पर्यावरण संवर्धनाचे संस्कार आवश्यक

रवींद्र धारिया यांचे प्रतिपादन ‘वनराई’, ‘लायन्स क्लब ऑफ इकोफ्रेंड्स’तर्फे कार्यशाळा

    25-Oct-2022
Total Views |

vanrai
  
पुणे : “पर्यावरण संवर्धनाचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये शालेय वयापासूनच रुजायला हवा. यामध्ये पालकांसह शिक्षकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. शालेय शिक्षणाबरोबरच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून द्यायला हवे,” असे मत ’वनराई’चे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी व्यक्त केले.
 
 
ऑक्टोबर सेवा सप्ताहांतर्गत ’वनराई’च्या पर्यावरण वाहिनी व ’लायन्स क्लब इकोफ्रेंड्स’च्या पुढाकाराने शिक्षकांसाठी आयोजित कार्यशाळेत धारिया मार्गदर्शन करत होते. प्रसंगी ’वनराई’चे सचिव अमित वाडेकर, वाहिनीचे प्रकल्प संचालक भारत साबळे, ‘लायन्स क्लब ऑफ इको फ्रेंड्स’चे अनिल मंद्रुपकर, किशोर मोहोळकर, प्रतिभा खंडागळे, शमा गोयल, मेघा आंबवले आदी उपस्थित होते. या सप्ताहात ’लायन्स’च्या ’ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी’, ‘पुना वेस्ट’, ‘फ्युचर’, ‘विधिज्ञ’, मुकुंदनगर, शिवाजीनगर, ‘सुप्रिम’, ’पुणे रिव्हर साईड’, ‘मैत्री’ या क्लबने सहभाग घेतला. आभार तृप्ती व्हावळ यांनी मानले.
 
किशोर मोहोळकर यांनी ‘पर्यावरण आणि आपण’ या विषयावर मार्गदर्शन केले. वृक्षारोपण, संवर्धन, स्वच्छता, प्लास्टिकमुक्ती, कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण, कचर्‍यातून अर्थार्जन अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी विचार मांडले. अनिल मंद्रुपकर यांनी ‘इकोफ्रेंड्स’च्या माध्यमातून सुरू असलेल्या पर्यावरण संवर्धनाच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यशाळेच्या शेवटी सहभागी शिक्षकांना आयुष मंत्रालय व औषधी वनस्पती सुविधा केंद्राचे डॉ. दिगंबर मोकाट यांच्या सहयोगातून औषधी वनस्पतींचे वाटप करण्यात आले.
 
 
मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांच्या सहकार्यातून पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत ग्रामीण विकासाचा कार्यविस्तार पुढच्या पिढ्यांपर्यंत नेण्यासाठी ’वनराई’ची पर्यावरण वाहिनी काम करत असून राज्यातील 400 शाळांतील विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे शिक्षण देण्यात येत आहे.
 
 
लहान मुलांमध्ये पर्यावरण संवर्धनाचे बीजे रोवणे, त्यांना पर्यावरणाप्रति संवेदनशील आणि कृतिशील बनविण्यासाठी ‘वनराई’ शिक्षकांसाठी अशा कार्यशाळा घेत असल्याचे साबळे यांनी सांगितले.