गोवंशसंरक्षक निखिल खंडागळे

    28-Oct-2022   
Total Views |
 
निखिल खंडागळे
 
 
 
 
 
‘विकणारा विकतोय, खाणारा खातोय आणि तुझं काय जातंय,’ अशी टीका करणार्‍यांना त्याने आपल्या कृतीतून निरुत्तर केले. जाणून घेऊया जीवावर उदार होऊन गोरक्षणासाठी झटणार्‍या निखिल खंडागळे याच्याविषयी...
 
 
 
सातारा जिल्ह्यातील खंडाळा शहरात जन्मलेला तरुण निखिल विजय खंडागळे उर्फ गुंड्या हा गाय वाचली पाहिजे, हेच ध्येय समोर ठेवून कार्यरत आहे. वडील एसटीचालक, तर आई गृहिणी. घरची परिस्थितीही जेमतेम. जिल्हा परिषद शाळेतून निखिलने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. नेतृत्वगुण ठासून भरल्याने मुलांना एकत्र करण्यात त्याचा विशेष हातखंडा होता. किल्ले बांधणीत त्याला विशेष रस होता. शालेय वयात त्याने राजगड, प्रतापगड, तोरणा अशा अनेक मातीच्या किल्ल्यांची बांधणी केली. किल्ले बांधणी स्पर्धेत त्याने अनेक पारितोषिकेही मिळवली. पुढे पाचवी ते पदवीपर्यंतचे शिक्षण राजेंद्र महाविद्यालयातून पूर्ण केले. अगदी नववीत असतानाच बलिदान मासाच्या निमित्ताने त्याचा ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’कडे ओढा वाढला.
 
 
 
गणेश गाढवे, सुरज साळुंखे यांच्यामुळे तो ‘शिवप्रतिष्ठान’शी जोडला गेला. महाविद्यालयात दूरदूरवरून मुले शिक्षणासाठी येत होती. या भागात ’शिवप्रतिष्ठान’चे जाळे असल्याने विचारांची देवाणघेवाण होत गेली आणि निखिल ‘शिवप्रतिष्ठान’च्या कार्यात आणखी सक्रिय होत गेला. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान सध्याची पिढी विसरत चालली आहे. त्यांचे कार्य तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो धडपडतोय. ‘भक्तीशक्ती मोहीम’, ‘गडकोट मोहीम’, ’बलिदान मास’, ‘दुर्गा दौड’ अशा अनेक मोहिमांमध्ये तो हिरिरीने सहभाग घेऊ लागला. या उपक्रमाविषयी तो तरुणांमध्ये जनजागृती करू लागला. अकरावीला वाणिज्य शाखेत प्रवेश घेतल्यानंतर दिवंगत सागर मालुसरे यांचे गोरक्षणाचे कार्य निखिल जवळून पाहत होता. रक्ताळलेले शिंगाचे भाग, पायाचे भाग, गोमांसाचे तुकडे त्याने डोळ्याने पाहिले. गाईला आपल्या धर्मात मातेचा दर्जा आहे. याच गाईची अशी कत्तल केली जात असल्यामुळे निखिलने गोरक्षणासाठी स्वतःला वाहून घेण्याचे निश्चित केले. मिरज, कराड, सांगली, कर्नाटकहून गोमांसाच्या गाड्या येत असल्याने त्याने पाऊस, थंडी न पाहता रात्री जागता पहारा देण्यास सुरुवात केली.
 
