जागतिक अंतराळ सप्ताहाच्या निमित्ताने...

    03-Oct-2022
Total Views |

World Space Week
 
 
 
दरवर्षी दि. 4 ते 10 ऑक्टोबरच्या दरम्यान जगभर ‘जागतिक अंतराळ सप्ताह’ साजरा केला जातो. हा जागतिक स्तरावर साजरा होणारा सगळ्यात मोठा खगोलीय कार्यक्रम आहे, असे म्हणता येईल. यानिमित्ताने अंतराळ, अंतराळ मोहीम आणि या सप्ताहाविषयी माहिती देणारा लेख...
 
 
 
द्यौ: शान्ति: अन्तरिक्ष शान्ति:। 
पृथिवी शान्तिराप: शान्तिरोषधय: शान्ति:।
 
 
यजुर्वेदाच्या या शांतिमंत्रात फक्त पृथ्वीवरच नाही, तर अंतराळातसुद्धा सदैव शांतता नांदो, अशी प्रार्थना केली गेली आहे. मानवाची स्वार्थीवृत्ती बघता पृथ्वीवरील साधनसंपत्ती ओरबाडून संपवल्यावर माणूस नक्की अंतराळाकडे वळेल. माणसाच्या विजीगिषु वृत्तीमुळे पृथ्वीवर मोठी मोठी युद्ध झाल्यानंतर अंतराळातसुद्धा अशीच संहारक युद्ध होऊ शकतील. हे अंतराळातील प्रदूषण आणि युद्धाचे सावट आपल्या पूर्वजांना जाणवलं असेल का?
 
 
जेव्हा देश, भाषा, धर्म, जाती अशा कुठल्याच चौकटीने माणूस विभागला गेला नव्हता, त्या आदिम रानटी अवस्थेमध्येसुद्धा माणूस अंतराळाचे निरीक्षण करत होता. अनेक अश्मयुगीन गुंफाचित्रात आपल्याला तसे पुरावे सापडतात. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत हळूहळू अंतराळाविषयीच्या भीतीची जागा कुतूहलाने घेतली. धर्म आणि संस्कृतींच्या विकासात जगभरातल्या बहुतांश संस्कृतींनी आपापल्या देवतांचे निवासस्थान म्हणून अंतराळाची निवड केली. आकाशातील ठळक तारे, तारकासमूहांचे काल्पनिक आकार, ग्रह यांच्याविषयी अनेक दंतकथा-आख्याने भारतीय, ग्रीक, रोमन, चिनी, अरबी, जपानी, पौराणिक साहित्यात आढळतात. भारतीय संस्कृतीतदेखील अगदी वैदिक काळापासून अंतराळाचा विचार केलेला दिसतो. ऋग्वेदात या विश्वाचे पृथ्वी, आकाश (द्यौ:) आणि अंतराळ (अन्तरिक्ष:) असे तीन भाग मानले आहेत. पाणिनीने ‘अन्तर्मध्ये ऋक्षाणि नक्षत्राणि यस्य तत्’ म्हणजे ‘ज्यात नक्षत्रे आहेत ते अंतरीक्ष’ अशी व्युत्पती दिली आहे. संस्कृतमध्ये अंतराळाला ‘अन्तरिक्ष’, ‘व्योमन्’, ‘ज्रयस्’, ‘अभ्यन्तरम्’, ‘वरिवस्’, ‘दिगन्तर’, ‘ख’, ‘ककुभ्’, ‘महाबिल’, ‘रोदस्’, ‘गगनमनन्तं’, ‘तारापथ’ असे अनेक समानार्थी अनेक शब्द आहेत.
 
 
कणाद, कपिल, अक्षपाद गौतम, प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल अशा अनेक तत्त्ववेत्यांनी अंतराळाची तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने व्याख्या केली. त्यांच्यात मतभिन्नता असली, तरी अवकाश सर्वव्यापक, अनंत आहे, याबाबत त्यांच्यात मतैक्य आहे. आर्यभट्ट, वराहमिहिर, भास्कराचार्य (भारत), टॉलेमी (ग्रीस), अब्द अल-रहमान अल-सुफी (इराण), निकोलस कोपर्निकस (पोलंड), टायको ब्राहे (डेन्मार्क), गॅलेलियो गॅलिली (इटली), झांग हेंग (चीन), अल बत्तानी (अरबस्तान) या आणि अशा अनेक प्राचीन खगोलशास्त्रज्ञांनी अंतराळाचा शास्त्रीय अभ्यास करून सिद्धांत मांडले.
 
 
अवकाशाचा जसा तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने विचार झाला, तसा गणिताच्या माध्यमातूनदेखील झाला.अवकाशाच्या विविध गुणधर्मांचा विचार करून युक्लिडने ‘त्रिमितीय भूमिती’ निर्माण केली. अवकाशाच्या या तत्त्वज्ञानाला वैज्ञानिक चौकटीत मांडण्याचे महत्त्वाचे काम 17व्या शतकात सर आयझॅक न्यूटन यांनी केले.
 
