
गुन्हेगारी कट रचण्यासह अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : फेसबुक आणि इन्स्टाग्राम या समाजमाध्यमांवर प्रकाशित होणारा भाजपविरोधी मजकूर अमित मालवीय हे काढून टाकतात, असे खोटे वृत्त छापणाऱ्या ‘द वायर’ या वृत्तसंकेतस्थळाविरोधात भाजपचे माहिती व तंत्रज्ञानप्रमुख आणि पश्चिम बंगाल सहप्रभारी अमित मालवीय हे फसवणूक आणि अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत.
‘द वायर’ या डाव्या विचारांच्या वृत्तसंकेतस्थळावर संपादक सिद्धार्थ वरदराजन यांनी भाजप नेते अमित मालवीय हे समाजमाध्यमांवर नियंत्रण ठेवत असल्याचा दावा करणारे सपशेल खोटे वृत्त ६ आणि १० ऑक्टोबर २०२२ रोजी छापले होते. मात्र, हा दावा खोटा असल्याचे स्पष्टीकरण मेटातर्फे देण्यात आले, त्यानंतर ‘द वायर’ नेही संबंधित वृत्त काढून टाकले आहे. मात्र, ‘द वायर’ ने प्रतिष्ठेला कलंकित करून आणि व्यावसायिक कारकिर्दीला गंभीर हानी पोहोचवूनही माफी मागणे टाळले असल्याने त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे मालवीय यांनी म्हटले आहे.
‘द वायर’, त्याचे व्यवस्थापन आणि वार्ताहर यांच्याविरोधात मालवीय गुन्हा दाखल करणार आहेत. त्यामध्ये मानहानी, खोटेपणा, बदनामी करणे, गुन्हेगारी कट रचणे याविषयीच्या कलमांखाली गुन्हा दाखल करणार आहेत. त्याचप्रमाणे द वायर आणि त्यांच्या सहयोग्यांविरोधात अब्रुनुकसानीप्रकरणी दावाही दाखल करणार आहेत.
काय आहे प्रकरण ?
फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांची मूळ कंपनी असलेली ‘मेटा’ ही कंपनी नियमितपणे भाजपच्या सदस्यांशी संगनमत करून पक्षाला प्रतिकूल वाटणारी सामग्री काढून टाकते, असे वृत्त ‘द वायर’ ने प्रकाशित केले होते. याकामी भाजपचे माहिती व तंत्रज्ञानप्रमुख अमित मालवीय हे भाजप आणि ‘मेटा’ यांच्यामधील दुवा म्हणून काम करतात. त्यासाठी मेटाने मालवीय यांना फिल्टर, अल्गोरिदम, तपासणी आणि पडताळणीचे अधिकार दिले आहेत.
भाजप आणि भाजपच्या नेत्यांविरोधात प्रकाशित होणारा मजकूर काढून टाकण्यासाठी मालवीय हे त्या अधिकारांचा वापर करत असल्याचा दावा करण्यात आला होता. आपल्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी मालवीय आणि मेटादरम्यानच्या कथित पत्रव्यवहाराचा उल्लेख करून मालवीय यांनी आतापर्यंत ७०५ पोस्ट काढून टाकल्याचाही दावा करण्यात आला होता.
मात्र, ‘द वायर’ यांचा दावा सपशेल खोटा असून त्यांनी सादर केलेली कागदपत्रे ही पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्टीकरण मेटाचे कम्युनिकेश प्रमुख अँडी स्टोन यांनी ११ ऑक्टोबर रोजी स्पष्ट केले होते. त्यानंतर ‘द वायर’ ने संबंधित वृत्त आपल्या संकेतस्थळावरून काढून टाकले असून वाचकांची माफी मागणारा मजकूर संपादक सिद्धार्थ वरदराजन यांनी प्रकाशित केला आहे.