 
 
त्याच्यासोबत सुरज साळुंखे, राजेश मंडले, पीयूष गाढवे असे काहीजण एकत्र येऊन प्रत्येकी 20 रुपये काढून गाडीत एक लीटर पेट्रोल भरायचे आणि जागता पहारा द्यायचे. गाडीत गोवंश असल्याचा संशय आल्यास ते तत्काळ गाडीची तपासणी करायचे. सुरुवातीला त्याने काही गोष्टी समजून घेणे आणि अनुभव घेण्यावर भर दिला. गाडीत गोवंश असेल हे नेमके कसे ओळखावे, यात तो पारंगत झाला. दररोज 9 वाजता तो घराबाहेर पडून गोवंश वाचवण्यासाठी धडपडत होता. बारावीपर्यंत अनुभव घेतल्यानंतर खर्‍या अर्थाने त्याने गोरक्षण कार्याला पुढे नेले. सहकार्‍यांबरोबरच पोलिसांच्या मदतीने निखिल गोवंशाची सुटका करू लागला. हे गोवंश तो पुढे ‘करूणा गोशाळे’ला सोपवू लागला. 2018 साली बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने उदरनिर्वाहासाठी वडापावचा व्यवसाय सुरू केला. दुकानात येणार्‍या तरुणांनाही तो गोरक्षणाचे कार्य समजावून सांगे. युवकांना ‘शिवप्रतिष्ठान’च्या माध्यमातून एकत्र करण्याचा प्रयत्न करत असे. कुठेही गोवंश संकटात असल्याचे समजले तर तत्काळ सूचित करण्याचे आवाहन तो करतो. गोवंश सोडवण्याचा धडाका लावल्यानंतर तो कसायांच्या ‘टार्गेट’वरही आला. अनेकांनी त्याला प्रकरण मिटवण्याची विनंती केली. परंतु, त्याने कधीही त्याला भीक घातली नाही.
 
 
 
 
फलटणहून गोवंशाची गाडी येते. त्यामुळे ती लोणंदकडेच पकडावी, या उद्देशाने त्याने तयारी केली. परंतु, त्यावेळी तिथे त्याला संपवण्याचा प्रयत्न झाला. गोवंश सोडवताना त्याला 25 जणांच्या टोळक्याने घेरले. या सर्वांच्या हातात लोखंडी गड, कोयते होते आणि ‘इसको छोडेंगे नही’ असे ठरवूनच त्यांनी निखिलला घेरले होते. परंतु, शिताफीने तो तिथून निसटला आणि थेट पोलीस स्थानकात पोहोचल्याने वाचला. एवढं होऊनही तो डगमगला नाही आणि आणखी जोमाने गोरक्षणाचे कार्य त्याने सुरूच ठेवले. निखिलने आतापर्यंत तब्बल 1,200 हून अधिक गोवंशाची सुटका केली असून 800 टन गोमांस जप्त करण्यात त्याला यश आले आहे. या कार्यात त्याला ज्येष्ठ गोरक्षक पंडितदादा मोडक यांच्यासह अ‍ॅड. चिन्मय पंडित यांचे मोलाचे सहकार्य लाभते.
 
 
 
 
‘मी जे काम करतोय, त्याला विरोध होणार’ याची जाणीव असल्याने ‘फाटेल किंवा तुटेल’ या विचाराने त्याने काम सुरूच ठेवले. गाईवाचून हिंदू धर्म असू शकत नाही. गाय वाचली तर हिंदू आणि देश वाचेल. भविष्यात आणखी गोरक्षकांना तयार करण्याचा मानस असून ‘गाव तेथे गोशाळे’साठी प्रयत्न करण्याचा मानस असल्याचे निखिल सांगतो. कायदे कठोर आहेत, फक्त त्याची योग्य अंमलबजावणी व्हावी. गोरक्षकांना नोंदणीकृत ओळखपत्र द्यावेत, अशी मागणी तो शासनाकडे करतो. ‘आम्ही तुमच्या दारातून गाय घेऊन जाऊ, तिच्या पालनाची जबाबदारी घेऊ. परंतु, गाय विकू नका,’ असे आवाहनही तो करतो. ‘विकणारा विकतोय, खाणारा खातोय आणि तुझं काय जातंय,’ अशी टीका करणार्‍यांना त्याने धुडकावून लावले. मौजमस्तीच्या वयात, तरुणपणात निखिल जीवावर उदार होऊन गोरक्षणासाठी झटतोय. त्याला आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...!
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.