 
त्यांच्या मते, अवकाश निरपेक्ष, अखंड व अनंत आहे. यातच वस्तूंचा समावेश असतो. वस्तू नष्ट झाल्या असे क्षणभर मानले, तरी अवकाश व काल अबाधित राहतात. त्यांनी काल आणि अवकाश हे एकमेकांपासून वेगळे मानले. त्याचं हे मत एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत सर्वमान्य होते. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आईन्स्टाईन यांनी मर्यादित सापेक्षता सिद्धांत मांडला. त्यामुळे काळ आणि अवकाश या दोन कल्पना भिन्न नसून ‘अवकाश-काल’ अशा त्यांच्या युतीलाच अस्तित्व प्राप्त झाले.
 
 
सतराव्या शतकाच्या प्रारंभी गॅलिलिओच्या रूपाने मानवाने पहिल्यांदा अंतराळाकडे दुर्बीण रोखली आणि आतापर्यंत न दिसलेल्या अनेक गोष्टी जगाने पाहिल्या. अठराव्या शतकापासून वैज्ञानिक घोडदौडीमुळे अंतराळाविषयी नवनव्या माहितीचे दालन आपल्या पुढे उलघडत गेले. रेडिओ, अवरक्त, अतिनील, क्ष-किरणे अशा वेगवेगळ्या प्रारणांच्या दुर्बिणींकडून मिळालेल्या माहितीमुळे अंतराळाचे नवे रूप आपल्याला कळले. पण, ही सगळी गृहीतके, चर्चा पृथ्वीवर बसूनच चालली होती. अजूनपर्यंत तरी पृथ्वीबाहेरील अंतराळाला मानवाचे हात लागले नव्हते. 1903 मध्ये कॉन्स्टॅन्टिन त्सिओल्कोव्हस्की या रशियन अभियंत्याने द्रवरूप इंधन आणि क्रमश: जळत जाणारे रॉकेट वापरल्यास अधिक लांबचा पल्ला कमीत कमी शक्तीने गाठता येईल, असे सुचवले. रॉबर्ट गोडार्ड यांनी महत्त्वपूर्ण संशोधन करून दि. 16 मार्च, 1926 पहिले रॉकेट उडवले.गोडार्डच्या रॉकेटची ही चिमुकली झेप अवकाशात जाण्याच्या प्रयत्नात एक मोठे पाऊल ठरली.
 
 
दुसर्‍या महायुद्धानंतर रशिया आणि अमेरिकेत शीतयुद्धासोबत अंतराळ युद्धदेखील सुरू झाले. या ’स्पेस रेस’मध्ये बाजी मारत सोव्हिएत रशियाने दि. 4 ऑक्टोबर, 1957 रोजी रशियाने ‘स्पुटनिक’ नावाचा पहिला मानवनिर्मित उपग्रह अवकाशात सोडून अंतराळ प्रवेशाची मुहूर्तमेढ रोवली. अमेरिका या धक्क्यातून सावरायच्या आतच ‘स्पुटनिक-2’मधून ‘लायका’ नावाची एक कुत्रीही अंतराळात सोडण्यात रशियाने यश मिळवले. 1958 मध्ये अमेरिकेने अंतराळ संशोधनासाठी ‘नासा’ या स्वायत्त संस्थेची स्थापना करून ‘एक्स्प्लोरर’ हा उपग्रह अंतराळात पाठवला. 1961 मध्ये रशियाचा युरी गागरिन हा अंतराळात जाणारा पहिला मानव ठरला. आता खर्‍या अर्थाने मानवाने अंतराळाला स्पर्श केला. यानंतर रशिया आणि अमेरिकेमध्ये अंतराळयाने पाठवण्याची स्पर्धा सुरू झाली. हळूहळू इतर देशसुद्धा या स्पर्धेत सहभागी होऊ लागले.
 
 
अमेरिकेच्या ‘अपोलो-11’ या यानाद्वारे नील आर्मस्ट्राँग या पहिल्या मानवाचे चंद्रावर पाऊल पडले. दोन्ही देशातली ही स्पर्धा आता हाताबाहेर जात होती. सोव्हिएत युनियनचा ‘व्हॉस्तॉक’ प्रकल्प पार पडतो न पडतो तो अमेरिकेने ‘मर्क्युरी’ कार्यक्रमाची यशस्वी सांगता केली. शुक्र, बुध आणि मंगळ ग्रहापर्यंत आपला उपग्रह पोहोचावा, यासाठीही दोन्ही देशांमध्ये स्पर्धा सुरू होती. 1971 साली अंतराळात पहिले अवकाश स्थानक ‘सॅल्युट-1’ पाठवून रशियाने पुन्हा बाजी मारली. त्याला उत्तर म्हणून 1973 साली अमेरिकेने ‘स्कायलॅब’ हे स्थानक अंतराळात पाठवले. या सगळ्या पार्श्वभूमीवर अंतराळाचा उपयोग, मालकी यासंबंधी जागतिक स्तरावर कायदा आणि नियम असण्याची गरज निर्माण झाली आणि यातूनच दि. 10 ऑक्टोबर, 1967 रोजी संयुक्त राष्ट्रांनी बाह्य अंतराळ (र्जीींशी डरिलश ढीशरीूं) मान्य केला. याद्वारे अंतराळ ही कोण्या एका देशाची मालकी नसून त्यावर सगळ्या मानवांचा समान अधिकार आहे आणि अंतराळाचा उपयोग युद्धासाठी न करता मानवजातीच्या कल्याणासाठी करावा, असे मार्गदर्शक तत्त्व घालून देण्यात आले.
 
