जे खड्डे गणेशोत्सवात बुजवले ते परत नवरात्रीत बुजवण्याची वेळ आली आहे!

    03-Oct-2022
Total Views |

goregao
 
 
मुंबई : मुंबईतील रस्त्यांची स्थिती आणि दर्जा सुधारेल अशी अपेक्षा आजही प्रत्येक मुंबईकर करत आहे. मात्र मुंबई महापालिका मुंबईतील रस्त्यांबाबत गांभीर्याने विचार करत नसल्याचे जाणवू लागले आहे. गोरेगाव येथील फिल्मसिटी मार्गावर मुंबई महापालिकेकडून एक पूल बांधण्यात येत आहे. ज्याचे भूमिपूजन राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले होते. मात्र त्यापूर्वी रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. परंतु त्याकडे मात्र मुंबई महापालिकेने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे येथील स्थानिकांनी "दै. मुंबई तरुण भारत"सोबत संवाद साधताना सांगितले.
 
 
तब्बल दहा हजार कोटी खर्ज करून महापालिकेकडून येथे पूल बांधण्यात येत आहे. मात्र पूर्वी ज्या रस्त्याचे रुंदीकरण झाले. त्यावेळी रोड कटिंगमध्ये जागा गेलेल्या नागरिकांना पैसे देण्यास मात्र मुंबई महापालिकेकडे पैसे नाहीत. जो रस्ता आहे त्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत मार्ग अद्याप मुंबई महापालिकेला मिळालेला नाही. परंतु दहा हजार कोटी खर्च करून एक पूल बांधण्याकडे मुंबई महापालिका लक्ष पुरवत असल्याचे देखील येथील स्थानिकांनी म्हटले आहे.
 
 
तसेच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत मुंबई महापालिकेने काहीतरी ठोस पावले उचलणं अपेक्षित आहे. कारण जे खड्डे गणेशोत्सवात बुजवले तेच आता नवरात्रीत बुजवण्याची वेळ आता आली आहे. रस्त्यात खड्डे पडले की केवळ पॅच मारायचा म्हणजे झाले, असे मुंबई महापालिकेला वाटते. मात्र जी खड्डे डांबर निखळून बाहेर येत त्याकडे मुंबई महापालिकेने लक्ष पुरवणे गरजेचे आहे, असेही येथील स्थानिकांनी स्पष्ट केले आहे. तसेच एखादा अपघात झाल्यावर मुंबई महापालिका येथे लक्ष देणार का? असा सवाल देखील येथील स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
 
 
- शेफाली ढवण