पुणे : दिवाळीच्या आनंद साजरा करत असताना, दुसरीकडे क्रिकेटप्रेमींचा आनंद द्विगुणित झाला. तो ‘टी-20’ विश्वचषक स्पर्धेतीलपहिल्या सामन्यात भारताच्या रोमहर्षक विजयाने. अटीतटीच्या सामन्यात विजय मिळाल्याने पुण्यात सर्वच ठिकाणी आतषबाजी करण्यात आली. चौकाचौकांत युवकांनी एकत्र येऊन जल्लोष केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून भारताच्या या टीमवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. विशेष म्हणजे, दिवाळीच्या शुभेच्छा देताना पुणे शहर पोलिसांनी लक्षवेधक ट्विट करुन ‘ ’विराट’ दिवाळी सेलिब्रेशन पुणेकर,’ अशा शब्दांत पुणेकरांना अनोख्या शुभेच्छा दिल्या.
या विजयाने देशभरात खर्या अर्थाने दिवाळी साजरी करण्यात आली. दिवाळीचा दिवस त्यात रविवार असल्याने या भारत आणि पाकिस्तान याच्यातील क्रिकेट सामना पाहण्यासाठी अनेकजण घरातच थांबून होते. चौकाचौकांतदेखील सामना बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. सामना अटीतटीचा झाल्यानंतर अनेकांच्या नजरा टीव्हीसमोर लागून राहिल्या होत्या.
शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि मॉल्समध्ये हा सामना चालू होता. परिणामी, खरेदीला आलेलेही अनेकजण त्या पडद्यावर खिळून राहिले होते. अखेरच्या चेंडूपर्यंत फिरत जाणारा सामना अखेर भारताच्या पारड्यात पडल्यानंतर पुण्यातील ‘एफसी रोड’वर ‘गुडलक चौका’त तरुणाईने मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणांनी आसमंत दुमदुमला.
यानिमित्त दिवाळीचे मोठे गिफ्ट मिळल्याची भावना प्रेक्षक, क्रिकेट प्रेमींनी बोलून दाखवली. समाजमाध्यमांवरदेखील विजयानंतर भारतीय क्रिकेट संघावर कौतुकांचा वर्षाव करण्यात आला.