 
अखेर 1975 मध्ये ही अंतराळ स्पर्धा थांबली.अवकाशात आता कुठलीही स्पर्धा असणार नाही, असे या दोन्ही महासत्तांनी जाहीर केले. रशियाचे सोयुझ आणि अमेरिकेचे ‘अपोलो’ अवकाश स्थानक अवकाशात एकत्र जोडले गेले. एकमेकांशी स्पर्धा करत अंतराळ संशोधन करण्यापेक्षा परस्पर सहकार्यातून असे प्रकल्प राबवले, तर वेळ, पैसा यांची बचत होऊन सगळ्यांनाच त्याचा फायदा होऊ शकेल, हे या अंतराळ स्पर्धेमुळे एव्हाना सगळ्या देशांच्या लक्षात आले. यामुळे ‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ’ हे तत्त्व स्वीकारून अनेक संयुक्त मोहिमा राबवल्या गेल्या. भारताने दि. 19 एप्रिल, 1975 रोजी रशियाच्या मदतीने ’आर्यभट-1’ हा पहिला उपग्रह अवकाशात सोडला. या स्पर्धेत भारत जरी उशिरा सहभागी झाला असला, तरी अल्पावधीतच भारताने घेतलेली झेप लक्षणीय आहे. 2017 मध्ये एकाचवेळी 104 उपग्रह अंतराळात सोडून भारताने नवा विक्रम घडवला. भारताने 2022 पर्यंत 36 देशांचे 346 उपग्रह सोडले आहे.
 
 
दि. 4 ऑक्टोबर, 1957 ला मानवाच्या अंतराळात हस्तक्षेपाची सुरुवात होऊन अंतराळाला धोका निर्माण होण्याची शक्यात निर्माण झाली, तर दि. 10 ऑक्टोबर, 1967 ला अंतराळ कायद्याची मुहूर्तमेढ रोवली जाऊन माणसाला आपल्या जबाबदारीचे भान आले. या दोन घटनांच्या स्मरणार्थ दि. 4 ते 10 ऑक्टोबरदरम्यान ‘जागतिक अंतराळ सप्ताह’ साजरा केला जातो. मानवाच्या पहिल्या चांद्रसफरीच्या यशानिमित्त अंतराळ सप्ताह साजरा करण्यासाठी 1980 साली जागतिक अंतराळ सप्ताह संस्था स्थापन झाली. जुलै 1980 मध्ये पहिला असा सप्ताह अमेरिकेतल्या टेक्सास राज्यातील ह्युस्टन येथे साजरा झाला. 1999 पर्यंत 15 देशांत या कल्पनेचा प्रसार झाला. दि. 6 डिसेंबर, 1999 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत असा एक सप्ताह जागतिक स्तरावर साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानुसार दि. 4 ते 10 ऑक्टोबर हा आठवडा अंतराळ सप्ताह साजरा करावा, असे ठरवण्यात आले.
 
 
‘जागतिक अंतराळ सप्ताह संस्थे’कडून या सप्ताहासाठी दरवर्षी एक विषय जाहीर केला जातो. या मध्यवर्ती संकल्पनेला अनुसरून जगभर विविध कार्यक्रमांचे आयोजन होते. यावर्षी अवकाश आणि शाश्वतता. विविध अंतराळ मोहिमांमुळे ‘अंतराळ प्रदूषण’ ही नवी समस्या तयार झाली आहे. अंतराळात गेलेली प्रत्येक कृत्रिम वस्तू ही खरंतर अंतराळाच्या दृष्टीने कचराच आहे. भूपृष्ठापासून 200-300 किमी कक्षेत फिरणारा कचरा हळूहळू खाली येत वातावरणाच्या घर्षणाने नष्ट होऊ शकतो. परंतु, त्यापेक्षा अधिक उंच कक्षेतील कचरा शेकडो वर्ष पृथ्वी भोवती फिरत राहू शकतो. या पार्श्वभूमीवर ‘शाश्वततेसह विकास’ ही संकलपना लक्षात घेत पुढील अंतराळ मोहिमा आखणे, ही काळाची गरज ठरते. या वर्षीच्या सप्ताहाच्या या विषयावर यानिमित्ताने जगभर मंथन होईल. दि. 4 ते 10 ऑक्टोबरदरम्यान साजरा होणारा हा ‘जागतिक अंतराळ सप्ताह’ आपल्याला अंतराळाविषयी आपल्या अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव करून देतो. पृथ्वीसोबतच अंतराळातसुद्धा नेहमी शांतता नांदो, ही आपल्या पूर्वजांची इच्छा या पुढेसुद्धा अबाधित राहो, हीच यानिमित्ताने सदिच्छा...!
 
 
 
-विनय जोशी