दिवाळी म्हटले की सर्वत्र एक वेगळेच चैतन्य पसरलेले आपल्यला जाणवते. भारतात हा सण एका वेगळ्याच उत्साहात साजरा होतो. भारतामध्ये आपल्याला विविध परंपरा पाहायला मिळतात. एवढंच काय तर अनेक ठिकाणी आपल्याला अशा काही गोष्टी पाहण्यास मिळतील की आपला त्यावर विश्वासच बसणार नाही. अशीच एक गोष्ट आहे भारतातील एका मंदिराची. या मंदिरात माता लक्ष्मीसाठी चिट्ठी लिहून लोक त्यांच्या इच्छा व्यक्त करतात. असं मानलं जात की भक्तांनी कागदावर मातेला लिहून पाठवलेल्या इच्छा पूर्ण होतात.
राजस्थानमधील बांसवाडा शहरात तब्बल ४८० वर्षे जुने मंदिर आहे. येथील लोकांची मान्यता आहे की येथे मातेसाठी पत्र लिहून त्या पत्रात आपण जे काही मागू ते माता नक्कीच पुरवते. एवढंच नाही तर या मंदिरात मातेच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक येथील दानपेटीत पत्र टाकून जातात. महालक्ष्मी मंदिरात येणाऱ्या भाविकांची पत्रे ठेवून श्राद्ध पक्षातील अष्टमीच्या दिवशी ही पत्रे उघडली जातात. यामागील मुख्य कारण म्हणजे श्राद्ध पक्षातील अष्टमीच्या दिवशी मातेचा वाढदिवस साजरा केला जातो आणि याच दिवशी वसंत पंचमीदेखील साजरी करण्यात येते. भक्तांची पत्रे येथे दोन ते तीन वर्षे ठेवून नंतर त्या पत्रांचे विसर्जन करण्यात येते.
या मंदिरात मातेची मूर्ती ही १६ दलांच्या कमळाच्या आसनावर विराजमान असणारी पांढऱ्या संगमरवरी दगडाची असून मूर्तीची उंची ही साडेतीन फूट आहे. दर दिवाळीला महालक्ष्मीची मूर्ती ही तब्बल साडेपाच किलो चांदीच्या कपड्यांनी सजवण्यात येते. तसेच यासोबतच मातेला सोन्याचा हार, अंगठी, नथ यांनी सजवले जाते. दरवर्षी दिवाळीनिमित्त येथे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. मात्र या मंदिराच्या रक्षणासाठी एकही सुरक्षारक्षक तैनात करण्यात आलेला नाही.