चीनमध्ये हुकूमशाहीची नांदी

    23-Oct-2022   
Total Views |
 
china
 
 
‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’चे 20वे अधिवेशन नुकतेच समाप्त झाले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एका घोषणेने पुन्हा एकदा चीनचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या घोषणेने चीनची वाटचाल पुन्हा एकदा हुकूमशाहीकडे सुरू झाल्याचे दिसून येत आहे. या अधिवेशनात चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची पुन्हा राष्ट्रपतिपदी निवड करण्यात आली. याआधी गुप्त मतदानाद्वारे त्यांची सलग तिसर्‍यांदा पक्षाच्या महासचिवपदी निवड झाली. पुढील पाच वर्षांसाठी त्यांना पक्षाचे महासचिव म्हणून घोषित करण्यात आले. चीनमध्ये या पदासाठी निवडलेला नेताच देशाचा राष्ट्रपती असतो. राष्ट्रपतीपदाबरोबरच जिनपिंग हे चीनच्या लष्कर ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ (पीएलए)चे कमांडरही बनले आहे.
 
 
या अधिवेशनात शी जिनपिंग यांना कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय सैन्य आयोगाचे अध्यक्ष म्हणूनदेखील नामनिर्देशित करण्यात आले. त्यामुळे जिनपिंग हे चीनच्या सैन्य दलाचेही प्रमुख बनले आहे. विशेष बाब म्हणजे, जिनपिंग यांच्या निवडीने अनेक विक्रम मोडीत निघाले व चीनच्या राजकारणात इतिहास रचला गेला. जिनपिंग सलग तिसर्‍यांदा राष्ट्रपती झाल्यामुळे पक्षाची सुमारे चार दशकांची जुनी राजवट मोडीत निघाली. याआधी ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’चे संस्थापक माओत्से तुंग हे जवळपास तीन दशके पक्षाच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळत होते. त्यानंतर 1980मध्ये या सर्वोच्च पदासाठी जास्तीत जास्त दहा वर्षांचा कार्यकाळ असेल, असा नवा नियम तयार करण्यात आला.
 
 
धक्कादायक बाब म्हणजे, जिनपिंग यांची राष्ट्रपतीपदी निवड एकमताने झाल्याचे अजिबात वाटत नाही. ही निवड दबावतंत्राचा वापर करून झाली की काय, अशी शंकाही निर्माण होते. कारण, अधिवेशनादरम्यान एकेकाळी चीनचे राष्ट्रपती राहिलेले 80 वर्षांचे हू जिंताओ यांना जबरदस्तीने बैठकीतून बाहेर काढण्यात आले. राष्ट्रपती शी यांच्या शेजारी बसलेल्या हू जिंताओ यांना दोन सुरक्षारक्षकांनी खुर्चीवरून उठवले आणि त्यानंतर बैठकीच्या हॉलमधून बाहेर काढले. या घटनेचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. यामध्ये हू जिंताओ शी जिनपिंग यांना काहीतरी सांगताना दिसत असून त्यादरम्यान त्यांनी खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना दोन सुरक्षारक्षकांनी हाताला पकडून बाहेर नेले. जिनपिंग यांची हुकूमशाही कुठल्या स्तरापर्यंत पोहोचली आहे, हे आता वेगळे सांगायला नको. एवढंच नाही, तर शी जिनपिंग यांनी ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’मध्ये दुसर्‍या क्रमांकाचे शक्तिशाली नेते प्रधानमंत्री ली केकियांग यांनाही पक्षाच्या वरिष्ठ पदावरून हटवले आहे.
 
 
 त्याचबरोबर अन्य तीन वरिष्ठ नेत्यांनाही त्यांच्या पदांवरून हटविण्यात आले आहे. त्यामुळे आता हे चारही नेते कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वात शक्तिशाली समजल्या जाणार्‍या ‘पॉलिट ब्युरो’ स्थायी कमिटीचे सदस्य राहिले नाहीत. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला असून आता पक्षाच्या निर्णयप्रक्रियेत यापुढे त्यांचा कुठलाही सहभाग असणार नाही. दरम्यान, पक्षात ‘पॉलिट ब्युरो’च्या 25 आणि स्थायी समितीच्या सात सदस्यांसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच हे लोक कोण असतील, याची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याआधीच जिनपिंग यांनी त्यांच्या सर्व विरोधकांना ‘सीसीपी’च्या नव्या संघातून काढून टाकले आहे. यात त्यांनी आपल्या विश्वासू लोकांचा समावेश केल्याचे मानले जात आहे. त्यामुळे त्यांचा चीनचे आजीवन राष्ट्रपती राहण्याचा मार्ग मोकळा होईल, असे म्हटले जाते.
 
 
शी जिनपिंग यांना सलग तिसर्‍यांदा राष्ट्रपती होण्याआधी जनतेचा मोठा रोष सहन करावा लागला. त्यांच्या विरोधात ठिकठिकाणी पोस्टरबाजी, घोषणाबाजी झाली. परंतु, त्यावर कम्युनिस्ट पक्षाने या सर्वांचा आवाज दाबण्यासाठी दूतावासांचे तुरुंगात रूपांतर केले. तसेच, त्यांच्याविरोधात बोलणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचा पवित्रा अवलंबला. त्यामुळे चीनने कितीही महासत्ता होण्याच्या गप्पा मारल्या, तरीही चीनमधील लोकशाही संपुष्टात आल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. चीन आतून पोखरत असून जिनपिंग यांच्या पदाच्या महत्त्वाकांक्षेमुळे देश भले अन्य क्षेत्रांत पुढे जात असेल. परंतु, चिनी जनता मात्र सहन करण्यापलीकडे काहीही करू शकत नाही. जिनपिंग यांची सलग तिसर्‍यांदा राष्ट्रपती झालेली निवड ही चीनमध्ये हुकूमशाहीची नांदीच म्हणावी लागेल.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.