साथ दिली. 2014 साली देशात मोदी लाटेनंतर चित्र आणखी पालटले. मोदी सरकारच्या स्थापनेनंतर भारत आणि रशियाचे मैत्रीसंबंध तर नव्या उंचीवर गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुत्सद्देगिरीमुळे दोन्ही देशांतील संबंधांमध्ये अधिक स्पष्टता आली. रशिया आणि युक्रेन युद्धावेळी भारताच्या भूमिकेकडे संपूर्ण जगाचे लक्ष होते. पण प्रचंड दबाव असतानाही भारताने रशियाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली. त्यावर अनेक देश आश्चर्यचकित झाले खरे. परंतु, भारत आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. त्यातच रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी नुकतेच भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले. पुतीन यांनी मॉस्को येथील ‘वल्दाई डिस्कशन क्लब’च्या 19व्या वार्षिक बैठकीमध्ये भारताचे विशेष कौतुक करत पंतप्रधान मोदी देशभक्त असल्याचे कौतुकोद्गार काढले. भारताची स्वतंत्र भूमिका पुढे नेण्यासाठी पंतप्रधान मोदी सक्षम असल्याचे यावेळी पुतीन म्हणाले.
 
 
मोदींनी भारताच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली. इंग्रजांविरुद्ध लढा उभारून भारताने स्वातंत्र्य मिळवले. पारतंत्र्यापासून ते आधुनिक देश होण्याकडे सुरू असलेली वाटचाल या काळात भारताने मोठी प्रगती केली. विकासाच्या नव्या परिभाषा भारताने लिहिल्या. त्यामुळेच भारताची जगभर प्रशंसा आणि सन्मान वाढला. मागील काही वर्षांमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक विकासकामांवर भर दिला. स्वाभाविकपणे ते भारतासाठी देशभक्तच आहे. त्यांनी सुरू केलेली ‘मेक इन इंडिया’ ही मोहीमदेखील आर्थिक आणि नैतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. देशाच्या विकासासाठी त्यांनी अनेक नव्या योजना आणल्या आणि प्रभावीपणे राबवल्या. आमच्यासोबत भारताचे एक विशेष नाते असून दोन्ही देशांचे संबंध घनिष्ठ आहेत. येणारा काळ भारताचा असेल. तसेच, भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे, अशा शब्दांत पुतीन यांनी भारताचे गोडवे गायले. या परिषदेमध्ये मोदींचे कौतुक करताना पुतीन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतंत्र विदेश नीति राबविण्यासाठी सक्षम आहेत. मला विश्वास आहे की, भविष्यात भारत मजबूत स्थितीत असेल. विशेष म्हणजे, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. ही भारतासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. परंतु, असे असले तरीही ज्या पद्धतीने सध्या भारत विकासाच्या मार्गावर चालत आहे, त्यादृष्टीने तीदेखील भारतासाठी एक अभिमानाचीच बाब म्हणावी लागेल. अनेक दशकांपासून रशिया आणि भारताचे दृढ संबंध असून भारताची प्रगती खरोखर वाखाणण्याजोगी आहे.
 
 
भारत आणि रशियात कधीही मतभेद नव्हते, असे सांगत पुतीन म्हणाले की, दोन्ही देशांनी एकमेकांना नेहमीच सहकार्य केले आणि आताही आमची सहकार्याचीच भूमिका असून पुढेही ती कायम राहील. दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धावेळीही भारताने अतिशय स्पष्ट आणि रोखठोक भूमिका घेतली. भारताने दोन्ही देशांना युद्ध बंद करण्याचा सल्ला दिला. भारताने भले सल्ला दिला. परंतु, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने कधीही रशियाविरोधातील मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. एवढेच काय तर अमेरिका, पाश्चिमात्त्य देशांचा विरोध झुगारून भारताने आपली स्वतंत्र भूमिका कायम ठेवली. तसेच, रशियाकडून तेलखरेदीही बंद केली नसल्याचे पुतीन म्हणाले. एकूणच पुतीन यांच्या कौतुकोद्गारामुळे भारताची विदेश नीती किती स्पष्ट आणि भक्कम आहे याची प्रचिती येते. भारताने अमेरिका असो वा चीन, कुणाच्याही वळचणीला न जाता आपला स्वतंत्र बाणा कायम ठेवला. मोदींच्या नेतृत्वाखालील भारताने भल्याभल्यांना भारताची दखल घेण्यास भाग पाडत आपली ताकद जगाला दाखवून दिली. वाट्याला जाल तर सोडणार नाही, अशी भूमिका ठेवत वेळ पडल्यास भारताने शत्रूराष्ट्राला त्याच्याच घरात घुसून जोरदार प्रत्युत्तर दिले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि विदेशमंत्री एस. जयशंकर यांचीदेखील भूमिका यावेळी महत्त्वाची ठरते. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू ठळकपणे मांडली. या नव्या भारतात पुतीन यांच्या या कौतुकोद्गारामुळे प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलून येईल, हे मात्र नक्की...
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.